डार्ट, रेमंड : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८).

प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन भौतिकी मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शाखेचे शिक्षण क्वीन्सलंड व सिडनी या विद्यापीठांमध्ये झाले. पहिल्या महायुद्धात वैद्यक म्हणून काही काळ सेवा बजावल्यानंतर डार्ट यांनी मँचेस्टर विद्यापीठात ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ जी. इ. स्मिथ (१८७१–१९३७) यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन केले. जोहॅनिसबर्गमध्ये त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या विटवॅाटर्सरॅन्ड विद्यापीठात डार्ट यांची शरीरशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१९२२).

दक्षिण आफ्रिकेतील त्वांग येथील खाणीत मिळालेल्या बबून माकडांच्या जीवाश्मांचा अभ्यास करताना त्यांना त्वांग बालक (Taung child) हा प्रसिद्ध जीवाश्म आढळला. डार्ट यांनी १९२५ मध्ये हा जीवाश्म मानव व कपी यांच्या उत्क्रांतीतील दुवा आहे, असे सांगून त्याचे ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस असे नामकरण केले. परंतु त्यावेळी पिल्टडाउन मानव (पुढील काळात बनावट ठरलेला) हा मानवाचा पूर्वज असल्याचे सर्वमान्य प्रचलित मत होते. तसेच पेकिंग मॅन (Peking Man)  नावाने प्रसिद्ध झालेल्या होमो इरेक्टस जीवाश्मामुळे मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ यूरोप अथवा आशियात झाला असावा, या तत्कालीन सिद्धांतांमध्ये त्वांग बालक बसू शकत नव्हते. सर आर्थर किथ (१८६६–१९५५) या विख्यात स्कॅाटिश मानवशास्त्रज्ञांनी डार्टचे त्वांग बालक  हे केवळ कपीचे पोर असून त्याचा मानवी उत्क्रांतीशी काहीही संबंध नाही, अशी संभावना केली.

ट्रान्सवाल संग्रहालयातील पुराजीववैज्ञानिक रॅाबर्ट ब्रूम यांना दक्षिण आफ्रिकेत १९३० ते १९४० दरम्यान इतर ठिकाणी ऑस्ट्रॅलोपिथेकसचे अनेक जीवाश्म आढळले. यानंतर मात्र मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ आफ्रिकेत झाला आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवाचे पूर्वज असल्याचे डार्ट यांचे मत सिद्ध झाले. नंतरच्या काळात सर आर्थर किथ यांनीही आपली चूक मान्य केली.

विटवॅाटर्सरॅन्ड विद्यापीठात शरीरशास्त्र विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम करताना डार्ट यांचे संशोधन सुरूच होते (१९२५–४३). या काळात माकापन्सगात (Makapansgat) येथे ऑस्ट्रॅलोपिथेकसचे अनेक जीवाश्म आढळले. त्यांचा काळा रंग पाहून ते जळाले असावेत, अशा समजूतीने डार्टनी त्यांना ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रोमिथिअस (ग्रीक मिथ्यकथेतील मानवांना अग्नी देणारा प्रोमिथिअस यावरून) असे नाव दिले. पुढे हे जीवाश्म ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानसचेच असल्याचे सिद्ध झाले. डार्ट यांनी माकापन्सगात येथील जीवाश्मांचा अभ्यास करून ही प्रजात अतिशय हिंसक वृत्तीची असावी, असे प्रतिपादन केले. अश्मयुगापूर्वी हाडे, दात आणि शिंग यांचा अवजारे व हत्यारे म्हणून वापर होत असलेला ‘अस्थियुगʼ  असा कालखंड असावा, अशी कल्पना करून डार्टनी या संस्कृतीला ‘ऑस्टिओडोन्टोकेराटिकʼ (Osteodontokeratic) म्हणजे ‘हाड, दात आणि शिंग संस्कृतीʼ असे नाव दिले. अर्थातच डार्ट यांची ही खळबळजनक मते वैज्ञानिक जगतात मान्य झाली नाहीत. परंतु हिंसक प्रवृत्तीचे व रक्ताला चटावलेले ‘मारेकरी कपीʼ (Killer Ape) ही कल्पना प्रचलित होण्यामागे डार्ट यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. अमेरिकन लेखक रॅाबर्ट  आरड्रे (१९०८–१९८०) यांनी आफ्रिकन जेनेसिस  (१९६१) या पुस्तकात मानवाचे पूर्वज मुळातच हिंसक होते व आजही तो स्वभाव टिकून आहे, अशी ही कल्पना मांडली होती. ती माकापन्सगात येथील डार्ट यांच्या संशोधनावर आधारित होती.

डार्ट यांची काही विधाने धाडसी असली, तरी पुरामानवशास्त्राच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. डार्ट यांच्या संशोधनामुळे मानवी उत्क्रांतीसंबधी संशोधनाला कलाटणी मिळाली, हे स्पष्ट दिसते. आफ्रिकेत मानवी उत्क्रांतीसंबधी संशेाधन करण्यासाठी जोहॅनिसबर्ग येथे स्थापन झालेल्या संस्थेला डार्ट यांचे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

डार्ट यांचे जोहॅनिसबर्ग येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Dart, Raymond A. ‘Australopithecus africanus: The Man-Ape of South Africaʼ, Nature, Volume 115 (2884), pp. 195-199, 1925.
  • Tobias, P. V.  Dart, Taung and the Missing Link, Johannesburg, 1984.
  • Wheelhouse, F. Raymond Arthur Dart : a pictorial profile, Hornsby, Transpareon Press, Australia, 1983.

समीक्षक – शौनक कुलकर्णी