भालण (मालन) : (१४२६-१५००). संस्‍कृतचे गाढे अभ्‍यासक, आख्‍यानकवी, पदकवी आणि अनुवादक म्‍हणून प्रसिद्ध. ज्ञातीने मोढ ब्राह्मण. त्यांच्या दशमस्‍कंध या रचनेत येणारी व्रजभाषेतील पदे त्यांनी स्‍वत: रचलेली असल्‍याने त्‍यांना व्रजभाषेचेही ज्ञान होते, असे लक्षात येते. गुरूचे नाव परमानंद व सिद्धपुरचे कवी भीम त्‍यांचे शिष्‍य होते. गुजराती भाषेला गुजरभाषा म्‍हणून पहिली ओळख देणा-या भालणने गुजराती कवितेत कडवेबद्ध आख्‍यानाचा स्थिर पाया घालण्‍याचे महत्‍त्‍वाचे कार्य केले आहे. पौराणिक विषयांवर रचलेल्‍या त्‍यांच्‍या आख्‍यानात मूळ कथेशी प्रामाणिक राहण्‍याचे वळण अधिक मोठया प्रमाणात दिसून येते. आज मुद्रित स्‍वरूपात उपलब्‍ध असलेल्‍या त्‍यांच्‍या आख्‍यानात अनेक आख्‍याने संपूर्ण तर अनेक तुटक स्‍वरूपात आहेत. त्यांच्या  उपलब्‍ध नलाख्‍यानात ३०/३३ कडवी असून त्‍यावर श्रीहर्षाच्‍या नैषधीय चरिताचा आणि त्रिविक्रमाच्‍या नलचंपुचा प्रभाव दिसतो. मूळ पात्रांची उदात्‍तता कायम राखत शृंगार-करूण रसाचा उत्‍कर्ष या आख्यानात साधला जातो.त्‍याशिवाय पद्मपुराणावर आधारित जालंधर आख्‍यान, मामकी नायक गणिकेच्‍या रामभक्‍तीचे निरूपण करणारे मामकी-आख्‍यान, भागवताच्‍या ध्रुवकथेवर आधारित निष्‍काम भक्‍तीचा महिमा सांगणारे ध्रुवाख्‍यान इ. त्‍यांची आख्‍याने प्रसिद्ध आहेत. त्‍याचबरोबर सप्‍तशती चंडी आख्‍यान, मृगी-आख्‍यान, तत्‍कालीन सामाजिक स्थिती प्रतिबिंबित करणारे रामविवाह/सीताविवाह इ. त्‍यांची काव्‍ये वैशिष्‍टयपूर्ण आहेत; तसेच दशमस्‍कंध आणि रामबालचरित ही विशेष लक्षात घेण्‍यासारखी काव्‍येही आहेत. रूक्मिणी विवाहसत्‍यभामाविवाह या स्‍वतंत्रपणे  रचित कृती होत  बालस्‍वभाव आणि मातृहृदयाचे केलेले अपूर्व चित्रण याने त्‍या लक्षणीय ठरल्‍या आहेत. त्‍यांची सर्वात महत्‍त्‍वाची रचना कादंबरी ही आहे. कवी बाण आणि पुलिन यांच्‍या कल्‍पनामंडित रसार्द्र गद्यकथेचा ४० कडव्‍यांच्‍या आख्‍यानात संक्षेप करीत मुळातल्‍या आस्‍वाद्यतेला किंचितही ढळ न पोहचविण्‍याची त्‍यांची किमया गुजराती कवितेत आजतागायत अपूर्व असल्‍याचे मत अभ्‍यासकांनी मांडले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा