पाण्याखाली, पाणथळ जागी, चिखलात व जलसंपृक्त मृदेत वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलीय वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये पाण्यात वाढण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते.
साल्व्हिनिया

जलीय वनस्पतींमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात. काही वनस्पती स्वैरपणे पाण्यावर तरंगतात, काही पूर्णपणे पाण्याखाली वाढतात, काहींची मुळे तसेच खोडाचा भाग पाण्यात तर पाने पाण्यावर असतात, काही नदीकाठच्या चिखलात वाढतात. या वनस्पतींच्या ऊतींमध्ये साठलेल्या हवेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांची मुळे, खोड, पानांचे देठ वगैरे स्पंजाप्रमाणे सच्छिद्र असतात. त्यांच्या मुळांची वाढ कमी असते. त्यांच्या शरीरात काष्ठाचे व दृढोतीचे प्रमाणही कमी असते. त्या समूहाने वाढतात. त्यांच्यात शाकीय पुनरुत्पादन वेगाने घडून येते. मात्र, लैंगिक प्रजननाचे प्रमाण कमी असते. या वनस्पतींचे त्यांच्या दृश्यरूपावरून पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतात:

उभयवासी जल वनस्पती (ॲम्फिफाइट): या वनस्पतींमध्ये पाण्याखाली तसेच जमिनीवर राहण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते. उदा., पिस्टिया, कमळ.

 स्तंभ वनस्पती (इलोडिड): यांचे जीवनचक्र पूर्णपणे पाण्याखाली असते किंवा त्यांची फक्त फुले पाण्याच्या काठावर असतात. उदा., हायड्रिला, इलोडिया, व्हॅलिस्नेरिया.

गुच्छ वनस्पती (आयसॉएटिस): यांचे जीवनचक्र पूर्णपणे पाण्याखाली असते. उदा., काही नेचे, शैवाल.

 लवणोद्भिद (हॅलोफाइट) : या लवण वनस्पतीची मुळे पाण्याच्या तळाशी मातीत असतात. परंतु, पाने  पाण्याच्या काठाला असतात. उदा., पाणकणीस, लव्हाळा.

 कमळसदृश (निंफिड) : या वनस्पतींची मुळे पाण्याच्या तळाशी असतात. परंतु, पाने व फुले पृष्ठभागावर तरंगत असतात. उदा., कमळ, शिंगाडा, पाणलवंग.

 महाप्लवक (प्लुस्टन) : या संवहनी वनस्पती पाण्यात स्वैरपणे तरंगत असतात. उदा., समुद्रपालक, कारा, साल्व्हिनिया.

जलीय वनस्पती मृत पावल्यानंतर कुजून व बुडून पाणी दूषित करतात व जैविक ऑक्सिजनाची गरज वाढवितात. अशा भागातील पाण्याची खोली कमी झाल्यामुळे पाणी उथळ होते. जलीय वनस्पतींची वाढ हे जल प्रदूषणाचे दर्शक आहे. अशा प्रदूषित पाण्यातील जीव मरतात. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. तसेच त्या पाण्यात उपद्रवी कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यातील काही वनस्पती जल-तणे म्हणून ओळखली जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा