आंतरदेहगुही संघ

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा आंतरदेहगुहा असते. ही गुहा म्हणजे पोकळी. या पोकळीत अन्नाचे पचन आणि अभिसरणाचेही कार्य घडून येते.

बहुतांशी आंतरदेहगुही प्राणी खार्‍या पाण्यात राहतात, तर काही मोजकेच गोड्या पाण्यात राहतात. आकारानुसार त्यांचे बहुशुंडक (पॉलिप) आणि छत्रिक (मेड्युसा) असे दोन प्रकार आढळतात. बहुशुंडकाचे शरीर दंडाकृती असते, तर छत्रिकेचे शरीर घंटेच्या अथवा छत्रीच्या आकाराचे असते. या प्राण्यांचे शरीर अरीय सममित असते, म्हणजे आडवा (अक्षाला लंब) छेद घेतल्यास सगळ्या दिशांनी ते सारखेच दिसते. बहुशुंडक आधाराला चिकटून राहतात, तर छत्रिक मुक्तपणे पोहू शकतात.

या प्राण्यांच्या शरीराच्या एका टोकाला तोंड असते. तोंडाशीच आंतरगुहा जुळलेली असते. तोंडाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (सोंडेसारखे अवयव) अथवा स्पर्शक असतात. शुंडकांचा उपयोग हालचाल करणे, अन्न पकडणे इत्यादींसाठी होतो. भक्ष्यावर चढाई करण्यासाठी अथवा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी दंशपेशी उपयोगी असतात. त्यांच्यामध्ये हिप्नोटॉक्सिन नावाचे विषारी द्रव असते.

आंतरदेहगुही प्राणी एकेकटे किंवा समूहाने राहतात. ते आधारचक्रिकेला चिकटलेले, स्थानबद्ध किंवा मुक्तपणे तरंगणारे असतात. लहान अपृष्ठवंशी प्राणी हे यांचे भक्ष्य होय. दंशपेशींनी भक्ष्य अर्धमेले करून, त्यांना शुंडकाने पकडून तोंडाकडे नेले जाते. आंतरदेहगुहेत अन्नाचे पचन होते. न पचलेले अन्न तोंडावाटेच बाहेर पडते. श्वसनाचे व उत्सर्जनाचे कार्य शरीरपृष्ठाद्वारे होते. शरीरामध्ये चेतापेशींचे जाळे असते.

प्राणिसृष्टीमध्ये विविध कार्य आणि प्रक्रियांचे विभाजन सर्वप्रथम या संघात झालेले आढळते. या संघात तीन वर्ग आहेत :

१) हायड्रोझोआ : या वर्गात बहुशुंडक आणि छत्रिक रूपे आढळतात. उदा., हायड्रा, फायसेलिया.

२) सिफोझोआ : या वर्गात छत्रिक रूप प्रबल असते. उदा., जेलिफिश

३) अ‍ॅक्टिनोझोआ : या वर्गात फक्त बहुशुंडक रूप असते उदा. समुद्रपंखा, समुद्रलेखणी, पोवळे ( प्रवाळ).

आंतरदेहगुही प्राण्यांमध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने अगर मुकुलन बडिंग या अलैंगिक पद्धतीने होते. या प्राण्यांत मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते.