प्राणी हे इतर सजीवांपेक्षा, विशेषेकरून वनस्पतींपेक्षा वेगळे आहेत. सर्व प्राण्यांचा समावेश प्राणिसृष्टीत केला जात असून छिद्री संघापासून रज्जुमान संघापर्यंत त्यांचे वर्गीकरण केले गेले आहे (पहा: प्राणिसृष्टी). प्राण्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्राणिविज्ञान म्हणतात. सध्या माहीत असलेल्या प्राणिजातींची संख्या सु. १५ लाख असून त्यात नवीन जातींची भर पडतच आहे.

सर्व प्राणी बहुपेशीय असून त्यांच्या पेशी दृश्यकेंद्रकी असतात. सर्व प्राणी पेशींना पेशीपटल हेच बाह्य आवरण असून त्यांच्यात वनस्पती पेशींप्रमाणे सेल्युलोजची पेशीभित्तिका आणि पेशीद्रव्यात हरितलवके नसतात. प्राणी पेशीतील रिक्तिका तात्पुरत्या व आकाराने लहान असतात. तसेच पेशींमध्ये तारककाय (सेंट्रोसोम) असते. वनस्पती पेशींमध्ये तारककाय नसते. पेशीविभाजन होताना अंतिम टप्प्यावर प्राणी पेशीपटलाला आडवी खाच पडते. वनस्पती पेशीत अशी खाच पडत नसते, तेथे पेशीपट्टिका तयार होते. वनस्पतींप्रमाणे प्राणी स्वत:चे अन्न तयार करू शकत नाहीत. त्यामुळे प्राणी परपोषी असतात आणि अन्नासाठी वनस्पती अथवा इतर प्राण्यांवर अवलंबून राहतात. परपोषी असल्यामुळे त्यांच्यात पचन संस्था असते. प्राणी खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जानिर्मिती करतात व त्यासाठी ते हवेतील ऑक्सिजन वापरतात. हा ऑक्सिजन श्‍वसन संस्थेमार्फत घेतला जातो आणि याच क्रियेत कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. प्राण्यांच्या शरीरात प्रत्येक पेशीपर्यंत अन्न आणि ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी अभिसरण संस्था असते.

बहुतांशी प्राणी हालचाल करीत असून त्यांचे शरीर हालचालीसाठी अनुरूप झालेले असते. जे प्राणी स्थिर असून आधाराला चिकटलेले असतात, ते पाण्याचा प्रवाह निर्माण करून त्यातून अन्न स्वत:कडे ओढून घेतात. बहुतेक प्राण्यांना विशिष्ट रूप आणि आकार असून त्यासाठी त्यांना अंत:कंकाल किंवा बाह्यकंकाल अथवा दोन्ही संरचना असतात. प्राण्यांच्या आकारात आणि आकारमानात खूप विविधता असते. त्यांची वाढ मर्यादित असते आणि वाढ पूर्ण झाली की नवीन अवयव निर्माण होत नाहीत. अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे प्राण्यांना अन्न शोधणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना ज्ञानेंद्रिये आणि चेतासंस्था असतात. सर्व प्राण्यांमध्ये दैनिक आणि ऋतूनुसार बदलणारी लयबद्धता आढळते. सामान्यपणे सर्व शरीरक्रियांचा समतोल साधून शरीरातील प्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न प्राणी करतात. याला अंत:स्थितीय स्थिरता म्हणतात. त्यांच्यात अलैंगिक तसेच लैंगिक प्रजनन घडून येते. प्राण्यांमध्ये विशिष्ट जीवनचक्र असून त्यांना ठराविक आयु:काल असतो.

प्राणी आणि प्राणिसमूह परिसराशी एकरूपता साधतात व त्यामुळे अनुकूलन घडून येत असते. सस्तन प्राण्यांमध्ये, विशेषत: मानवात, भौगोलिक परिस्थितीनुसार जन्माला येणाऱ्या नवीन पिढ्यांमध्ये रूप, आकारमान इत्यादी लक्षणांमध्ये साम्य आढळते. मानवासहित अनेक सस्तन प्राण्यांमध्ये आनुवंशिकतेद्वारे निश्‍चित अशी शरीराची संरचना असते.

पहिले प्राणी प्रोटिस्टा सृष्टीपासून उत्क्रांत झाले असून अजूनही त्यांच्यात उत्क्रांती घडून येत आहे. प्राण्यांची उत्क्रांती घडून येत असताना अनेक प्राणी आणि त्यांच्या जाती विलुप्त झाल्या आहेत. उत्क्रांतीमुळेच प्राण्यांमध्ये विविधता निर्माण झाली आहे. आज अस्तित्वात असलेल्या प्राणिजाती या नैसर्गिक निवडीनुसार घडून आलेल्या उत्क्रांतीमधून उरलेल्या जाती आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा