फळांनी लगडलेले खजुराचे झाड

अ‍ॅरॅकॅसी म्हणजेच ताड, नारळ अशा पाम वृक्षांच्या कुलातील हा एक वृक्ष आहे. याच्या ओल्या फळांनाही खजूर म्हणतात. तसेच वाळविलेला खजूर म्हणजेच खारीक. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फिनिक्स डॅक्टिलिफेरा असे आहे. हा वृक्ष किमान ५००० वर्षां पूर्वीपासून उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व आशियात वाढविला जात आहे. आजही ईजिप्त, सौदी अरेबिया, अल्जिरिया, इराण, इराक व पाकिस्तान येथील वाळवंटी प्रदेशांत याची लागवड केली जाते.

खजुराचे झाड सु. ३० मी. उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड जाड, टणक, शाखाहीन आणि खडबडीत असते. त्याची फुले सुवासिक असून जानेवारी ते जून या काळात येतात. नारळाप्रमाणे त्यांचा फुलोरा असतो. नरपुष्पात फुलोरा आखूड असतो, तर स्त्रीपुष्पात तो अधिक लांब असतो. स्त्रीपुष्प हिरवट तर नरपुष्प पांढरे असते. या झाडाचे परागकण वार्‍यामुळे होते. नरपुष्पांचे फुलोरे मादीपुष्पांवर बांधून कृत्रिम रीत्या परागण घडवून आणतात. ही पद्धत सिरियन लोकांना प्राचीन काळापासून माहीत होती, असे पुरावे आहेत. परागणासाठी एक नर झाड ५० मादी झाडांना पुरेसे असते. नर झाडे कमी तर मादी झाडे जास्त आवश्यक असल्याने मादी झाडांना येणार्‍या फुटव्यांपासून नवीन लागवड करणे, अधिक पसंत केले जाते. मृदुफळे २ ते ७ सेंमी. लांब, अंडाकृती आणि लालसर व पिंगट असतात. बियांवर एका बाजूला उभी खाच असते.

पिकलेला खजूर खाल्ला जातो. ताजा खजूर उन्हात वाळवून किंवा दुधात शिजवून खारीक तयार केली जाते. इतर फळांच्या तुलनेत खजुरात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम ताज्या खजुरापासून १४४ ऊष्मांक, तर सुक्या खजुरापासून (खारकेपासून) सु. ३१७ ऊष्मांक मिळतात. दरवर्षी एक झाड सु. ४५ किग्रॅ. खजूर देते आणि सु. ६० वर्षांपर्यंत ते उत्पादन देते.

खजुरात लोहाचे प्रमाण भरपूर असते. पांडुरोगात किंवा शरीरात रक्ताची कमतरता आढळल्यास खजूर खायला देतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त तर सोडियमचे प्रमाण कमी असेत. ताज्या खजुरापासून कोशिंबीर, चटणी आणि लोणची बनविली जातात. खजुराचा उपयोग केक आणि पुडिंग बनविण्याकरिता होतो. पाने छपरासाठी आणि चटया बनविण्यासाठी वापरतात. फांद्यांपासून मिळणार्‍या काथ्याचा वापर दोर तयार करण्यासाठी केला जातो. फुलोर्‍याचा उपयोग केरसुणी व ब्रशसाठी केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा