ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा हे एका नव्याने सापडलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचे नाव आहे. इथिओपियात अफार भागात वोरान्सो-मिली या ठिकाणी इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी यांना या प्रजातीचे जीवाश्म आढळले (२०११). हे ठिकाण प्रसिद्ध ल्युसी जीवाश्म मिळालेल्या हडार या पुरामानवशास्त्रीय ठिकाणापासून उत्तरेस ५० किमी. अंतरावर आहे.

बर्टेले (Burtele) या स्थळावर मिळालेला वरचा जबडा हा या प्रजातीचा मुख्य नमुना (बीआरटी-व्हीपी-३/१) आहे. तसेच वेतालेता (Waytaleyta) या स्थळावर वरचा आणि खालचा जबडा असे आणखी जीवाश्म मिळाले. तथापि या प्रजातीबद्दल अद्याप फार कमी माहिती उपलब्ध आहे. हाइली-सेलॅसी यांना २०१२ मध्ये बर्टेले येथेच एक पायाचा जीवाश्म मिळाला; परंतु या जीवाश्माचा समावेश ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडामध्ये करण्यात आलेला नाही.

‘डेअिरेमेडाʼ याचा स्थानिक अफार भाषेतील अर्थ ‘जवळचा नातेवाईकʼ असा आहे. ही प्रजात ३५ ते ३३ लक्षपूर्व या काळात अस्तित्वात होती. याचा अर्थ असा की, ल्युसीची ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस ही प्रजात आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा या प्रजातीचे प्राणी एकाच काळात अफार भागात अस्तित्वात होते. मध्य प्लायोसीन कालखंडात मानवी उत्क्रांतीशी संबंधित एकापेक्षा जास्त प्रजाती जगत होत्या, हे ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा प्रजातीमुळे स्पष्ट झाले. ल्युसीची प्रजात आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा यांच्या दातांमध्ये लक्षणीय फरक आहे. डेअिरेमेडा प्रजातीच्या दातांवर इनॅमलचे (दातांचे लुकन) जाड कवच आहे. तसेच जबडे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसच्या तुलनेत अधिक दणकट आहेत. या दोन्ही प्रजातींचा आहार बहुधा वेगवेगळा होता आणि त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा न झाल्याने त्या एकाच वेळी जगू शकल्या, असे अनुमान काढण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Haile-Selassie, Y.;  Gibert, L.;  Melillo, S.M.; Ryan, T.M.; Alene, M.; Deino, A.; Levin, N. E.; Scott, G.& Saylor, B. Z. ‘New species from Ethiopia further expands Middle Pliocene hominin diversityʼ, Nature  : 521, pp. 483-488, 2015.
  • Spoor, Fred. ‘Palaeoanthropology: The middle Pliocene gets crowdedʼ, Nature : 521, pp. 432-433, 201

                                                                                                                                                                                                                  समीक्षक – शौनक कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा