फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे खोकला. या क्रियेत हवा एकदम बाहेर पडल्यामुळे आवाज होतो. सामान्यपणे खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ बाहेर टाकले जातात. धूर, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील दाह इत्यादींमुळे खोकला येतो. खोकल्यामुळे सूक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो.

श्वसनक्रियेत हवा आत घेतल्यावर कंठद्वार बंद होते. हवा बाहेर टाकताना कंठद्वार बंदच असल्यामुळे फुप्फुसात कोंडलेल्या हवेचा दाब वाढतो. त्यानंतर कंठद्वार एकदम उघडल्यामुळे दबलेली हवा एकदम जोराने बाहेर पडते. या हवेबरोबरच श्वसनमार्गातील क्षोभजनक द्रव्येदेखील वर सरकून बाहेर पडतात. ही द्रव्ये एकाच वेळी बाहेर पडली नाहीत तर खोकण्याची क्रिया पुनःपुन्हा होत राहते.

श्वसनमार्गातून फक्त हवेचे येणे-जाणे अपेक्षित असते. अन्न किंवा द्रव पदार्थ गिळताना कंठद्वार एका झडपेने बंद होत असते. घाईघाईत अन्न गिळताना किंवा द्रवाचा घोट घेताना ही झडप वेळीच बंद झाली नाही, तर अन्नाचा कण अथवा द्रवाचा थेंब श्वसनमार्गात जाऊ शकतो. असे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तात्काळ जो खोकला येतो, त्याला ठसका लागणे म्हणतात.

श्वसनमार्गामध्ये श्लेष्म पदार्थ स्रवत असतो. यालाही कफ असे नाव आहे. काही वेळा खोकला कोरडा असतो, तर काही वेळा तो कफयुक्त असा असतो. घसा, श्वसननलिका, फुप्फुसे आणि फुप्फुसावरण या ठिकाणी कोणत्याही कारणाने क्षोभ झाल्यास खोकला येतो. जीवाणुजन्य, विषाणुजन्य किंवा परजीवींची संक्रामणे, अधिहर्षता, दमा, अर्बुद किंवा इजा अशा कारणांमुळे क्षोभ निर्माण होतो. क्वचित प्रसंगी जठरविकार किंवा चेताक्षोभामुळेही खोकला येतो. दम्यासारख्या विकारात फक्त सूज आणि दाह असताना बाहेर टाकण्यासाठी क्षोभकारक पदार्थ नसतो. त्यामुळे वारंवार कोरडा खोकला येत राहतो. मात्र असा खोकला त्रासदायक आणि थकवा आणणारा असतो.

प्रासंगिक खोकला सोडल्यास वारंवार येणारा खोकला श्वसनसंस्थेतील दम्यासारख्या रोगाचे प्रमुख लक्षण असल्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे आवश्यक ठरते.

बहुतेक वेळा खोकल्याच्या आवाजावरुन त्याचे निदान करता येते. चिकट श्लेष्म पदार्थाचे परीक्षण करूनही खोकल्याची चिकित्सा केली जाते. तसेच खोकल्याबरोबर ताप, दम लागणे, छातीत दुखणे, बडक्याचा प्रकार इ. कारणांचे निदान करून कफनाशक, कफोत्सारी, ढास कमी करणारी व कफ पातळ करणारी अशी औषधे दिली जातात.

जीवाणु-विषाणूंच्या संक्रामणामुळे होणार्‍या खोकल्याची तीव्रता प्रतिजैविक औषधांमुळे कमी झाली आहे. डांग्या खोकला आणि घटसर्प अशा श्वसनमार्गाच्या सांसर्गिक रोगांचे प्रमाण परिणामकारक लशीकरण उपलब्ध झाल्यामुळे कमी झाले आहे.

प्रदूषणामुळे दम्याच्या खोकल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. दम्यासाठी श्वासामार्फत ओढून घ्यावयाच्या औषधांमुळे दमा आणि खोकला लवकर आटोक्यात येतो. क्षयाच्या खोकल्यासाठी प्रचलित डॉट्स उपचार पद्धती गुणकारी ठरली आहे. मात्र यासाठी उपचार पूर्ण करणे आवश्यक असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा