मरवा ही सुगंधी बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅजोरॅना आहे. ती मॅजोरॅना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका येथील असून ती भारतात बागेमध्ये वाढविली जाते. मॅजोरॅना प्रजातीत सहा जाती असून त्यांपैकी वरील जातीची लागवड केली जाते.

मरवा (ऑरिगॅनम मॅजोरॅना) : पाने आणि फुलोरा यांसह वनस्पती

मरवा वनस्पतीचे खोड शाखित असून ती ३०–६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, राखट हिरवी, लहान व सुगंधी असतात. फुले पांढरट किंवा जांभळ्या रंगाची असून ती गुच्छात येतात. हे गुच्छ शेंड्याकडे येतात. फुलांची रचना तुळशीच्या कुलातील सब्जा व पुदिना या वनस्पतींसारखी असते. बिया अनेक व लहान असून त्यांचा रंग गर्द तपकिरी असतो. त्यांत तेल असते.

मरवा वनस्पतीची लागवड तिच्यापासून मिळणाऱ्या सुगंधी तेलासाठी केली जाते. पानांच्या आणि फुलांच्या ऊर्ध्वपातनाने तेल मिळवितात. तेल रंगहीन किंवा पिवळसर रंगाचे असते. तेलात अनेक रासायनिक संयुगे असून त्यांपैकी बोर्निऑल, पाइनीन व कापूर ही महत्त्वाची संयुगे असतात. या सुगंधी तेलाचा उपयोग साबण, अत्तर व मद्य यांमध्ये करतात. तसेच मसाल्याचे पदार्थ, भाजी व शिर्का यांमध्ये तिची पाने सुगंधाकरिता वापरतात. मरवा वनस्पती वायुनाशी असून कफ घालविणारी आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा