सामान्यपणे पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप देतात,अशा लेपाला कल्हई म्हणतात. शुद्ध कथिल विषारी नसते व त्याच्यावर हवेचा किंवा आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही. त्यामुळे कल्हई केलेले पृष्ठ गंजत नाही व कल्हईच्या भांड्यात ठेवलेले लोणचे,दही इत्यादींसारखे पदार्थ कळकत नाहीत. शिवाय कल्हई केलेले पृष्ठ चकचकीत व आकर्षकही दिसते.

कल्हई करण्यासाठी प्रथम भांडे घासून घेतात व त्यावरील मळ व कधीकधी पूर्वीची कल्हई खरवडून काढतात. नंतर भांडे चांगले तापवितात.त्यामुळेही मळ जळतो.त्यानंतर कल्हई करावयाच्या पृष्ठावर प्रथम नवसागराची पूड टाकून नंतर कथिलाची पट्टी घासतात आणि कापडी बोळ्याने वितळलेले कथिल भरभर सर्व पृष्ठावर पसरवितात. उष्णतेने कथिल वितळते व नवसागराचे अपघटन होऊन (घटक द्रव्ये वेगळी होऊन) हायड्रोक्लोरिक अम्ल निर्माण होते. अम्लाने राहिलेला मळ व ओशटपणाही निघून जाऊन पृष्ठ स्वच्छ होते.स्वच्छ पृष्ठावर लेप चांगला बसतो.नवसागरामुळे वितळलेले कथिल जास्त पातळ होते. पातळपणा कमी झाल्याने जेव्हा कथिल न पसरता त्याच्या गोळ्या होऊ लागतात, तेव्हा पुन्हा नवसागराची पूड टाकून पातळपणा वाढवितात. अशा तर्‍हेने नवसागराचा अभिवाह (धातू कमी तापमानास वितळावी म्हणून घातलेला पदार्थ) उपयोग होतो.कल्हई लावल्यानंतर लगेच भांडे थंड पाण्यात बुडवितात. त्यामुळे कल्हई चकचकीत होते. कारण वितळलेले कथिल एकदम थंड न केल्यास कल्हई चकचकीत होत नाही. साधारणपणे गृहोपयोगी भांड्यांना या पद्धतीने कल्हई करतात.कथिलाच्छादित पत्रे तयार करताना कल्हई करण्याच्या पद्धती मात्र भिन्न आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा