हार्डन, सर आर्थर : (१२ ऑक्टोबर १८६५ – १७ जून १९४०).
ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी शर्करेच्या किण्वण (फर्मेंटेशन; fermentation) क्रियेवर आणि या क्रियेतील विकरांवर (Enzyme) संशोधन केले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९२९ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वीडनचे जीवरसायनशास्त्रज्ञ हान्स कार्ल आउगुस्ट सायमन फोन ऑयलर केल्पिन (Hans karl August Simon von Euler Chelpin) यांच्यासोबत विभागून मिळाले.
हार्डन यांचा जन्म मँचेस्टर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ॲल्बर्ट त्यास हार्डन आणि आईचे नाव एलिझा मॅकालीस्टर असे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडच्या स्टॅफर्डशर येथील टेटनहॉल महाविद्यालयामध्ये झाले (Tettenhall College; १८७७–८१). १८८२ मध्ये त्यांनी ओवेन्स महाविद्यालयामध्ये (Owens College) प्रवेश घेतला. (ओवेन्स महाविद्यालयाचेच आता मँचेस्टरविद्यापीठात (University of Manchester) रूपांतर झाले आहे). १८८५ मध्ये त्यांनी याच ठिकाणी रसायनशास्त्रात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
हार्डन यांना १८८६ मध्ये रसायनशास्त्रातील डाल्टन शिष्यवृत्ती (Dalton Scholarship) मिळाली आणि जर्मनीतील एर्लांगेन (Erlangen) येथे जेष्ठ रसायनशास्त्रज्ञ ओटो फिशर (Otto Fischer) यांच्याबरोबर संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८८८). त्यानंतर पुन्हा मँचेस्टर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून परत आले आणि पुढे १८९७ पर्यंत तेथेच कार्यरत राहिले. पुढे त्यांची नियुक्ती ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन (British Institute of Preventive Medicine) या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेत झाली. याच संस्थेचे पुढे लेस्टर इन्स्टिट्यूटमध्ये (Lister Institute) रुपांतर झाले. त्यांनी १९०२ मध्ये मँचेस्टरच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली (याचेच नाव आता मँचेस्टर विद्यापीठ असे आहे). पुढे सुमारे पाच वर्षाच्या कालावधीनंतर १९०७ मध्ये त्यांची या विद्यापीठातील जीवरसायन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि याच पदावर ते सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे १९३० पर्यंत राहिले. त्यांनी त्यांचे संशोधनाचे काम याच ठिकाणी पुढे चालू ठेवले. १९१२ साली त्यांना लंडन विद्यापीठाने रसायनशास्त्राचे एमेरीटस् प्रोफेसर (Emeritus Professor) हे पद दिले.
हार्डन यांनी मँचेस्टर विद्यापीठात कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरीन यांच्या मिश्रणातील रासायनिक क्रियेवर प्रकाशाच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आणि जेव्हा ते ब्रिटीश इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन (लेस्टर इन्स्टिट्यूट) मध्ये आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रणालींचा वापर जीवाणूंच्या रासायनिक क्रियेच्या अभ्यासासाठी आणि अल्कोहोल किण्वनाच्या संशोधनासाठी केला. त्यांनी ग्लुकोज (Glocose) या शर्करेचे विघटन झाल्यानंतर तयार होणाऱ्या घटकांचा आणि यीस्टमधील रसायनांचा अभ्यास केला. तसेच त्यांनी अँटिस्कॉरब्युटिक (antiscorbutic) आणि अँटिन्युरीटिक व्हिटॅमिन्सवर (anti-neuritic vitamins) अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
हार्डन यांनी अल्कोहॉलिक फर्मेंटेशन (Alcoholic Fermentation ;१९११) तसेच एच्. ई. रॉस्को यांच्यासमवेत ए न्यू व्ह्यू ऑफ द ओरिजिन ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी (A New View of the Origin of Dalton’s Atomic Theory ;१८९६) यांचे लेखन आणि प्रकाशन केले. ते द बायोकेमिकल जर्नल (The Biochemical Journal; १९१३–३०) या नियतकालिकाचे सहसंपादक होते
हार्डन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते फेलो होते (१९०९). रसायनशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि अल्कोहोलकिण्वनावरील मुलभूत संशोधनाबद्दल डेव्ही मेडल (Davy medal) हा पुरस्कार मिळाला (१९३५) तसेच सर (नाइट) हा किताब (१९३६) यांसारखे अनेक मानसन्मान मिळाले.
हार्डन यांचे वयाच्या ७४व्या वर्षी बोर्न (बकिंगहॅमशर, इंग्लंड) येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Arthur_Harden
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1929/harden-bio.html
- Hopkins, F. G.; Martin, C. J.(1942). “Arthur Harden. 1865-1940”.
- http://rsbm.royalsocietypublishing.org/content/4/11/2
- Manchester, K. (2000). “Arthur Harden: An unwitting pioneer of metabolic control analysis”. http://www.cell.com
- https://en.wikisource.org/wiki/Author:Arthur_Harden
समीक्षक – रंजन गर्गे
#जीवरसायनतज्ज्ञ, # १९२९सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार,#अल्कोहोल किण्वन