भट्ट,ध्रुव : (८ मे १९४७). ध्रुव प्रबोधराय भट्ट. ख्यातनाम गुजराती कादंबरीकार व कवी. जन्म नींगाला, जि. भावनगर (गुजरात) येथे. प्राथमिक शिक्षण जाफ्राबाद,केशोद येथे झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण वाणिज्य शाखेतून झाल्यावर त्यांनी पुढे शिक्षण न घेता गुजरात मशिन मॅन्यूफॅक्कचर्स मध्ये सेल्स सुपरवायझर या पदावर नोकरी पत्करली; परंतु अंगभूत साहित्य प्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना, त्यामुळे साहित्य लेखनासाठी त्यांनी नोकरी सोडली.वडील प्रबोधराय भट्ट कवी, तर आई हरिसुता जिज्ञासु वाचक होत्या. त्यामुळे त्यांना साहित्याचा वारसा कुटुंबातूनच प्राप्त झाला होता. दिव्याबेन ह्या त्यांच्या पत्नी होत.

त्यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये खोवायेलुं नगर (१९८२), अग्निकन्या (१९८८), समुद्रांतिके (१९९३), तत्त्वमसि (१९९८),अत्रापि (२००१),कर्णलोक (२००४),अकूपार (२०१०),लव्हली पॅन हाऊस (२०१२),तिमिरपंथी (२०१५) ह्या कादंबऱ्यांचा तर श्रुवेन्तु (२००१), गाये तेना गीता (२००३) ह्या कवितासंग्रहाचा समावेश होतो.

बालपणीच आईवडलांच्या साहित्यविषयक संस्कारांनी आणि अवतीभोवतीच्या विविध नैसर्गिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवेशामुळे ध्रुव भट्ट यांचे अनुभवविश्व, निवेदनशैली आणि भाषा समृद्ध झाली. अग्निकन्या ह्या कादंबरीत त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेला साहित्यिक वारसा आविष्कृत झाला आहे. महाभारतातील द्रौपदी हा या कादंबरीचा प्रमुख कथाविषय आहे. समुद्रांतिक हे कादंबरी वजा प्रवासवर्णन आहे. सौराष्ट्रच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रवास वर्णन करण्यासाठी त्यांनी गोपीनाथ ते द्वारका असा  महुआ,जाफ्राबाद, दिव आणि सोमनाथ या मार्गाने प्रवास केला. तत्त्वमसि ही ध्रुव भट्टाची महत्त्वाची कादंबरी आहे. ही कादंबरी प्रेमकथा, कुटूंबकहाणी वरकरणी वाटते; पण  ती वास्तवात नर्मदेकाठचे आयुष्य चित्रित करते.नर्मदा या नदीला आयुष्य विदित करणारा ह्या कादंबरीचा नायक प्रारंभी माणसाची मानवी संसाधन म्हणून संभावना करतो ; मात्र हळूहळू जीवनप्रक्रियांच्या जाज्वल्य अनुभवानंतर तो माणसाला हाडामासाचा,रक्तशेषाचा माणूस मानायला तयार होतो. या कादंबरीत नर्मदा परिक्रमा, तेथील भाषा आणि  तेथील संस्कृती या बाबी सहजगत्या चित्रित झाल्या आहेत. अकूपार ही त्यांची आणखी एक लक्षणीय कादंबरी होय.  पर्यावरण,मनुष्य आणि इतर प्राणी ह्यातील परस्परसंबंधावर या कादंबरीत भाष्य केले आहे.पर्यावरणीय ऱ्हास, तांत्रिकीकरण आणि मानवी जीवनातील कृत्रिमता ह्या बाबी भट्ट यांच्या कादंबरीत प्रामुख्याने आढळतात.सोबतच आपली सांस्कृतिक ओळख अधिक घट्ट करण्यासाठी आपण धार्मिक उन्मादाकडे तर जात नाही आहोत ना? हा प्रतिप्रश्न ते त्यांच्या कादंबरीद्वारा मांडतात.

भट्ट यांच्या या सर्व कादंबऱ्यांची निवेदनशैली वैशिट्यपूर्ण आहे. त्यात कथानायक स्वत:च कथा सांगतो, परंतु त्याचं व्यक्तित्व शेवटपर्यंत गूढ राहतं. हा कथानायक प्रमाण गुजराती भाषा बोलतो; परंतु  कथेतील पात्रे स्थानिक भाषा बोलतात. लोकांना समजेल अशा स्थानिक भाषेचे उपयोजन त्यांनी निवेदनातून केले आहे.भट्ट यांच्या कादंबऱ्यांचे आणखी महत्वाचे वैशिट्य म्हणजे त्यातील दृश्यात्मकता.यामुळेच त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांचे नाट्य आणि चित्र रुपांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रकट झालेले अनुभवविश्व हे वास्तविक आहे.आभासी जगातील अनुभव मांडण्यापासून ते अलिप्त आहेत. त्यामुळे भारतातील खूप साऱ्या घटनादत्त भाषांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद झाला आहे.

भारतीय व आदिवासी संस्कृतीला दुय्यम लेखणाऱ्या सुशिक्षिताला स्वत:चाच शोध घ्यायला भाग पाडणारे साहित्य ध्रुव भट्टांनी निर्माण केले आहे. परंपरासिद्ध संस्कृती व आधुनिक पाश्चात्त्य जीवनशैली या द्वंद्वातून मी कोण आहे? असा शोध घ्यायला ते प्रवृत्त करतात. मुलांच्या शिक्षणाबाबत, आदिवासी, स्थानिक भाषांबाबत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. साहित्यविश्वात प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.त्यामध्ये साहित्य अकादमी अवार्ड (२००२), दर्शक अवार्ड (२००५), गुजरात साहित्य परिषद पुरस्कार, गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार, गोवर्धन त्रिपाठी समितीचा पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.

संदर्भ :

  • प्रसाद, ब्रह्मभट्ट,अर्वाचीन गुजराती साहित्य इतिहास,पार्श्व पब्लिकेशन,अहमदाबाद,(२०१०).