स्तनी वर्गाच्या कृंतक (कुरतडून खाणार्‍या प्राण्यांच्या) गणातील सायूरिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात दोन उपकुले आहेत. सायूरिनी उपकुलात भूचर आणि झाडावरील खारींचा समावेश होतो; त्यांच्या सु. २२५ जाती आहेत. पेटारिस्टिनी उपकुलात उडणार्‍या खारींचा समावेश होतो; त्यांच्या सु. ३५ जाती आहेत. चिपमंक, मार्मोट आणि प्रेअरी डॉग हेसुद्धा भूचर खारींमध्ये मोडतात. ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड आणि उत्तर सहारा वाळवंटातील काही भूभाग वगळता हा प्राणी सर्वत्र आढळतो. झाडावरील तसेच भूचर खारी दिवसा फिरणा-या आहेत, तर उडणार्‍या खारी निशाचर आहेत.

खारी लहान किंवा मध्यम आकारमानाच्या असतात. मागचे पाय मजबूत असून पुढील दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटे, तर मागील पायांना प्रत्येकी पाच बोटे असतात. शेपूट लांब व झुपकेदार असून तिचा उपयोग धावताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि थंडीत शरीराला झाकण्यासाठी होतो. तोंडाच्या आत अन्न तात्पुरते साठवून ठेवण्याकरिता कपोल-कोष्ठ (गालांत असणार्‍या पिशव्या) असतात. पुढचे दात अणकुचीदार असून जबडा मजबूत असतो. यांच्या साहाय्याने कठिण कवचाची फळे सहज तोडू शकतात. त्या ज्या भागात राहतात तेथील परिस्थितीशी त्यांचे अनुकूलन झालेले दिसते.

भारतात खारींच्या दोन जाती प्रामुख्याने आढळतात. यांपैकी एक बरीचशी माणसाच्या सहवासात राहणारी असून तिला सामान्य खार म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव फ्युनँब्युलस पेन्नांटाय आहे. उत्तर भारतात या खारीचे वर्चस्व आहे. ती मनुष्यवस्तीच्या आजूबाजूला, शेतात व माळरानावर राहते. दाट वस्तीची शहरे, गावे आणि खेडे यांतही ती राहते. हिच्या पाठीवर पाच पट्टे असतात. म्हणून काही ठिकाणी तिला पाच पट्ट्यांची खार किंवा पांडव खार असेही म्हणतात. फ्युनँब्युलस पामेरम ही जात जंगलात राहणारी असून भारताच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम भागांत ती जास्त आढळते. हिच्या पाठीवर तीन पट्टे असतात. म्हणून तिला तीन पट्ट्यांची खार किंवा रामाची खार असेही म्हणतात.

सामान्य खारीची लांबी १३-१५ सेंमी. असून शेपूट किंचित लांब असते. शरीराचा रंग करडा तपकिरी असतो; अंगावरचे केस मऊ व दाट असून पाठीवर पाच फिक्कट पट्टे असतात; त्यांपैकी तीन मध्यभागावर आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी एकेक असतो. सामान्य खार फार चलाख आणि कार्यक्षम असते. बहुतेक खारी दिवसा काही ना काही उद्योगात गढलेल्या असतात. जमिनीवरून झाडावर आणि झाडावरून जमिनीवर तिची सारखी दौड चालू असते. विशेष म्हणजे झाडावरून खाली उतरताना तिचे डोके जमिनीच्या दिशेला असते. या गोजिरवाण्या प्राण्याच्या सर्व हालचाली चित्तवेधक असतात. मऊ व कठिण कवचाची फळे, शेंगा, कोवळे कोंब व कळ्या हे त्यांचे खाद्य. शेवरीच्या झाडाला फुले आल्यानंतर त्यांतील मकरंद खाण्यासाठी खारी त्या झाडावर जमा होतात. पक्ष्यांप्रमाणे त्या एका झाडावरून दुसर्‍या झाडावर मकरंद खाण्यासाठी हिंडत असल्याने नकळत त्या परागणास मदत करतात. काही वेळा पक्ष्यांच्या घरट्यात शिरून त्या पक्ष्यांची अंडीही पळवितात.

नर व मादी दोन-तीन दिवसांपुरते समागमासाठी एकत्र येतात. याच काळात गर्भधारणा होते. गर्भावधी सहा-सात आठवड्यांचा असतो. पिल्ले जन्मण्याच्या सुमारास मादी गवत, पाने, धागे, कापूस वगैरे जमवून ओबडधोबड घरटे बांधते. घरटे कुठेही घराच्या आढ्यात, झाडाच्या छोट्या ढोलीत किंवा पडक्या भिंतीच्या बिळातही असते. घरटी एकापेक्षा जास्त असतात आणि संकटकाळी गरजेनुसार त्यांचा त्या वापर करतात. एका वेळेला २-३ पिल्ले जन्माला येतात. जन्मत: त्यांचे डोळे बंद असतात. ती स्वत:चे अन्न स्वत: शोधून खाण्याइतपत मोठी होईपर्यंत घरट्यात राहतात. खारींचा आयु:काल १०-१२ वर्षांचा असतो.

खारींची स्मरणशक्ती तल्लख असते. उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तेथे अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात हेच अन्न काढून खातात. यापैकी न खाल्लेल्या काही बिया व दाणे जमिनीत तशाच राहतात. खारींच्या या सवयीमुळे वनसंवर्धनास मदत होते. तसेच जमिनीखालील वनस्पतींच्या मुळाशी वाढणार्‍या सहजीवी मायकोर्‍हायझा कवकांचा त्या प्रसार करतात. ही कवके जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेऊन वनस्पतींना पुरवितात आणि त्याबदल्यात वनस्पतींपासून ऊर्जा मिळवितात. खारी या वृक्षाची मुळे खातात. या कवकांचे न पचलेले बीजाणू कोवळे वृक्ष असलेल्या ठिकाणी पडतात. ही कवके कोवळ्या वृक्षाच्या वाढीला मदत करतात. अशा रीतीने वृक्षांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा