टोमॅटो ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम लायकोपर्सिकम आहे. धोतरा, बटाटा, तंबाखू या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. टोमॅटो वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी सोळाव्या शतकाच्या मध्यास ही वनस्पती मेक्सिकोतून यूरोपात आणली. त्यानंतर स्पेन आणि इटली या देशांत टोमॅटोची लागवड खाण्यासाठी होऊ लागली. प्रारंभी टोमॅटोचे फळ विषारी आहे असे वाटल्याने अनेक लोकांनी हे फळ खाण्यास विरोध केला. परंतु, सतराव्या शतकाच्या मध्यास यूरोपीय देशांत या फळाचा वापर खाण्यासाठी होऊ लागला. भारतात टोमॅटोची लागवड १९०० सालाच्या सुमारास सुरू झाली.

टोमॅटो वनस्पती व फळे

टोमॅटो टोमॅटोची वेल वर्षायू असून ती जमिनीवर पसरत वाढते किंवा आधाराने वाढवितात. १–३ मी.पर्यंत उंच वाढणाऱ्या वेलीचे खोड कमकुवत असते. या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. खोडावर आणि पानांवर लहान लव असते. पाने संयुक्त, पिच्छाकृती व एकाआड एक असतात. फुलोरा मंजिरी प्रकारचा असून त्यावर ४–१२ पिवळी व लोंबणारी फुले गुच्छात येतात. मृदुफळे १.२५–७.५० सेंमी. व्यासाची किंवा त्याहून मोठी असतात. कच्ची फळे हिरवी असून पिकल्यावर ती लाल, पिवळी किंवा शेंदरी रंगाची होतात. कच्च्या फळांवर मऊ, लांब व विरळ लव असते तर पिकलेली फळे गुळगुळीत व चकचकीत असतात. फळांचा आकार गोल, अंडाकार, लंबगोल किंवा लांबट व टोकाकडे निमुळता असतो. आतील भाग मांसल असून त्यात अनेक बिया असतात. बियांवर चिकट पदार्थाचे आवरण असते.

जगात सर्वत्र या वनस्पतीचे विविध वापरांसाठी सु. ७,५०० वाण पिकविले जातात. बटाटा आणि रताळी या भाज्यांच्या खालोखाल टोमॅटो पीक म्हणून घेतले जाते. जगात उत्पन्नाच्या उतरत्या क्रमाने चीन, अमेरिका, भारत, टर्की, ईजिप्त या देशांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने टोमॅटो हे फळ आहे. मात्र त्यात फळशर्करेचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे टोमॅटो ही भाजी आहे, असे मानतात. टोमॅटोची पाने, खोड व कच्ची फळे यांत टोमॅटीन नावाचा विषारी घटक असतो. कच्ची फळे मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यास ते घातक ठरू शकते. टोमॅटोचे फळ आम्लधर्मी असून त्यात ‘क’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. पिकलेल्या फळांत असलेल्या लायकोपीन (एक प्रतिऑक्सिडीकारक) नावाच्या कॅरोटीनमुळे त्यांना लाल छटा येतात. या घटकामुळे कर्करोग आणि इतर आजार रोखता येतात. टोमॅटोच्या सेवनामुळे पुर:स्थ ग्रंथीला होणारा कर्करोग टाळता येतो, असे काही अभ्यासातून आढळले आहे.

टोमॅटोच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा आहारात उपयोग करण्यात येतो. कच्चे टोमॅटो शिजवून आणि पिकलेले टोमॅटो न शिजविता अगर शिजवून रस, चटणी, कोशिंबीर, सार, केचप, सॉस, सूप व सूप-पुड या विविध स्वरूपांत त्यांचा वापर करतात. टोमॅटोचा रस भूक लागण्यासाठी भोजनापूर्वीचे पेय म्हणून घेतात. जगात सर्वत्र टोमॅटोपासून टिकाऊ खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग आहेत. टोमॅटोच्या फळांपासून रस, केचप, सॉस, चटणी व सूप असे पदार्थ तयार करून व ते बाटल्यांत भरून विकले जातात.