ज्येष्ठमध वनस्पतीची पानाफुलोऱ्यांसह फांदी

ज्येष्ठमध ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लिसिऱ्हायझा ग्लॅब्रा आहे. ती मूळची यूरोप आणि आशियाच्या भागातील असून चीन, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन व हंगेरीत रानटी अवस्थेत सापडते. भारतात विशेषेकरून मऱ्हाराष्ट्रात तिची लागवड करतात. जम्मू, इंदूर, हिस्सार व बंगळुरू येथे या वनस्पतीवर संशोधन केले जात आहे. ‘ग्लिसिऱ्हायझा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘गोड मूळ’ असा आहे. ग्लिसिऱ्हायझा प्रजातीच्या सु. १२ जाती असून ग्लि. ग्लॅब्रा ही जाती महत्त्वाची आहे.

ज्येष्ठमध ही वनस्पती सु.१ मी. उंच असते. तळाकडून या वनस्पतीला फांदया फुटलेल्या असतात आणि त्यावर संयुक्त, गुंजेच्या पानांप्रमाणे पिसांसारखी व ७ – १५ सेंमी. लांब पाने असतात. पर्णिका ९ – १७ व विषम संख्येत येतात. फुले लऱ्हान व मोठ्या दांड्यांवर मंजिरीत येतात. फुलांचा रंग गुलाबी किंवा फिकट जांभळा असतो. फळ (शेंग) चपटे व ३ – ४ सेंमी. लांब असून त्यात २ – ५ बिया असतात. बिया तपकिरी, बुळबुळीत व गोलाकार परंतु चारी कोनात फुगीर असतात.

ज्येष्ठमध: वाळलेल्या खोडाचे तुकडे

औषधांत ज्येष्ठमध या वनस्पतीची सावलीत वाळविलेली मुळे वापरतात; ती पिवळी, मऊ, लवचिक व तंतुमय असतात. मुळांमध्ये असलेले ग्लिसिऱ्हायझिन हे साखरेपेक्षा ५० पट गोड असते. ज्येष्ठमधात ग्लुकोज, सुक्रोज, स्टार्च, राळ तसेच बाष्पनशील तेल इत्यादी घटक असतात. जेष्ठमधाची मुळी व साल औषधी असून दमा, खोकला, शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास व लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर गुणकारी आहेत. ज्येष्ठमधाची मुळी आणि पूड घसा मोकळा करण्यासाठी वापरतात. तंबाखूच्या उत्पादनांना गोड वास आणण्यासाठी ज्येष्ठमध वापरतात.