महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील स्त्रियांचे लोकप्रिय लोकनृत्य. गोवा आणि कोकणातील फुगडी नृत्याचा उगम गोव्यातील धालो नावाच्या उत्सवातून झालेला दिसतो. धालोतील पूर्वार्धात नृत्य आणि गायन करणाऱ्या स्त्रिया दोन रांगा बनवून मागे-पुढे होत पदन्यास करतात. पूर्वार्ध संपल्यावर गोलाकार फेर धरून विविध नृत्ये करतात त्यांना फुगडी असे म्हणतात. फुगडी खेळताना तोंडावाटे फू-फू असा आवाज केला जातो. मात्र तो संपूर्ण नृत्य चालू असताना करणे जरूरीचे नसते. गोलाकार फेर धरून नाचताना स्त्रिया टाळया वाजवून नाचतात. या नृत्याला आदिवासी स्त्रिया पोपयांची फुगडी असे संबोधतात. फुगडी नृत्य सारस्वत ब्राह्मण वर्गातील स्त्रिया सोडल्यास अन्य सर्व स्त्रिया सादर करतात.
कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मण स्त्रिया आश्विन महिन्यातील महालक्ष्मी व्रताच्या वेळी कळशी फुंकून नृत्य सादर करतात. त्याला कळशी फुगडी असे म्हणतात. कळशी फुगडी एक विधी म्हणून साजरी केली जाते. या नृत्यात कळशी हे गर्भाचे प्रतीक मानले जाते व त्यात फुंकर घालणे म्हणजे प्राण फुंकणे असा प्रतीकात्मक अर्थ घेतला जातो. म्हणूनच कळशी फुगडी ही एक महत्त्वाचा विधी मानला जातो. मूल जन्मल्यावर सहाव्या रात्री सटीला प्रसन्न करण्यासाठी कळशी फुगडी घातली जाते. अपत्य प्राप्तीसाठी नग्न फुगडी घालण्याचा नवस एखादी बाई बोलते आणि अपत्य जन्माला आल्यावर सटीसमोर पूजाविधीचा आणि नवसपूर्वीचा भाग म्हणून बंद खोलीत नागडी फुगडी घातली जाते.
फुगडी खेळणाऱ्या स्त्रिया दोन गटात विभागतात आणि समोरा-समोर येऊन बैठ्या अवस्थेत मागे-पुढे होत गीतातून संवाद साधतात. दोन्ही गटातील प्रमुख असलेल्या स्त्रिया नववधू व नवरदेवाच्या आई बनतात. उभयंता आपल्या मुलीच्या अथवा मुलाच्या गुणांचे वर्णन करतात. त्यावेळी प्रत्येक शब्दानंतर ‘फू’ म्हणतात. शेवटी दोघींचा प्रस्ताव मान्य अथवा अमान्य होतो. वधू आणि वराच्या आईला ‘वेण’ किंवा ‘येण’ असे म्हणतात. त्यावरून या फुगडी प्रकाराला वेणीची अथवा येणीची फुगडी या नावाने ओळखतात. अंगठे पकडून दोन स्त्रिया समोरासमोर येऊन गोलाकार लोळण घेत फुगडी सादर करतात तिला लोळण फुगडी म्हणतात. मोराचे वर्णन करून पंख वेळावल्यासारखे हातवारे करीत फेर धरून सादर केलेल्या फुगडी नृत्याला मोर असे नाव आहे तर उडणाऱ्या पक्ष्याचे हावभाव करीत सादर होणाऱ्या समूहनृत्याला कवडो असे नाव आहे. बेबुक फुगडी, निसर फुगडी, व्हडें इत्यादी अनेक प्रकार फुगडीत प्रचलीत आहेत. सातत्यपूर्ण फुगडी खेळल्यावर काही स्त्रियांच्या अंगात येते. मागाहून त्या पूर्ववत होतात.झेमाडो हा फुगडीचा प्रकार विशेषतः आदिवासी आणि धनगर स्त्रियांमध्ये सादर केला जातो. यात स्त्रिया गोलाकार जोड्या धरून उभ्या राहातात आणि अंग मोडीत विविध हावभाव करीत गाणी गातात. सुरवातीची गीते त्यांच्या दैवतांसंबंधीची असतात आणि नंतरच्या गीतातून त्यांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन प्रतिबिंबीत होते. नृत्य सादर करताना मुखावाटे चित्कारही केले जातात.
फुगडी ही धालो उत्सवामध्ये तसेच गणेश चतुर्थीच्या सणावेळी आणि सामाजिक कार्यक्रमातही खेळली जाते. पारंपरिक फुगडी नृत्याला कोणत्याही वाद्याची साथ-संगत नसते. परंतु अलिकडच्या काळात घुमट, म्हादळें, कांसाळे, झांज, शामेळ या वाद्यांची साथ-संगतही करण्यात येते.
संदर्भ :
- Phaldesai, Pandurang, Goa: Folklore Studies, Broadway Publishing House, Panji, 2011.