चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा. सजीवांच्या पेंशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हिक आम्लात होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकॉलिसिस म्हणतात. या प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया असून या सर्व अभिक्रिया पेशीद्रव्यात विकरांद्वारे घडून येतात. गूस्टाव्ह गेओर्ख एम्ब्डेन आणि ओटो फ्रिट्झ मायरहोफ या दोघांनी या अभिक्रिया शोधून काढल्या, म्हणून या प्रक्रियेला ‘एम्ब्डेन-मायरहोफ पथ’ असेही म्हणतात. ही प्रक्रिया सर्व ऑक्सिजीवी आणि विनॉक्सिजीवी सजीवांमध्ये घडून येते. कर्बोदकांच्या चयापचयातील हा एक मुख्य पथ असून यात सहा-कार्बनी ग्लुकोजचे (एकशर्कराचे) रूपांतर तीन-कार्बनी पायरुव्हिक आम्लात होते. तसेच या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ADP चे रूपांतर ATP मध्ये होण्यासाठी वापरली जाते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया सारख्याच प्रकारे घडून येते, कारण या अभिक्रियेत भाग घेणारी प्रथिने किंवा विकरे सारखी असतात.

ग्लायकॉलिसिस प्रक्रिया

ग्लायकॉलिसिस प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया क्रमाने होत असून यांद्वारे ग्लुकोजचे विघटन होते आणि पायरुव्हिक आम्लाचे दोन रेणू मिळतात. या प्रक्रियेत घडणार्‍या सर्व अभिक्रियांचे मिळून संक्षिप्त समीकरण पुढीलप्रमाणे आहे.

ग्लुकोज + २ ADP + २ NAD – २ पायरुव्हेट + २ ATP +  २ NADH

[ADP –  अ‍ॅडेनोसीन डायफॉस्फेट; NAD –  निकोटिनामाइड अ‍ॅडेनाइन डायन्यूक्लिओटाइड; ATP – अ‍ॅडेनोसीन ट्रायफॉस्फेट; NADH : निकोटिनामाइड अ‍ॅडेनाइन डायन्यूक्लिओटाइड क्षपित]

ग्लायकॉलिसिस प्रक्रिया दोन टप्प्यांत घडते : पहिल्या टप्प्यात पाच अभिक्रियांचा समावेश होतो, तर दुसर्‍या टप्प्यात नंतरच्या पाच अभिक्रियांचा समावेश होतो. पहिल्या टप्प्यात ऊर्जा खर्ची पडते आणि दोन ATP रेणूंचे रूपांतर दोन ADP मध्ये होते. दुसर्‍या टप्पात ऊर्जानिर्मिती  होते. या टप्प्यात चार ADP चे रूपांतर दोन ATP च्या रेणूंमध्ये होते आणि दोन NAD चे रूपांतर दोन NADH मध्ये होते. ऊर्जेचा ताळेबंद मांडला तर दोन ATP एवढी ऊर्जा खर्ची पडते आणि चार ATP ऊर्जा निर्माण होते. थोडक्यात दोन ATP शिल्लक राहतात.

ग्लायकॉलिसिस पथातील उत्पादितांपैकी ATP हा पेशींचा मुख्य ऊर्जास्रोत आहे. याला वैश्विक चलन असेही म्हणतात. ATP मध्ये साठलेली ऊर्जा पेशींमधील वेगवेगळ्या कार्यासाठी (उदा., पेशीतील जटिल रेणूंची निर्मिती, पेशींसाठी आवश्यक घटकांचे वहन, स्नायूंच्या हालचाली) वापरली जाते. तसेच NADH हे एक महत्त्वाचे विकर आहे. हे विकर पेशीमधील रासायनिक अभिक्रियांमध्ये इलेक्ट्रॉन वहनाचे काम करते. ग्लायकॉलिसिसमध्ये तयार होणारे पायरुव्हेटचे दोन रेणू ऑक्सिश्वसनासाठी तसेच विनॉक्सिश्वसनासाठी वापरले जातात.

पेशींच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार ग्लायकॉलिसिस प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे भवितव्य ठरते.

सर्व पेशी ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत विनॉक्सिश्वसनाद्वारे काही प्रमाणात ATP ची निर्मिती करीत असतात. या प्रक्रियेत ग्लुकोजचे विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल तयार होते. या पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर नंतर लॅक्टिक आम्लात होऊन ते पेशींमधून उत्सर्जित होते. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत प्राण्यांच्या पेशीचे कार्य काही काळ चालू राहू शकते. यावेळी निर्माण झालेले लॅक्टिक आम्ल रक्तात मिसळते. मात्र स्नायुपेशींना बराच वेळ ऑक्सिजन मिळाला नाही, तर वाढलेल्या आम्लामुळे पुढील चयापचय प्रक्रिया थांबतात आणि पेशी मृत पावतात.

दुधात असलेले जीवाणू चयापचय प्रक्रियेत दुधातील दुग्धशर्करा शोषून घेतात आणि शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात करतात. यातून निर्माण झालेले ATP जीवाणूंसाठी पुरेसे असते. तयार झालेल्या आम्लामुळे दूध आंबते. किण्वसारख्या सूक्ष्मजीवांमध्ये पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर कार्बन डाय-ऑक्साइड आणि एथिल अल्कोहॉलमध्ये होते. या क्रियेला किण्वन म्हणतात. औद्यागिक क्षेत्रात योगर्ट, मद्य तसेच बिअर तयार करण्यासाठी किण्वन क्रियेचा वापर करतात.

ऑक्सिजनच्या उपस्थितीत ग्लुकोजपासून तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे ऑक्सिडीभवन होऊन अ‍ॅसिटील को-एंझाइम -ए (अ‍ॅसिटील Co A; हे अ‍ॅसिटिक आम्ल आणि सहविकर –ए यांच्यापासून तयार झालेले एस्टर आहे) तयार होते. या अ‍ॅसिटील को-एंझाइम -ए चा प्रवेश क्रेब्ज चक्रात होतो आणि मोठ्या प्रमाणात ATP ची निर्मिती होते. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून ATP चे सु. ३० रेणू तयार होतात.