गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोकणी नृत्यगीत.यात संगीत, काव्य आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार पाहायला मिळतो. गोव्यात १५१० साली पोर्तुगिजांचे आगमन झाले. त्यानंतर गोव्यात पोर्तुगीज भाषा आणि पाश्चात्त्य संगीत रूजण्यास प्रारंभ झाला. पाश्चात्त्य संगीत आणि स्थानिक पारंपरिक संगीताच्या संगमातून मांडो-धुलपदाचा उगम गर्भश्रीमंत उच्चवर्णीय ख्रिस्ती कुटुंबात झाला. मांडो-धुलपद या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल वेगवेगळे प्रवाह आहेत. भारतीय संगीत परंपरेतील मंद आणि द्रुत या संगीतप्रकारांवरून मांडो (मंद) आणि धुलपद (द्रुतपद) यावरून हे नाव पडले असावे असे मत आहे. मांडोची सुरुवात मंद गतीच्या सुरावटीवर होते आणि गती हळूहळू वाढत जाते. शेवटी धुलपदाची गती द्रुत होत जाऊन थांबते. दुसऱ्या मतानुसार मांडणे यावरून मांडो-धुलपद आले आहे. या उत्पत्तीचा संबंध मंडल आणि कृष्णाच्या मंडलनृत्य किंवा रास-मंडळाशीही लावला जातो. गोव्यातील ‘मांड’ या संकल्पनेशी मांडोची उत्पत्ती जोडणारी मतेही आहेत. धुलपद हे ओवी या गीत प्रकारातून आले असल्याच मत ख्यातनाम अभ्यासक जुजे पेरैर, मिखायल मार्टिन्स आणि आंतोनियु दा कॉश्त यांनी मांडले आहे. मांडो गीतांचा उगम देखील या ओवी प्रकारातून विकसीत झाल्याचे ते सांगतात. गोव्यात १८ व्या शतकात ‘इन्किझिशन’ नावाची धर्मसंसद आली आणि तिने गोव्यातील सर्व धार्मिक उत्सव तसेच कलाविष्कारांवर कडक बंदी आणली. त्यामुळे १८३० च्या सुमारास गर्भश्रीमंत कुटुंबांतून सामाजिक नृत्याला (सोशल डांसिंग) प्रारंभ झाला. ११व्या शतकानंतर युरोप खंडात सोशल डांसिंगची प्रथा सुरू झाली होती. त्याचा प्रभाव गोव्यातील सुखवस्तू कुटुंबावर झाल्याने सासष्टी तालुक्यातील कुडतरी, लोटली आणि राय गावातील कुटुंबांमधून मांडो रचले गेले. आगापितु मिरांद यांच्यामते मांडोचा पहिला रचनाकार चर्चमधला गानवृंद संचालक असावा. कारण त्याला पाश्चात्य संगीताची पुरेशी जाण होती. मांडो-धुलपदसाठी व्हायोलीन हे स्वरवाद्य आणि घुमट हे गोमंतकीय लोकवाद्य तालवाद्य म्हणून वापरतात. नंतरच्या काळात उच्चभ्रू कुटुंबात पियानो सहजपणे उपलब्ध असल्याने त्याचाही वापर करण्यात येऊ लागला.
मांडोची प्रमुख संकल्पना म्हणजे माणसाचे प्रणयी जग. त्यात प्रेमभावनेबरोबरच सामाजिक आणि राजकीय घटनांचे कथन असते. प्रेम आणि ताटातूट यातून वाट्याला आलेली वेदना आणि विलाप यांचे अत्यंत परिणामकारक प्रतिबिंब मांडोतील रचनेत दिसते. सुखवस्तू उच्चकुलीनाच्या रचना असल्याने त्यात पोर्तुगीज शब्दांचा वापर दिसतो. हा नृत्यगीतप्रकार पुरुष आणि स्त्री अशा जोडीने सादर करतात. एकाच वेळी अनेक जोडपी नृत्य करतात. नृत्याच्या वेळी स्त्रीकलाकार पान-बाजू आणि तळप म्हणजे ब्लाउज आणि लाल, निळया अथवा हिरव्या वेलवेटचा पायघोळ घागरा घालतात. वरून सफेद शाल वापरतात. या सर्व कपडयांवर सोनेरी कलाकुसर केलेली असते.पुरूष काळी पँट, लांब बाह्यांचा सफेद शर्ट, टेलकोट आणि गोलाकार टोपी तसेच पायात काळे बूट वापरतात. स्त्रिया सफेद पायमोजे आणि वेलवेटच्या वहाणा घालतात. हातात पिसांपासून बनविलेला अर्धगोलाकार पंखा घेऊन जोडीदारासोबत नृत्य करतात. त्या वेळी पुरूष नर्तक आपल्या सफेद हातरुमालाचा आकार बदलून जोडीदारीणीला मूक संदेश देत असतो.
मांडो-धुलपद नृत्यगीत प्रकाराचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर (१८४०) झाला. पुढील शंभर वर्षांचा काळ या नृत्यगीताच्या भरभराटीचा होता. मात्र १९५० च्या दशकात कुटुंबाच्या आनंदप्रसंगी सादर केला जाणारा हा नृत्यप्रकार लुप्त होत गेला. कुटुंबातील व्यक्तींचा वाढदिवस, विवाहाची वर्षपूर्ती, अन्य एखादा आनंदी प्रसंग अशावेळी मांडो-धुलपद आवर्जून सादर केले जायचे. आजही हा नृत्यगीत प्रकार अनेक ठिकाणी सादर केला जातो. मात्र तो मूळ कलाप्रकाराची जीर्ण-शीर्ण नक्कल वाटत असल्याचे मत अभ्यासक मांडतात. अलीकडे मांडो-धुलपदांचे संग्रह त्यांच्या संगीतनोटेशनसह उपलब्ध होत आहेत. मात्र पहिला मुद्रित-प्रकाशित स्वरूपातील मांडो-धुलपद १८९० मध्ये प्रसिद्ध झाला होता. गोवा राज्य स्तरावर दरवर्षी मांडो महोत्सव आयोजित केला जातो. पहिला मांडो महोत्सव १९६७ साली पणजी येथे क्लब नासिओनाल या संस्थेने आयोजित केला होता. त्यानंतरची सतत चार वर्षे कोंकणी भाषा मंडळ या संस्थेने हा महोत्सव घडवून आणला. १९७४ सालापासून गोवा कल्चरल सोशल सेंटर या संस्थेकडून दरवर्षी हा उत्सव आयोजित करून या कला प्रकाराला उत्तेजन देऊन त्याचे जतन-संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
संदर्भ :
- फळदेसाई, पांडुरंग, गोमंतक संस्कृतीच्या पाऊलखुणा, पणजी, २०१३.