पोवाडा, कलगी-तुरा, गोंधळ, भराड, तमाशा आदी लोककलाप्रकारांमध्ये तुणतुणे हे तंतुवाद्य वापरले जाते. हातात धरण्याइतकी जाड असलेली दोन-अडीच फूट लांबीची बांबूची काठी हातात घेऊन तिच्या तळाशी एक पोकळ लाकडी नळकांडे बसविलेले असते. याचा तळ बकरयाच्या कातड्याने मढवून काढतात. कातड्याच्या मध्यापासून ते बांबूच्या काठीच्या वरच्या टोकापर्यंत एक तार खेचून बसवितात आणि बांबूत खोचलेल्या छोट्याशा खुंटीस ती बांधतात. हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हातातील एका बारीक,पातळ पण टणक अशा लाकडी काटकीने तार छेडून वाजविले जाते. तुणतुण्यातून तुणतुण असा ध्वनी निघतो, म्हणून त्याला तुणतुणे असे म्हणतात. याचा वापर करून जे लोककलावंत गाणे म्हणतात; त्यांना तंत शाहीर असेही म्हटले जाते. लय आणि स्वर दोहोंनाही शक्ती देण्याचे काम तुणतुणे करते.

आधारस्वर पुरविणे व लयीचे आघात स्पष्टपणे दाखविणे हे तुणतुण्याचे काम. जागरणात तुणतुणे वाजविणारा हा प्रामुख्याने झिलकरी असतो. मुख्य गायकाच्या गायनाच्या व पदाच्या स्वरबदलानुसार तुणतुणेवाला खुंटी पिळून त्या विवक्षित पदाच्या स्वरनिश्चितीनुसार तुणतुण्याचे स्वर लावतो. जागरणातील तुणतुण्यातील चौंडक लाकडी गोलाकार भाग मोठे असते. त्याची तार दांड्याला डबल फिरवून जोडलेली असते. जागरणातील तुणतुणे काळी पाच किंवा पांढरी चारपर्यंतच लागते. कारण ही एक आंगणीय कला आहे. मंद्र सप्तकाच्या स्वरातील गाणे सर्वांनाच ऐकायला जाते. तर तमाशातील तुणतुण्याचे चौंडक हे लहान असते. कारण तमाशातील गाणी ही उच्च स्वरात गायली जातात. पहिली काळी एक ते काळी पाचपर्यंत यात लावले जाते. हल्ली तुणतुण्याच्या ऐवजी हार्मोनियमवापरच जास्त होताना दिसतो. गोंधळात, जागरणात पदगायन, निरूपण, संवाद या सर्व स्तरांवर तुणतुण्याचे स्वर अखंडपणे सुरू असतात. पदे द्रुत लयीत असली की, तुणतुण्याच्या स्वरांची गती आणि लय वाढते. एरव्ही निरूपण आणि संवादांत अखंडपणे तुणतुण असे स्वर तुणतुण्यातून काढले जातात. संपूर्ण जागरण, गोंधळ अव्याहतपणे सूरमय ठेवण्याचे काम तुणतुणे करते.

प्रतिक्रिया व्यक्त करा