शिसवी (डाल्बर्जिया सिसू) : (१) वनस्पती, (२) पाने, (३) फुले, (४) शेंगा, (५) लाकूड.

(इंडियन रोझवुड). एक मोठा पानझडी वृक्ष. शिसवी हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डाल्बर्जिया सिसू आहे. बाभूळ, कुळीथ (हुलगा), वाटाणा, घेवडा इत्यादी वनस्पतीही फॅबेसी कुलातीलच आहे. शिसवी या वृक्षाला ‘शिसम’, ‘शिसू’ अशीही नावे आहेत. तो मूळचा दक्षिण इराण आणि भारतीय उपखंड येथील आहे. भारतात सिंधू खोऱ्यापासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश, हिमालयाच्या पायथ्याचे प्रदेश, दक्षिण भारत व श्रीलंका येथे हा वृक्ष आढळून येतो. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमालयातील प्रदेश व आसाम या भागात या वृक्षाची लागवड केली जाते. भारतातील पंजाब राज्याचा शिसवी हा राज्यवृक्ष आहे, तर पाकिस्तानातील पंजाब प्रांताने त्याला प्रांतीय वृक्षाचा दर्जा दिलेला आहे.

शिसवीचा वृक्ष सु. २५ मी. उंच वाढतो. परंतु, सामान्यपणे तो लहान असतो. खोडाचा व्यास २-३ मी.पर्यंत असतो. मोकळ्या जागेत वाढलेल्या शिसवीची खोडे वाकडीतिकडी वाढलेली असतात. फांद्या अनेक व पसरट असून कोवळेपणी लवदार असतात. साल गडद तपकिरी, भेगाळलेली असते. पाने संयुक्त, मोठी, एकाआड एक व चामड्यासारखी चकचकीत असतात; पर्णिका ३–५ असून त्या ३–८ सेंमी. लांब, अंडाकृती परंतु, टोकदार असतात. टोकाकडील पर्णिका अधिक मोठ्या, तर देठाजवळील पर्णिका लहान असतात. फुले पानांच्या बगलेत स्तबक अथवा परिमंजरी फुलोऱ्यात येतात. फुले सुगंधी, लहान असून फुलांचा गुच्छ ५–१० सेंमी. लांब असतो. फूल ७–८ मिमी. लांब, पिवळसर पांढरे, घेवड्याच्या किंवा गोकर्णाच्या फुलासारखी रचना असलेले, एक पाकळी मोठे असलेले, पुंकेसर एकत्र जोडलेले असतात. शेंग ४–८ सेंमी. लांब, पातळ, चपटी असून दोन्ही टोकाला टोकदार असते व पिकल्यावर तडकते. पिकल्यावर शेंग पिवळसर तपकिरी होते. एका शेंगेत १–४ सूक्ष्म, सपाट, काजूच्या आकाराच्या बिया असतात. शिसवीमध्ये सोटमुळे येतात, त्यापासून मुनवे तयार होतात.

शिसवीची लागवड बिया लावून अथवा मुनवे लावून केली जाते. वाळू, खडे, गोटे अशा जागेतील जमिनीत हा वृक्ष चांगला वाढतो. पद्धतशीर लागवड केलेल्या रोपवनांत साधारणपणे २० महिन्यांत शिसवीची झाडे ६–७ मी. उंच वाढतात. खासकरून फर्निचरच्या लाकडाकरिता शिसवी वृक्ष मोठ्या प्रमाणात वापरला जातो. शिसवीच्या लाकडातील रसकाष्ठ पांढरे ते फिकट तपकिरी असते; मध्यभाग सोनेरी पिंगट असून त्यावर गर्द रेषा असतात. शिसवीचे ओंडके सरळ व लांब असतात. त्यापासून उच्च दर्जाचे सजावटी सामान, पेट्या, कपाटे इत्यादी तयार करतात. तसेच लाकूड इमारतीच्या बांधकामासाठी, कागद उद्योगात, कोळसानिर्मिती आणि जळणासाठी वापरतात. पाने कडू व उत्तेजक असून त्यांचा वापर परमा रोगावर करतात. बियांचे तेल त्वचारोगांवर उपयुक्त असते. पाला जनावरे खातात.