युद्धनीतीचा भाग म्हणून शत्रुराष्ट्रातील लोक, प्राणी आणि पिके इत्यादींना अपायकारक ठरतील अशा सूक्ष्मजीवांचा किंवा जीवविषांचा केलेला वापर म्हणजे जैविक युद्धतंत्र होय. यासाठी जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा जीवविष अशा कारकांचा वापर करतात. या कारकांना जैविक अस्त्रे म्हणतात. जीवाणू व विषाणू आश्रयींच्या शरीरात जाऊन त्वरेने वाढून विष निर्माण करतात. काही कीटक नांगीने अंत:क्षेपण करून रक्तात विष सोडतात, तर काही रोगकारक जीवाणू व विषाणू वाहक म्हणून मनुष्य, प्राणी किंवा वनस्पतींवर हल्ला करतात. ज्ञात माहितीनुसार आधुनिक युद्धात अशा जैविक युद्धतंत्राचा वापर अजूनपर्यंत केला गेला नाही. शत्रूला नष्ट करण्याची धमकी देण्यासाठी किंवा युद्धाची वेळ आल्यास वापरण्यासाठी जैविक अस्त्रांची साठवणूक केली जाते. कधीकधी त्यांचा प्रत्यक्ष वापरही केला जातो. ही जैविक अस्त्रे एका विशिष्ट व्यक्तीविरुद्ध, समूहाविरुद्ध किंवा संपूर्ण राष्ट्राविरुद्ध वापरली जाऊ शकतात. ही अस्त्रे कधी विघातक तर कधी निर्धोक असतात. ही अस्त्रे विकसित करणे, इतरांकडून विकत घेणे, जवळ बाळगणे किंवा हल्ला करण्यासाठी वापरणे असे धोरण एखादे राष्ट्र किंवा राष्ट्रसमूह दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध किंवा राष्ट्रसमूहाविरुद्ध राबवू शकते.
इतर प्रकारच्या युद्धांपेक्षा, जैविक युद्धात सजीवांची प्रचंड हानी होऊ शकते. त्यामुळे जैविक युद्धाला कोणतेही राष्ट्र सहजासहजी तयार होत नसते. अनेक वेळा अशा युद्धाचा केवळ इशारा दिला जातो. देवी, न्यूमोनिया तसेच प्लेगचे विषाणू हवेमार्फत सहज पसरविता येतात. त्यामुळे एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना संसर्ग होऊन एका वेळी अनेक लोक मृत्युमुखी पडू शकतात. यात शत्रूपक्षाचे लोक, ज्यांचा युद्धाशी प्रत्यक्ष संबंध नसतो असे निष्पाप जीव आणि मित्रपक्षाचेही लोक मृत्युमुखी पडू शकतात. त्यामुळे अनेकदा प्रतिकात्मक जैविक युद्ध लढले जाते. उदा., शत्रुपक्षाच्या क्षेत्रांतील विहिरी व इतर पाणवठे बुरशी किंवा जीवाणूंनी प्रदूषित केली जाऊ शकतात. त्यामुळे त्यातील पाण्याचा वापर करणारी माणसे रोगग्रस्त होऊ शकतात. १९३७ मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने चिनी शिपायांना आणि जनतेला प्लेगसंक्रामित अन्नपदार्थ वाटले होते. त्यामुळे आलेल्या प्लेग आणि पटकीच्या साथीत सु. साडेपाच लाख लोक मृत्युमुखी पावले. जैविक युद्धतंत्रामध्ये जैविक अस्त्रांचा वापर करून शत्रुपक्षाचे जवान आजारी पडणे किंवा त्यांचा शक्तिपात करणे व हालचालींवर मर्यादा आणणे किंवा शत्रुपक्षांच्या सैन्याचा अन्नसाठा नष्ट करणे वा प्रदूषित करणे जेणेकरून शत्रूचे सैन्य उपाशी मरेल, शत्रुपक्षाच्या क्षेत्रातील पिकांवर लढाऊ विमानाव्दारे जीवाणू, विषाणू व कीटक फवारून संपूर्ण पीक नष्ट करण्याचा प्रयत्न करणे वा तशी धमकी देणे, अशा बाबींचाही समावेश होतो. जैविक अस्त्रांचा वापर दहशतवादासाठीही होऊ शकतो. अशा दहशतवादाचा उल्लेख जैव दहशतवाद असा केला जातो.
जैविक युद्धात वेगवेगळ्या कारकांचा वापर केला जाऊ शकतो. बॅॅसिलस अँथ्रॅसिस, ब्रुसेला, क्लामिडोफिला, कॉक्सिएल, फ्रान्सिसेल्ला, रिकेट्शिया, व्हिब्रिओ कॉलेरी आणि यर्सिनिया पेस्टिस यांसारखे जीवाणू जैविक युद्धात वापरले जातात. तसेच बुनियावायरिडी, एबोला, फ्लॅविरीडी, माचुपो, मारबर्ग, व्हेरिओला आणि पीतज्वर विषाणूंचा वापर केला जातो. कॉक्सिडीऑॅयडी नावाची बुरशीही वापरली जाते. रिसीन व स्टॅफिलोकॉकसपासून मिळणारे एंटरोटॉक्सिन, बोट्युलिनापासून मिळविले जाणारे बोट्युलिनम आणि बुरशीपासून मिळविले जाणारे मायकोटॉक्सिन ही विषे वापरली जाऊ शकतात.
शत्रुपक्षाच्या देशांतील पिकांना नष्ट करण्यासाठी जैविक तणनाशके व कवकनाशके निर्माण करण्यात आली आहेत. पिकांवर गहूकरपा (व्हीटब्लास्ट) आणि भातकरपा (राइसब्लास्ट) यांसारखे रोग निर्माण करून पिके नष्ट करण्याचे धोरण अवलंबिता येते. वनस्पतींची पाने गळून पडावीत यासाठी काही जैवविषे वापरता येतात. गाय, बैल आणि घोडा यांसारख्या पाळीव प्राण्यांत लाळ्या, खुरकत व बुळकांडी हे रोग, डुकरात स्वाइन फ्ल्यू आणि कोंबडीत शुकरोग निर्माण करण्यासाठी जीवाणू, विषाणू इत्यादींच्या उपजाती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्याशिवाय पिके खाऊन फस्त करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकांचा वर्षाव करणे आता शक्य झाले आहे.
जैव तंत्रज्ञान शाखेतील आधुनिक दृष्टिकोनामुळे संश्लेषित जीवविज्ञानाचा वापर करून भविष्यात नवीन जैविक अस्त्रे निर्माण होऊ शकतात. यात एखादया रोगावरील लस परिणामशून्य करणे, विषाणुरोधी व जीवाणुरोधी कार्य करणाऱ्या औषधांना प्रतिरोध करणारी औषधे विकसित करणे, रोगकारक सूक्ष्मजीवांची प्रसारक्षमता वाढविणे, रोगकारक सूक्ष्मजीव ज्या आश्रयींवर वाढतात असे विविध आश्रयी शोधून काढणे, उपचारात्मक साधने उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करणे, जैविक कारकाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे इत्यादी तंत्रांवर भविष्यात संशोधन होऊ शकते.
जैविक युद्ध आतापर्यंत तात्कालिक व प्रातिनिधिक असेच झाले आहे. धमकी देण्याइतपत जैविक अस्त्रांचा साठा पुढारलेल्या राष्ट्रांपाशी आहे; परंतु अशा जैविक अस्त्रांवर नियंत्रण राहावे, यासाठी अनेक राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. १९७५ मध्ये जैविक तंत्राच्या वापरावर आंतरराष्ट्रीय करारानुसार बंदी आणली असून त्याला १७७ हून अधिक राष्ट्रांनी मान्यता दिली आहे.