कोमुनिदाद : गोव्यातील स्थानिक ग्रामसंस्थाना कोमुनिदाद या पोर्तुगीज नावाने ओळखतात. या ग्रामसंस्था प्राचीन काळापासून चालत आलेल्या असून त्यांना गांवकारी म्हणत. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात सोळाव्या शतकाच्या प्रारंभास सुरू झाली. त्यांना या प्राचीन ग्रामसंस्थांचे महत्व लगेच कळून आले. तेव्हापासून पोर्तुगीजांनी या ग्रामसंस्थांना गांवकारीयास तसेच काम्र आग्रारिया अशी नावे दिली. कोमुनिदाद या शब्दाचा अर्थ कम्युनिटी किंवा जमात असा आहे. या ग्रामसंस्थांच्या उत्पत्तीविषयी अभ्यासकात एकमत दिसून येत नाही. १६ सप्टेंबर १५२६ रोजी पोर्तुगीज राजसत्तेने कोमुनिदादविषयक काही कागदपत्र प्रसिध्द केले होते. त्यात या ग्रामसंस्थांच्या उत्पत्ती काळाविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते ; परंतु काही अभ्यासकांच्या मते त्यांचा उत्पत्तीकाळ ख्रिस्तपूर्व असून त्या शेतीविषयक संस्था म्हणून उदयाला आल्या.

गावात प्रारंभीच्या काळात जे स्थायिक झाले त्यांना गांवकार असे म्हणत. ते सर्व गांवकार या संस्थेचे सदस्य मानले जात. गावातील संपूर्ण शेती सामायिकरित्या लागवडीखाली आणून त्यातून आलेले उत्पन्न अथवा नुकसानी ठरल्याप्रमाणे विभागून घेतले जाई. काही अभ्यासकांच्या मते ती केवळ कृषिविषयक संस्था नव्हती, तर तिचे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वेगळेपण होते. इतकेच नव्हे तर तिला कायदेशीर हक्क प्राप्त झालेले होते. पालिकाविषयक मूलभूत कायदे कार्यवाहीत आणण्याचा तिला अधिकार होता. गावातील धार्मिक समारंभांचे खर्च भागविणे, समाजाच्या शिक्षणासाठी तसेच अन्य खर्च भागविण्यासाठी मदत करणे, गावातील भांडणतंटे मिटविणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे ही या संस्थेची कर्तव्ये होती.
गोवा लँड रिफॉर्मस् कमिशन १९६४ मध्ये नमूद असल्याप्रमाणे कदंब राजवंश, मलिक हुसेन आणि त्याचा पुत्र सबाय दिलखान यांची मुस्लीम राजवट आणि शेवटी पोतुगीजांनी गोव्यावर राज्य करण्याआधी कित्येक शतके पश्चिम घाटावरून अनेक घराणी आणि कुटुंबे गोव्यात येऊन स्थायिक झाली. त्यामागे तत्कालीन युध्दे, दुष्काळ, रोगांच्या साथी इत्यादी अनेक कारणे होती. गोव्यात आल्यावर या घराण्यांनी स्वतःच्या संस्था निर्माण केल्या. कुटुंबप्रमुखाला संस्थाप्रमुखाचा मान बहाल केला. त्या काळात या संस्थांना गांवकारी हे नामाभिधान दिले गेले. त्यानंतर गावातील पिके आणि अन्य लागवड सामायिक स्वरूपात करण्यात येऊ लागली. अशा प्रकारे मिळालेले उत्पन्न सगळेजण विभागून घेत. उर्वरीत प्रदेशाकडे आलेल्या संबंधांमुळे कोमुनिदादींमध्ये अनेक बदल होत गेले. काही सुधारणाही झाल्या.

प्रारंभीच्या काळात कोमुनिदाद ही सामाजिक, राजकीय आणि कृषिविषयक संस्था होती. मंदिरे आणि चर्चेससंबंधीच्या कामाचाही यात अंतर्भाव होता. सध्याच्या काळातील ग्रामपंचायतीची जी कामे असतात, साधारणतः ती कामे आणि जबाबदाऱ्या कोमुनिदादीच्या होत्या. कालांतराने तिचे मूळ स्वरूप नष्ट होऊन मूळच्या हक्कदारांची एक सोसायटी (संस्था) असे रूप तिला प्राप्त झाले. गावात मागाहून येऊन स्थायिक होणाऱ्यांना या संस्थेचे सदस्यत्व मिळत नसे. सदस्यत्व फक्त मूळ सदस्यांपुरतेच मर्यादित राहिले ; परंतु पुढील काळात कोमुनिदादीच्या कायद्यात शिथिलता आली. त्यात मूळ सदस्यांना आपल्या अधिकारांचे हस्तांतरण इतरांना करणे शक्य झाले. कोमुनिदादीचे सदस्यत्व फक्त ठराविक वय पूर्ण केलेल्या पुरुषालाच मिळते. त्यांना कोमुनिदादीच्या वार्षिक उत्पन्नातील वाटा देण्यात येतो. त्याला ‘जण’ असे म्हणतात. यावरून प्रत्येक हक्कदाराला ‘जणकार’ या नावाने ओळखले जाते. गोव्यातील कोमुनिदाद ही संस्था समाजाच्या तळागाळात पोचावी म्हणून १७७५ मध्ये तिला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू , लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास,कला अकादेमी,गोवा.