सस्तनी वर्गाच्या बोव्हिडी (Bovidae) कुलातील आणि समखुरी अधिगणातील (आर्टिओडॅक्टिला) ही सर्वांत मोठी जंगली मेंढी आहे. ती तिबेटच्या पठारावर लडाखच्या उत्तर भागापासून पूर्वेकडे सिक्कीमच्या उत्तरेकडील प्रदेशापर्यंत आढळते. कधीकधी चाऱ्याच्या शोधात या मेंढ्या स्पिटी, नेपाळ आणि कुमाऊँमध्येही शिरतात. नयन ही आर्गली या मेंढीची एक उपजाती असून हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन हॉग्‌सनाय (Ovis ammon hodgsonii) असे आहे. तिला तिबेटी मेंढी  असेही  म्हणतात.

नयन (ओव्हिस ॲमॉन हॉग्‌सनाय ) : नर.

या मेंढीची खांद्यापाशी उंची ११०–१२० सेंमी. असते. तिचे शरीर हरणासारखे असून ती डौलदार व चपळ आहे. नराचा रंग भुरकट तपकिरी असून खांद्यावर गडद असतो. शेपटीच्या भोवतालची मंडलाकृती जागा, गळा, छाती, पोट व पायांची आतील बाजू पांढरी असते. प्रौढ नरास आयाळ असते, परंतु हिवाळ्यात ते गळून पडते. मादीस क्वचितच आयाळ असते. मादीच्या पोटाचा रंग भुरकट पांढरा आणि शेपटीभोवतालचे मंडल फिकट असते. हिवाळ्यात नर व मादी यांचा रंग फिकट होतो. नराची शिंगे चपटी व रुंद असून सु. १४० सेंमी. लांब व त्यांचा घेर सु. ४७ सेंमी. असतो. तसेच ती वलयाकृती असून त्यांना एकच पूर्ण वेढा असतो.

नयन (ओव्हिस ॲमॉन हॉग्‌सनाय ) : पिलासहित नर.

तिबेटी पठाराच्या उंचसखल, ओसाड व निर्जन भागांत या मेंढ्या राहतात. त्यामुळे त्यांना हिमवृष्टी आणि कडक ऊन यांचा सामना करावा लागतो. पाणी आणि अन्न मिळविण्यासाठी त्या वरचेवर स्थलांतर करतात. बर्फ वितळू लागल्यावर उगवणारे गवत खाण्यासाठी त्या हिमरेषेजवळ किंवा दऱ्याखोऱ्यांतील पाण्याचे प्रवाह, बसकी झुडपे व हिरवळ असेल अशा ठिकाणीत्या प्रवास करतात. उन्हाळ्यात त्या ४,६०० मी.पेक्षाही जास्त उंचीवर आणि हिवाळ्यात निवाऱ्यासाठी खोल दऱ्यांत जातात. कोरड्या जागेतील जमीन खुरांनी उकरून लहानसा खळगा करतात व त्यात आसरा घेतात. त्यांचा रंग भोवतालच्या परिसराशी मिळताजुळता असल्यामुळे त्या पटकन दिसून येत नाहीत.

नयन (ओव्हिस ॲमॉन हॉग्‌सनाय ) : मादी.

प्रौढ नर लहान गट करतात. सामान्यत: माद्या व कोकरे यांच्यापासून ते दूर राहतात. समागमाच्या काळात नर व मादी एकत्र येतात. प्रजनन काळ ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असतो. गर्भावधी १६५ दिवसांचा असतो. एकावेळी एक किंवा क्वचितच दोन पिले जूनच्या सुमारास जन्मतात.

मांस आणि शिंगांसाठी तिबेटी मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. भारत आणि म्यानमारमध्ये त्यांना आता पूर्णपणे संरक्षण देण्यात आले आहे.

 

 

 

 

संदर्भ :

  • S. S. Negi, Himalayan Wildlife – habitat and Conservation, New Delhi, 2005.

समीक्षक – कांचन एरंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा