बिजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणार्‍या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधारभूत असा हा कणखर स्तंभ असतो. मुळांच्याद्वारे शोषलेले पाणी व खनिजे पानांना पुरविणे आणि पानांनी तयार केलेले अन्न मुळांना व इतर अवयवांना पुरविणे हे खोडाचे मुख्य कार्य आहे. शिवाय ते वनस्पतींना जमिनीवर ताठ उभे राहायला मदत करते. खोडावर असलेल्या पेरांमधून मुकुल (कलिका) निर्माण होतात. त्यांतून फांद्या, पाने किंवा फुले निर्माण होतात. दोन पेरांमधील अंतराला कुक्ष म्हणतात.

खोड मुख्यतः दोन प्रकारचे असते : ओषधीय आणि काष्ठमय. ओषधीय खोडात मऊ ऊती असतात. कोथिंबीर, गवत, वाटाणा इ. लहान वनस्पतींमध्ये ओषधीय खोड आढळते. या वनस्पती वर्षायू असतात. काष्टमय खोड त्यातील ऊतींमुळे कठिण आणि जाड असते. शंभर वर्षांपर्य़ंत ते जगू शकते. दरवर्षी काष्ठमय खोडाचा घेर वाढत जातो. मोठ्या वृक्षांचे खोड काष्ठमय असते. काही खोडे अन्नसाठा, पुनरुत्पादन, संरक्षण किंवा आधार देणे ही कार्य़े करतात. अशा प्रकारचे खोड ओषधीय किंवा काष्ठमय सारखे दिसत नाही. मात्र ही रूपांतरित खोडे खरोखरच खोड असते; कारण त्यावर पेरे आणि आंतरपेरे असतात. कांदा, सुरण, हळद किंवा बटाटा ही जमिनीखाली वाढणारी खोडे आहेत. त्यांच्यात भरपूर अन्न साठविलेले असते. गवत व स्ट्रॉबेरीचे खोड धावते असते, तर द्राक्षात ते प्रतानात रूपांतरित होते. काही वनस्पतींत ते काट्यात रूपांतरित होते. ते वनस्पतींचे प्राण्यांपासून संरक्षण करतात.

खोडांपासून अन्नपदार्थ मिळतात; उदा., बांबूचे कोंब, कांदा आणि बटाटा. बीट, ऊस आणि गोड ज्वारीच्या खोडांपासून साखर मिळते. काष्ठमय खोडापासून फर्निचर, कागद आणि इमारती लाकूड मिळते. काही धागे खोडांपासून मिळतात. काही झाडांच्या खोडापासून रबर आणि टर्पेंटाइनमध्ये वापरले जाणारे पदार्थ मिळविले जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा