भूगर्भात गाडल्या गेलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांच्या नैसर्गिक प्रक्रियांदवारे (उदा., विनॉक्सी अपघटन) निर्माण झालेल्या इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात. ही इंधने अनेक कोटी वर्षांपूर्वी, काही तर ६५ कोटीपेक्षा जास्त वर्षांपूर्वी असलेल्या जीवांपासून निर्माण झालेली आहेत. जीवाश्म इंधनांमध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होत असून त्यांमध्ये कार्बन हा मुख्य घटक असतो. २००७ साली केलेल्या पाहणीनुसार, कोळसा (२७.४%), खनिज तेल (३६%) आणि नैसर्गिक वायू (२३%) हे ऊर्जेचे प्राथमिक स्रोत असून त्यांपासून सु. ८६.४% ऊर्जा उपलब्ध होते. बिगरजीवाश्म स्रोतांमध्ये जलविद्युत (८%), अणुऊर्जा (२.५%) आणि अन्य ऊर्जास्रोत (उदा. भूगर्भीय, सौर, पवन, जैववस्तुमान) १% यांचा समावेश होतो. प्रत्येक वर्षाला जगभरातील ऊर्जेच्या खपात सु. २.३% वाढ होत आहे.
जीवाश्म इंधन

कोट्यावधी वर्षांपूर्वी वनस्पतिप्लवक आणि प्राणिप्लवक ही समुद्राच्या तळाशी पाण्यात ऑक्सिजनाचा अभाव असताना गाडली गेली आणि त्यांच्या विनॉक्सी अपघटनातून खनिज तेल व नैसर्गिक वायू ही इंधने तयार झाली आहेत. दुसऱ्या बाजूला भूपृष्ठीय वनस्पतींपासून कोळसा आणि मिथेनसारखी इंधने तयार होतात. कोळसा अलीकडच्या काळात म्हणजे कारबॉनीफेरस कल्पात तयार झाला आहे.

कोळशाचा वापर औष्णिक वीजनिर्मितीसाठी, लोहभट्ट्यांमध्ये लोह वितळविण्यासाठी आणि वाफेची इंजिने चालविण्यासाठी केला जातो. खनिज तेलापासून पेट्रोल, डीझेल, रॉकेल, नॅप्था, वंगण तेल, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळविले जातात. तसेच डांबर, रासायनिक खते व वेगवेगळी रसायने तयार करण्यासाठी खनिज तेलाचा वापर केला जातो. याशिवाय त्याचा वाहतुकीच्या वेगवेगळ्या साधनांसाठी, घरगुती वापरासाठी व औदयोगिक क्षेत्रांत इंधन म्हणून तसेच वीजनिर्मितीसाठी व विविध खनिज तेल रसायनांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूचा उपयोग घरगुती इंधन, विदयुत निर्मितीसाठी तसेच अनेक कारखान्यांत आणि वाहतुकीच्या साधनांमध्ये इंधन म्हणून केला जातो.

जगाच्या पाच टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत जगाच्या एक-चतुर्थांशपेक्षा अधिक ऊर्जानिर्मिती जीवाश्म इंधनांपासून केली जाते. भारतात ऊर्जेचे मुख्य स्रोत कोळसा (५७%), जलविद्युत (१९%), नूतनीकरणीय ऊर्जा स्रोत (१२%), नैसर्गिक वायू (९%), अणुऊर्जा (२.५%) आहेत.

एखादे इंधन ज्वलनासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, हे त्या इंधनांच्या ज्वलनातून मिळणाऱ्या ऊर्जेवर ठरते. प्रमाणित तापमान आणि दाबाच्या स्थितीला एखाद्या पदार्थाचे ऑक्सिजनाबरोबर पूर्णपणे ज्वलन होऊन उष्णतेच्या स्वरूपात जी ऊर्जा मुक्त होते, त्या ऊर्जेला त्या पदार्थांची दहन ऊष्मा म्हणतात. ही ऊष्मा बॉम्ब कलरीमापीच्या साहाय्याने मोजतात. व्यवहारात सामान्यपणे जी जीवाश्म इंधने वापरली जातात, त्यांची दहन ऊष्मा पुढील तक्त्यात दिलेली आहे.

इंधन किलोज्यूल प्रति ग्रॅ. किलो कॅलरी प्रति ग्रॅ.
हायड्रोजन १४१.९ ३३.९
गॅसोलीन (पेट्रोल) ४७.० ११.३
डीझेल ० ४५. १०.७
एथिल अल्कोहॉल २९.७ ७.१
ब्युटेन ८ ४९.२ ११.
लाकूड १५.० ३.६
लिग्नाइट कोळसा (हलक्या प्रतीचा, मऊ कोळसा) १५.० ४.४
अँथ्रॅसाइट कोळसा (चकचकीत, कठीण, कार्बनाचे प्रमाण अधिक असलेला कोळसा) २७.० ७.८
नैसर्गिक वायू ५४.० १३.०

 

जीवाश्म इंधनाचा वापर करताना होणाऱ्या ज्वलनातून CO2, SO2, NO, CO, राख, धूर, विषारी रसायने, दुर्गंधीयुक्त वायू, किरणोत्सारी पदार्थ द्रव्ये इ. प्रदूषके वातावरणात पसरतात. त्यामुळे हवा, पाणी व ध्वनी यांचे प्रदूषण, हरितगृह वायू परिणाम, जागतिक तापन, आम्लवर्षण, भूमी अवनती आदी समस्या निर्माण होतात. याखेरीज या इंधनांचे उत्पादन, शुद्धीकरण, वाहतूक व वितरण या बाबींदरम्यान काही समस्या उद्भवतात. जसे, कोळसा उत्खननाच्या वेळी होणारे अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी, तेलगळतीमुळे होणारे सागरी प्रदूषण आणि त्याचे परिसंस्थांवर होणारे परिणाम, संगमरवरी व चुनखडीतील वास्तूंवरील दुष्परिणाम इ. तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या गंधामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

जीवाश्म इंधनांचे स्रोत मर्यादित आणि अनूतनीकरणीय असून ते भविष्यात संपुष्टात येऊ शकतात. या इंधनांचे मर्यादित स्रोत, त्यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या आणि इंधन टंचाई या बाबींचा विचार करता वैज्ञानिक पर्यायी नूतनीकरणीय, अपारंपारिक आणि प्रदूषणविरहित इंधने विकसित करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याचाच भाग म्हणून अशा इंधनांचे प्रदूषणविरहित शुद्धीकरण, वाहतुकीच्या इंजिनांमध्ये बदल, वाहतुकीसाठी संपीडित नैसर्गिक वायूचा (सीएनजी) वापर इत्यादी सुधारणा केल्या जात आहेत. जीवाश्म इंधनाचा वापर नियंत्रित राहावा, यासाठी त्यांवरील कराचे प्रमाण सतत वाढविले जाते. याखेरीज सौर ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, जैवइंधन, गोबर गॅस, अपारंपारिक व नूतनीकरणीय पर्यायी इंधने कमी किंमतीत विकसित करून व अशा इंधनांना उपदान देऊन त्यांचा जास्त वापर होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.