आंधळा साप (इंडोटिफ्लॉप्स ब्रॅमिनस)
आंधळा साप : खवल्यांनी झाकलेले डोळे.

हा साप सरीसृप (Reptilia) वर्गाच्या स्क्वामाटा (Squamata) गणातील टिफ्लोपिडी (Typhlopidae) या सर्पकुलातील आहे. याचे सहा वंश आणि सु. २४० जाती आहेत. उष्ण आणि किंचित उष्ण प्रदेशांत हा सर्वत्र आढळतो. याचे शास्त्रीय नाव इंडोटिफ्लॉप्स ब्रॅमिनस  (Indotyphlops braminus) असे आहे. महाराष्ट्रात हा ‘दानवं’, ‘कणा’ व ‘वाळा’ या नावांनी ओळखला जातो. हा अतिशय निरुपद्रवी व छोट्या आकाराचा, बिनविषारी साप आहे. हा साप जमिनीखाली बीळ करून किंवा मुंग्या आणि वाळवी यांच्या वारुळामध्ये राहतो. पाणथळ किंवा ओलसर जागी, कुजलेला पालापाचोळा इत्यादी ठिकाणी तो सहजरित्या आढळतो. तसेच पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीवर तो अधिक संख्येने आढळून येतो. ओल्या जमिनीतील मुंग्या, वाळवी, किटकांची अंडी, अळ्या, किडे हे याचे खाद्य आहे. त्यामुळे कधी कधी तो वाळवीच्या शोधात उंच झाडांवरही आढळतो. हा साप अन्न मिळवण्यासाठी एकटा भटकतो.

आंधळ्या सापाचे शरीर लंबगोलाकार असून लांबी सु. १२–२० सेंमी. व शेपूट टोकदार असते. तपकिरी, काळपट तपकिरी, निळसर राखाडी, पिवळसर तपकिरी, फिकट जांभळा अशा विविध रंगांमध्ये तो आढळतो. शरीराची वरची बाजू गडद, तर खालची बाजू फिकट रंगाची असते. शरीर गुळगुळीत व त्यावर चकचकीत खवले असल्यामुळे मऊ ओलसर मातीत त्याला त्वरेने घुसता येते. अधर (खालील) बाजूचे खवले लहान असल्याने त्याला सपाट जमिनीवर चालता येत नाही. तो जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना दिसतो. त्याची गती मंद असते. परंतु, असुरक्षितता वाटल्यास तो अतिशय वेगाने वळवळतो. बव्हंशी तो गांडुळासारखा दिसतो, मात्र त्याच्या अंगावर वलये नसतात.

आंधळा साप : टोकदार शेपूट.
आंधळा साप (टिफ्लॉप्स डायार्डी)

डोळे लहान, अस्पष्ट, काळ्या ठिपक्याप्रमाणे असतात. ते खवल्यांनी झाकलेले असल्यामुळे त्याला आंधळा साप असे म्हणतात. त्याचे डोळे प्रतिमा तयार करू शकत नाहीत, परंतु प्रकाशाची तीव्रता नोंदविण्यास ते सक्षम असतात.

आंधळे साप हे अंडज असून मादी एका वेळी तांदळाच्या आकाराची ७-८ अंडी घालते. आंधळ्या सापांमध्ये अनिषेकजनन (Parthenogenesis) पद्धतीने प्रजनन होते. यामध्ये अंड्याचे फलन (Fertilization) होण्यासाठी नर शुक्राणूंची आवश्यकता नसते. त्यामुळे अफलीत अंड्यापासून भ्रूणविकास  होतो. बहुतेक करून सर्व पिले मादी असून ती जनुकीयदृष्ट्या समान असतात. नराची उत्पत्ती क्वचितच होते.

भारतात टिफ्लॉप्स डायार्डी (Typhlops diardii) आणि ‌ऱ्हायनोटिफ्लॉप्स अ‍ॅक्युटस (Rhinotyphlops acutus) या दोन जाती आढळतात. यातील ‌‌ऱ्हायनोटिफ्लॉप्स अ‍ॅक्युटस  ही सर्वांत मोठ्या आकाराची जाती असून याची लांबी सु. ६० सेमी.पर्यंत असते.

आंधळा साप (‌ऱ्हायनोटिफ्लॉप्स अ‍ॅक्युटस)
विविध रंगांतील आंधळे साप

आंधळ्या सापांचा आयु:काल आणि प्रसार हा जमिनीची आर्द्रता आणि तापमान यांवर अवलंबून असतो. इतर अनेक सापांचे आंधळा साप हे खाद्य आहे.

 

 

 

पहा : सरीसृपवर्ग.

संदर्भ :

समीक्षक – सुरेखा मगर-मोहिते

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा