जगातील प्रत्येक प्रकारातील पहिल्या तीन उल्लेखनीय पुलांची छायाचित्रासह माहिती खाली दिली आहे.
(अ) तुळई पूल :
(१) शिबॅनपो पूल, चीन : चाँगक्विंग शहरातील यांगत्सी (Yangtze) नदीवरील पूर्वप्रतिबलित पेटी तुळईचा हा पूल २००६ मध्ये पूर्ण झाला. लांब गाळ्याची लांबी ३३० मी. (१०८० फूट) असून एकूण पूलाची लांबी ११०३ मी. (३६१९ फूट) आहे. पूल चार वाहनमार्गांच्या (Lanes) क्षमतेचा आहे.
(२) स्टोल्मा पूल, नॉर्वे : स्टोलमेन व सेल्वजॉर्न ह्या दोन बेटांना जोडणारा हा पूल १९९८ मध्ये पूर्ण झाला. पूल पूर्वप्रतिबलित पेटी तुळईचा असून त्याला एकंदर तीन गाळे आहेत. मधला गाळा दोन्ही बाजूंच्या गाळ्यांवरून प्रक्षेपित असून त्या लांब गाळ्याची लांबी ३०१ मी. (९८८ फूट) आहे, तर पूर्ण पूलाची लांबी ४६७ मी. (१५३२ फूट) आहे. दोन वाहनमार्गांची क्षमता असलेल्या पुलाची रुंदी ९ मी. (३० फूट) आहे.
(३) रीओ – नीतेरॉय पूल, ब्राझील : रीओ दी जानेरो आणि नीतेरॉय ह्या दोन शहरांना जोडणारा, गुआनाबारा खाडीवरील हा पूल प्रेसिडेंट कॉस्टा ई सिल्व्हा ह्या नावानेही ओळखला जातो. पूर्वप्रतिबलित पेटी तुळईचा हा पूल १९७४ मध्ये बांधून पूर्ण झाला. मधल्या गाळ्याची लांबी ३०० मी. (९८४ फूट) असून खाडीतून जाणाऱ्या उंच जहाजांसाठी गाळ्याची उंची ७२ मी. (२३६ फूट) आहे. पुलाची रुंदी २७ मी. (८९ फूट) असून क्षमता एकंदर सहा वाहनमार्गांसाठी आहे. पुलाची एकंदर लांबी १३,२९० मी. (८.२५ मैल) आहे. सध्या हा जगातील लांब पुलांत सहाव्या क्रमांकावर आहे.
(आ) कमानी पूल :
(१) चाओटिअनमेन पूल, चीन : चाँगक्विंग शहरातील यांगत्सी नदीवरचा रस्ता व लोहमार्गासाठी बांधलेला हा दुमजली पोलादी कमानी पूल २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. मधल्या कमानी गाळ्याची लांबी ५५२ मी. (१८११ फूट) असून बाजूच्या आधारांपासून कमान माथा १४२ मी. (४६६ फूट) उंचीवर आहे. पुलाची एकंदर लांबी १७४१ मी. (५७१२ फूट) आहे. पुलाच्या वरच्या मजल्यावर एकंदर सहा वाहनमार्ग तसेच दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांची सोय आहे. तर खालच्या मजल्यावर आणखी दोन वाहनमार्ग व मधल्या जागेत मेट्रोच्या रुळांसाठी तरतूद केलेली आहे.
(२) लुपु पूल, चीन : शांघायमधील हुआंगपू व पुडाँग भागांना जोडणारा हुआंगपू नदीवरील हा पोलादी कमानी पूल २००३ मध्ये पूर्ण झाला. कमानी गाळ्याची लांबी ५५० मी. (१८०४ फूट) आहे तर एकंदर पुलाची लांबी ७५० मी (२४६१ फूट) भरते. कमानीची उंची १०० मी. (३२८ फूट) आहे. पुलावरून एकंदर सहा वाहनमार्ग व दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग असून एकूण रुंदी २४.७ मी. (९४ फूट) आहे.
(३) बोसिडेंग पूल, चीन : सिचुआन प्रांतातील यांगत्सी नदीवरील ह्या पोलादी कमानी पुलाचा मध्यवर्ती गाळा ५३० मी. (१७४० फूट) लांब आहे. पुलाची एकंदर लांबी ८४१ मी. (२७५९ फूट)आहे. पूल ३०.६ मी. (१०० फूट) रुंद असून २०१२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
(इ) कैची पूल :
(१) इकिटसुकी पूल, जपान : इकिटसुकी आणि हिराडो बेटांना जोडणारा पोलादी कैची पूल १९९१ मध्ये पूर्ण झाला. सर्वांत लांब कैची गाळा ४०० मी. (१३१२ फूट) आहे.
(२) अॅस्टोरिया-मेगलर पूल, अमेरिका : कोलंबिया नदीवरील हा पोलादी कैची पूल अमेरिकेतील दोन राज्यांना (ऑरेगॉन व वॉशिंग्टन) जोडणारा असून त्याची एकंदर लांबी ६५४५ मी. (२१,४७४ फूट) आहे. सर्वांत लांब कैची गाळ्याची लांबी ३७६ मी. (१२३३ फूट) आहे, तर पुलाची रुंदी ८.५ मी (२८ फूट) आहे. नदीच्या पाणीपातळीपासून पूल ६० मी. (१९६ फूट) उंच असून पुलावरून दोन बाह्यमार्ग जातात.
(३) फ्रांसिस स्कॉट की पूल, अमेरिका : बॉल्टिमोर शहरातील पटापस्को नदीवरील ह्या पोलादी कैची पुलाचा मध्यवर्ती गाळा ३६६ मी. (१,२०० फूट) लांबीचा आहे. पुलाची एकंदर लांबी २,६३२ मी. (८,६३८ फूट) आहे. नदीच्या पाणीपातळीपासून पूल ८१ मी. (१८५ फूट) उंचीवर आहे. पुलाच्या चार वाहनमार्गांवरून सतत वाहतूक चालू असते. पूल १९७७ मध्ये बांधून पूर्ण झाला. अमेरिकेच्या राष्ट्रगीत लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव पुलाला देण्यात आलेले आहे.
(ई) निलंबी पूल :
(१) आकाशी कैक्यो पूल, जपान : कोबे शहरापासून आवाजी बेटावरील आवाया बेटाला जोडणारा हा पूल आकाशी सामुद्रधुनी (Strait) पार करतो. पूल १९९८ मध्ये पूर्ण झाला. निलंबी पुलाचा सर्वांत लांब गाळा १,९९१ मी. (६,५३२ फूट) लांबीचा असून एकूण पुलाची लांबी ३,९११ मी. (१२,८३१ फूट) आहे. पाणीपातळीपासून पुलाची उंची ६५.७२ मी. (२१५.६ फूट) असून पुलावरून सहा वाहनमार्ग व चार संकटकालीन (Emergency) वाहनमार्ग आहेत. पुलाचे आधारस्तंभ (पायलॉन्स) २८२.८ मी (९२८ फूट) उंच आहेत.
(२) झीहाऊमेन पूल, चीन : जिनटँग व सेझी बेटांना जोडणारा हा पूल एकंदर ५.३ किलोमीटर लांबीचा असून त्याच्या निलंबी गाळ्याची लांबी १,६५० मी. (५,४१३ फूट) आहे. समुद्रापासून पुलाची उंची २११ मी. (६९२ फूट) आहे. वाहतुकीसाठी हा पूल २००९ मध्ये खुला करण्यात आला.
(३) दी ग्रेट बेल्ट पूल, डेन्मार्क : झीलंड व फ्यूनेन ह्या दोन बेटांना जोडणारा हा रस्ता पूल ६,७९० मी. (२२,२७७ फूट) लांब असून त्याच्या सर्वात लांब गाळ्याची लांबी १,६२४ मी. (५,३२८ फूट ) आहे. पुलाची रुंदी ३१ मी. (१०२ फूट) असून पाणीपातळीपासून ६५ मी. (२१३ फूट) उंच आहे. १९९८ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
(उ) प्रक्षेपी पूल :
(१) क्युबेक पूल, कॅनडा : क्युबेक राज्यातील लेव्हिस आणि क्युबेक शहराचे उपनगर सेंटे फॉय ह्यांना जोडणारा सेंट लॉरेन्स नदीवरील हा पूल एकंदर ९८७ मी. (३,२२८ फूट) लांब आहे. दोन्ही प्रस्तंभांपासून प्रत्येकी १७७ मी. (५८१ फूट) प्रक्षेपी भाग असलेल्या गाळ्याची लांबी ५४९ मी. (१,८०१ फूट) आहे. पुलाची रुंदी २९ मी. (९५ फूट) असून त्यावरून तीन वाहनमार्ग, एक लोहमार्ग व एक पादचारी मार्गांची सोय आहे. पुलाचे बांधकाम १९०५ मध्ये सुरू झाले. परंतु दोन वेळा बांधकाम अपघातानंतर, सरतेशेवटी १९१९ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला झाला.
(२) फोर्थ पूल, स्कॉटलंड, इंग्लंड : एडिंबरो शहराच्या पश्चिमेला असलेल्या फोर्थ नदीच्या खाडीवरील हा पूल लोहमार्गासाठी १८९० मध्ये बांधण्यात आला. पुलाची एकंदर लांबी २.४६७ किमी. (१.५३३ मैल) असून दोन प्रक्षेपी गाळ्यांची लांबी ५२० मी. (१,७०० फूट) आहे. खाडीच्या उच्चतम पाणी पातळीपासून पूल ४६ मी. (१५० फूट) उंच असून पुलाची कमीत कमी रुंदी ९.८ मी. (३२ फूट) आहे.
(३) मिनाटो पूल, जपान : ओसाका बेटावरील हा दुमजली पूल वाहतुकीसाठी १९७४ मध्ये उघडण्यात आला. पुलाची एकंदर लांबी ९८३ मी. (३,२२५ फूट) असून सर्वांत लांब गाळ्याची लांबी ५१० मी. (१,६७० फूट) आहे. पुलाची रुंदी २२.५ मी. (७४ फूट) आहे व वरच्या मजल्यावरून जलदमार्ग (Expressway), तर खालच्या मजल्यावरून स्थानिक मार्ग (Local Road) जातो.
(ऊ) केबल आधारित :
(१) रस्की पूल, रशिया : व्लाडिओस्टॉक शहरापासून रस्की बेटाला जोडणारा हा पूल पूर्व बॉस्पोरस सामुद्रधुनी पार करतो. हा पूल २०१२ मध्ये पूर्ण करण्यात आला. पूलाची एकूण लांबी ३,१०० मी. (१०,२०० फूट) असून सर्वांत लांब गाळ्याची लांबी १,१०४ मी. (३,६२२ फूट) आहे. आधारस्तंभांच्या मनोऱ्याची उंची ३२०.९ मी. (१,०५३ फूट) आहे. पुलाखालून जाणाऱ्या जलवाहतुकीसाठी निष्कासन (Clearance) ७० मी. (२३० फूट) आहे. पुलाची रुंदी २९.५ मी. (९७ फूट) असून त्यावरून दोन्ही बाजूंना दोन अशा एकंदर चार वाहनमार्गांची सोय आहे.
(२) सुटाँग पूल, चीन : नानटाँग व चँगशू ह्या दोन शहरांना जोडणारा, यांगत्सी नदी ओलांडणारा हा पूल २००८ मध्ये पूर्ण झाला. पुलाची एकंदर लांबी ८२०८ मी. (२६,९२३ फूट) असून सर्वांत लांब गाळ्याची लांबी १,०८८ मी. (३,६७० फूट) आहे. आधारस्तंभांच्या मनोऱ्याची उंची ३०६ मी. (१,००४ फूट) आहे. नदीमधून जाणाऱ्या जलवाहतुकीसाठी निष्कासन ६२ मी. (२०३ फूट) आहे. पुलावरून शेनयाँग-हैकाऊ जलदमार्ग जातो.
(३) स्टोनकटर्स पूल, चीन : हाँगकाँग शहरातील दोन बेटांना जोडणारा हा पूल रॅम्बलर खाडी पार करतो. पुलाची एकूण लांबी १,५९६ मी. (५,२३६ फूट) असून त्यातील सर्वांत लांब गाळ्याची लांबी १०१८ मी. (३३४० फूट) आहे. आधारस्तंभांच्या मनोऱ्याची उंची २९८ मी. (९७८ फूट) आहे. जलवाहतुकीसाठी निष्कासन ७३.५ मी. (२४१ फूट) आहे. पुलावर दोन्ही बाजूंना तीन अशा एकंदर सहा वाहनमार्गांची क्षमता आहे. पूल २००९ मध्ये बांधून पूर्ण झाला.
समीक्षक : विनायक सूर्यवंशी