(येलो फुटेड ग्रीन पिजन). एक हिरव्या रंगाचे कबूतर. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा आहे. हरियाल भारतात सर्वत्र आढळतो. तसेच श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, चीन, थायलंड, कंबोडिया या देशांतही तो आढळतो. महाराष्ट्र राज्याचा तो राज्यपक्षी असून महाराष्ट्रात त्याला ‘हरोळी, हिरवे कबूतर किंवा हरित कबूतर’ असेही म्हणतात.

हरियाल पक्षी (ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा)

पूर्ण वाढलेल्या हरियालची लांबी २९–३३ सेंमी. असून शेपटीची लांबी ८–१० सेंमी. असते. वजन २२५–२६० ग्रॅ. असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात. इतर कबूतरांप्रमाणे ते गुबगुबीत असतात. शरीराचा मुख्य रंग हिरवट-पिवळा व राखी-करडा असतो. डोके, मान आणि छातीचा वरचा भाग हिरवट-पिवळा असून मानेच्या बुडाभोवती फिकट राखाडी रंगाचे कडे असते. पंख राखाडी काळपट असून त्यांवर पिवळा पट्टा असतो. पाय पिवळे असतात.

हरियाल पक्षी पूर्णपणे वृक्षवासी आहेत. ते सदाहरित वने, पानझडी वने इत्यादी ठिकाणी निवास करतात. वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांवर तसेच अधूनमधून शहरांतील बागांमध्येही ते दिसून येतात. ते क्वचित जोडीने, तर बहुधा थव्याने वावरतात. हरियाल पक्षी शाकाहारी असून तो वड, पिंपळ, उंबर यांची फळे तसेच कळ्या, कोंब व इतर धान्ये खातो. खासकरून वडाची आणि पिंपळाची फळे खाण्यासाठी त्यांचे मोठाले थवे या झाडांवर जमतात. त्यांच्या शरीराचा रंग या झाडांच्या पानांशी मिळताजुळता असल्याने ते सहजासहजी दिसून येत नाहीत. हरियाल स्वभावाने लाजाळू असून ते क्वचितच जमिनीवर उतरतात. त्यांचे उड्डाण थेट आणि जलद असल्यामुळे उड्डाण करताना त्यांच्या पंखांच्या फडफडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.

त्यांच्या विणीचा हंगाम मार्च ते जून असा असतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी नर मादीसमोर आल्यावर गळा व छाती फुगवून चालतात, पंख खाली झुकवितात, नंतर दिमाखात चालतात आणि डोके खाली वाकवून सतत शीळ घातल्यासारखा मंजूळ आवाज करत राहतात. मादीसुद्धा नराला अशाच प्रकारे, परंतु सौम्यपणे प्रतिसाद देते. त्यांचे घरटे अन्य कबुतरांसारखेच एखाद्या मंचासारखे सपाट असते आणि पानांमध्ये दडविलेले असते. मादी १-२ पांढरी, चकचकीत अंडी घालते. उबवण काल १३–१५ दिवसांचा असतो. अंडी उबविण्याचे तसेच पिलांना अन्न भरविण्याचे काम नर-मादी दोघेही करतात.