गोव्यातील एक नृत्यगीत असून ते ख्रिश्चन तरुणी हिन्दू स्त्रियांचा वेश परिधान करून समारंभप्रसंगी सादर करतात. देखणी याचा अर्थ सुंदरी. देखणीची अनेक गीते रचलेली असली,तरी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गीताचा विषय हा नदीच्या दुसऱ्या तीरावर होऊ घातलेल्या हिन्दूच्या विवाहसमारंभात नृत्य सादर करण्यासाठी जाणाऱ्या देवदासी युवती असा आहे. साजशृंगार करून आलेल्या या युवतींना नदीतीरावर येईपर्यंत अंधार पडतो. त्यामुळे नाविक त्यांना नदीच्या पार नेण्यास नकार देतो. परंतु त्या युवती नाविकाला आपली आभूषणे देण्याचे आमिष दाखवितात आणि आपला कार्यभाग उरकतात. गीतांच्या उडत्या चाली आणि त्याला घुमट, व्हायोलीन आणि गिटार या वाद्यांची साथ यांमुळे ही गीते लोकप्रिय आहेत. कधीकधी मांडो गायनानंतर देखणी गीते गायली जातात. प्रसिद्ध सिनेकलाकार राजकपूर यांनी यातील ‘घे घे घे घे सायबा। म्हाका नाका गो’ हे देखणी गीत ‘बॉबी’ चित्रपटात वापरल्याने ते भारतभर आणि परदेशांतही लोकप्रिय झाले.

संदर्भ :

खेडेकर ,विनायक विष्णू,लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास,कला अकादेमी,गोवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा