जैव आमापनादवारे जीवनसत्त्वे, संप्रेरके आणि वनस्पतीच्या वाढीचे घटक इ. पदार्थांची जैविक क्षमता (शुद्धतेची संहती) निश्चित करता येते. यामध्ये आमापन करावयाच्या पदार्थाचा सजीवांच्या ऊती, पेशी व विकरे यांच्यावर होणाऱ्या परिणामांचे मापन करताना मिळालेल्या माहितीची तुलना प्रमाणित औषधाबरोबर केली जाते. जैव आमापन संख्यात्मक किंवा गुणात्मक असू शकते. गुणात्मक आमापन पद्धतीत पदार्थांमुळे घडून आलेल्या भौतिक परिणामांचे मूल्यमापन करतात. उदा., अपसामान्य वाढ किंवा व्यंग. कोंबड्याची वृषणे काढल्याने प्रजननासाठी आवश्यक असणारी संप्रेरके त्याच्या शरीरात तयार होत नाहीत आणि तो कोंबडा प्रजननक्षम राहत नाही. संख्यात्मक जैव आमापन पद्धतीत एखादया पदार्थाला (उदा., औषधाला) सजीव कसा जैविक प्रतिसाद देतो याचे मापन करून तो पदार्थ किती उपयुक्त आहे, याचा अंदाज करता येतो. या पद्धतीत विश्लेषण करताना जीवसांख्यिकीचा वापर करतात.
जैव आमापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) एखादया नवीन संयुगाच्या गुणधर्माचा शरीरक्रियांवर होणारा परिणाम पाहणे; (२) शरीरातील प्रथिनांना सक्रिय करण्यासाठी आणि त्यांचे कार्य वर्धित करण्यासाठी जी आंतरपेशीय प्रथिने असतात, अशा शरीरातील मध्यस्थ पदार्थांचे कार्य जाणून घेणे; (३) औषधांसारख्या पदार्थांचे दुष्परिणाम (उदा., औषधाचा विषारीपणा) पाहणे; (४) ज्ञात पदार्थांच्या कार्यक्षमतेचे (संहतीचे) मापन करणे; (५) एखादया कारखान्यातून बाहेर सोडलेल्या प्रदूषकांचे प्रमाण मोजणे आणि (६) विशिष्ट विकरांचा विशिष्ट आधारद्रव्यांवर होणारा परिणाम पाहणे.
जैव आमापनाचे ‘आहे किंवा नाही’ (क्वांटल) आणि ‘श्रेणित’ (ग्रेडेड) असे प्रकार आहेत.
‘आहे किंवा नाही’ जैव आमापन : यात विशिष्ट शरीरक्रियाविषयक परिणाम घडून येण्यासाठी औषधाची किमान मात्रा निश्चित करतात आणि त्याची तुलना प्रमाणित औषधाबरोबर करतात. डिजिटॅलिस या वनस्पति-द्रव्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. डिजिटॅलिसच्या जैव आमापनामध्ये हृदयविकाराचा झटका ‘येतो’ किंवा ‘येत नाही’ असा असतो. औषधाचा विषारीपणा तपासताना त्याच्या ज्या मात्रेमुळे प्राणी मरतो किंवा मरत नाही ती मात्रा ठरविली जाते.
‘श्रेणित’ जैव आमापन : यात औषधाची मात्रा टप्प्याटप्प्याने वाढवीत गेल्यावर जे प्रतिसाद मिळतात, त्या परिणामांचे निरीक्षण करतात. उदा., ॲड्रेनॅलीन या संप्रेरकामुळे रक्तदाबात कोणकोणते बदल अपेक्षित असतात, याचा अभ्यास या पद्धतीने करतात.