ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (आफ्रिकॅनस) ही मानव आणि कपी यांची एक महत्त्वाची प्रजात. साधारण ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात ही प्रजात अस्तित्वात होती. ‘आफ्रिकानसʼ याचा अर्थ ‘आफ्रिकेत आढळलेला दक्षिणेकडील कपीʼ असा आहे. या प्रजातीच्या पहिल्या जीवाश्माचा (त्वांग बालक) शोध आफ्रिकन भौतिकी मानवशास्त्रज्ञ रेमंड डार्ट यांना लागला (१९२४). मात्र पुढील वीस वर्षांनी या प्रजातीला मानवी उत्क्रांतीशी संबंधित दुवा म्हणून मान्यता मिळाली.

दक्षिण आफ्रिकेत स्टर्कफोंतेन येथे मिळालेले एसटीएस-५ (मिसेस प्लेस), एसटीएस-७१, एसटीएस-१४ (२५ लक्ष वर्षपूर्व) आणि मॅकापान्सगाट येथे मिळालेला लहान वयाच्या प्राण्याचा जीवाश्म (एमएलडी-५) ही ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानसची त्वांग बालकाखेरीज इतर महत्त्वाची उदाहरणे आहेत. हे सर्व जीवाश्म दक्षिण आफ्रिकेतच मिळाले.

या प्रजातीच्या नरांची उंची सरासरी १३८ सेंमी. व सरासरी वजन ४१ किग्रॅ. होते, तर माद्यांची सरासरी उंची ११५ सेंमी. व सरासरी वजन ३० किग्रॅ. होते. त्यांचे सुळे (Canine teeth) ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसपेक्षा आकाराने छोटे होते, परंतु चेहरा मोठा होता. तसेच कवटीचे आकारमान ४२० ते ५०० घ. सेंमी. दरम्यान असून मेंदूचा आकार चिंपँझींच्या प्रमाणेच छोटा होता. त्यांच्या कमरेच्या हाडाची रचना आणि मागच्या पायांची हाडे बघता हे प्राणी मानवाप्रमाणेच द्विपाद होते, हे स्पष्ट दिसते. असे असले, तरी खांदे व पुढील दोन पायांच्या हाडांची रचना झाडांमध्ये वावरण्यासाठी उपयुक्त होती.

ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानसचा आहार सर्वसाधारणपणे चिंपँझींसारखा असून ते पाने, फुले, फळे, बिया, कीटक आणि अंडी खात असत. पुरामानवशास्त्रात दीर्घकाळ हे प्राणी शिकार करत होते, असे नमूद आहे; तथापि त्यांनी वापरलेली कोणतीही हत्यारे अद्याप मिळालेली नाहीत. उलट १९७०-१९८० नंतरच्या संशोधनातून ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस हे सिंह, बिबटे आणि तरस यांचे भक्ष्य होते, असे दिसून आले आहे. दातांच्या अभ्यासातून यांच्या आहारात काही प्रमाणात मांसाचा समावेश होता, असे आढळले. बहुधा ते मरून पडलेल्या प्राण्याचे किंवा इतरांनी टाकून दिलेले मांस गोळा करून (scavenging) खात असावेत. त्यांचा उल्लेख नाजूक बांध्याचा ऑस्ट्रेलोपिथेकस असाही होतो; तरीही आधुनिक मानवापेक्षा ते दणकटच होते.

संदर्भ :

  • Clarke, R. J.; Tobias, P.V. ‘Sterkfontein Member 2 Foot Bones of the Oldest South African Hominidʼ, Science : 269, pp. 521-524, 1995.
  • Dart, Raymond, ‘Australopithecus africanus : The man-ape of South Africaʼ, Nature : 115, pp.195-199, 1925.
  • Lacruz, R. S.; Rozzi, F. R. & Bromage, T. G. ‘Dental enamel hypoplasia, age at death, and weaning in the Taung child, South African Journal of Science : 101, pp. 567-569, 2005.

समीक्षक – शौनक कुलकर्णी