ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गोव्यातील एक नृत्यप्रकार.या नृत्यात सहभागी होणारे सर्व कलाकार ख्रिस्ती पुरुष असून ते हातात बांबूपासून बनविलेले दीड ते दोन मीटर उंचीचे मुसळ घेऊन नाचतात. या नृत्याच्या वेळी दोन रांगा बनवून अथवा गोलाकार नृत्य करताना हातातील मुसळ,गीते आणि वाद्यसंगीताच्या तालावर जमिनीवर आपटून आवाज निर्माण करतात. त्यासाठी मुसळाच्या फटीत धातूच्या पातळ चकत्या बसविलेल्या असतात. सासष्टी तालुक्यातील चांदर या गावात हे नृत्य पूर्वी होळी पौर्णिमेला होत असे. परंतु पोर्तुगीज राजवटीपासून ते कार्निव्हाल उत्सवाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी होते.
चांदर म्हणजे पूर्वीचे चंद्रपूर. ही भोजांची राजधानी होती. नंतर कदंब राजाचीही ती राजधानी राहिली. विजयनगरचा राजा हरिहर याने या चंद्रपूरचा किल्ला चोळ राज्यकर्त्यांकडून १३१० साली जिंकून घेतला. त्या विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून मुसळांखेळ हे पारंपरिक नृत्य सादर केले जाते.
या नृत्यात सहभागी नर्तक लांब बाह्यांचा कुर्ता,त्यावर आखूड बाह्यांचे काळे ज्याकीट, पायघोळ, सफेद धोतर, डोक्याला मुंडासे ,पायात घुंगूर आणि हातात मुसळ अशा वेशात पुरातन शिवमंदिराच्या स्थळावर आता उभारलेल्या क्रॉससमोर जमतात. या स्थळाला मुसळांखेळाचा मांड संबोधले जाते. त्या नर्तकांना घुमट, म्हादळें, झांज, कांसाळे ही वाद्ये वाजविणारे वादक गीते गाऊन साथसंगत करतात. चालू काळात म्हादळें या वाद्याऐवजी ढोलक्याचा उपयोग केला जातो. या वादक आणि नर्तकांसोबत अस्वलाचा मुखवटा आणि काळा वेश केलेल्या कलाकाराच्या कंबरेला बांधलेली दोरी हातात घेऊन फिरणारा कलाकार असतो. हे अस्वल म्हणजे पराभूत चोळ राजाचे प्रतीक होय.
नृत्याची सुरुवात प्रार्थनेनंतर होते. मांडावर गोलाकार नृत्य सादर करताना कलाकार आपल्या हातातील मुसळ गोलाच्या मध्यभागी आणि बाहेरच्या बाजूने लयीत आपटून आनंद व्यक्त करतात. प्रथम ख्रिस्ती प्रार्थना होते. नंतर म्हटली जाणारी कोंकणीतील गीते शिव आणि शक्ती (दुर्गा) संबंधीची तसेच राजकीय आणि कौटुंबिक विषयांवरील असतात. नृत्याच्या समारोपानंतर एक स्थानिक स्त्री आपल्या हातातील झाडूने नृत्याची जागा साफ करून शेणाचा सडा घातल्याचा अभिनय करते. मांडावरून निघताना नर्तक दोन रांगात लयबद्ध चालतात.त्यांच्यासोबत दिवटीवाले असतात. नर्तकांचा जथा कोट आणि कावोरीं या भागांतील गावकऱ्यांच्या अंगणात नृत्य सादर करीत घरोघर फिरतो. नर्तक परिक्रमा पूर्ण करून मांडावर परततात आणि मुसळांखेळाची समाप्ती होते.
संदर्भ :
- फळदेसाई, पांडुरंग, गोमंतक संस्कृतीच्या पाऊलखुणा, पणजी २०१३.