जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था. त्याचे मुख्यालय बर्लिन येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना १५ ऑक्टोबर १८१० रोजी विल्हेल्म हंबोल्ट यांनी केली. हे विद्यापीठ १९४५ पर्यंत फ्रीड्रिख विल्हेल्म विद्यापीठ या नावाने विख्यात होते. नंतर ते बर्लिन विद्यापीठ म्हणून नावारूपास आले. त्यानंतर ८ फेब्रुवारी १९४९ रोजी त्याचे हंबोल्ट विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. अध्यापन आणि संशोधन यांचे ऐक्य साधून ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानोपयोजन यांतून मानवी विकास साधावा, हा उदात्त हेतू हे विद्यापीठ स्थापन करण्यामागे होता.

हंबोल्ट विद्यापीठ

हंबोल्ट विद्यापीठाचे पहिले सत्र १८१० मध्ये सुरू झाले. त्या वेळी विद्यापीठात ५२ अधिव्याख्याते आणि २५६ विद्यार्थी होते. सुरुवातीला विद्यापीठात वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान, कायदा आणि धर्मशास्त्र या विषयांच्या उच्चशिक्षणाची सोय होती. वेगवान वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या–विसाव्या शतकांत विद्यापीठाने अनेक शाखोपशाखा सुरू करून अद्ययावत शिक्षणपद्धतीचा अवलंब केला आहे. विद्यापीठात विधी; जीवविज्ञान (३ उपशाखा); कला (४ उपशाखा); धर्मशास्त्र; वैद्यकशास्त्र; संस्कृती, सामाजिक व शिक्षण (५ उपशाखा); गणित व प्रकृतिविज्ञाने (५ उपशाखा); भाषाशास्त्र व वांङ्मयशास्त्र (७ उपशाशाखा) आणि अर्थशास्त्र व व्यापार अशी एकूण ९ विद्याशाखा आहेत. त्याचप्रमाणे ३ केंद्रीय संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट); ५ केंद्रीय सुविधा (सेंट्रल फॅसिलिटीज) आणि ५ आंतरशास्त्रीय केंद्रे (इंटरडिसिप्लीनरी सेंटर्स) या शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत (२०१८-१९). विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक असून येथे सत्रपद्धतीचा अवलंब केला जातो. चार वर्षांच्या अध्ययनानंतर विद्यार्थ्यांना पदवीपरीक्षा देता येते. याशिवाय परीक्षेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना ‘डिप्लोमार्बिटा’ या नावाने संबोधण्यात येणारा प्रबंधही लिहावयाचा असतो. प्रस्तुत पदवीपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी रोजगारक्षम बनतात. संशोधन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ठराविक कालावधीकरिता अध्ययन व अध्यापन करावे लागते.

वाचनालय, हंबोल्ट विद्यापीठ

विद्यापीठाने अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तीनही पातळ्यांवर महिलांच्या क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. त्यासाठी खास महिलांसाठी स्वतंत्र प्रशालांची निर्मिती केली आहे. विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असून सु. १०० विविध देशांतील विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येतात. जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रिड्रिख हेगेल, वाल्टर बेंजामिन, ॲल्बर्ट आइनस्टाइन, कार्ल मार्क्स, फ्रीड्रिख एंगेल्स, योहान क्रिस्टोफ फ्रीड्रिख फोन शिलर, ऑटोफोन बिस्मार्क, हाइन्रिख हाइन यांसारख्या जागतिक तज्ज्ञांनी या विद्यापीठात अध्ययन केले असून विद्यापीठाशी संबंधित असलेल्या सुमारे २९ तज्ज्ञांना आपापल्या विषयातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. जर्मनीचा संपन्न सांस्कृतिक वारसा, जर्मनीचे विभाजन आणि शीतयुद्ध या बाबींचा जर्मनीतील शिक्षणव्यवस्थेवर विशेष प्रभाव आहे. १९३० ते १९५० या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या राष्ट्रवादाची झळ या विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांस बसली होती. त्यातूनही विद्यापीठ प्रशासनाने यशस्वी मार्ग काढला.

विद्यापीठाने सातत्याने वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांच्या संशोधनावर भर दिला असून त्यासाठी विद्यापीठात २२ स्वतंत्र संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठात १८९ पदवी अभ्यासक्रमांची सोय आहे. आजमितीस विद्यापीठात २०,५२४ मुली आणि १४,९५१ मुले मिळून एकूण ३५,४७५ विद्यार्थी अध्ययन करीत असून ४१६ प्राध्यापक अध्यापन करीत आहेत (२०१८-१९).

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा