गोव्यातील सत्तरी आणि सांगे तालुक्यांत सादर केला जाणारा पारंपरिक लोकनाट्यप्रकार. गोव्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावांतूनही हे लोकनाट्य सादर केले जाते. रणमाल्यातील सर्व कलाकार हे पुरूष असून ते दरवर्षीच्या शिगमो ह्या लोकोत्सवाचा भाग म्हणून अथवा अन्य एखाद्या खास उत्सवाच्या निमित्ताने हे लोकनाट्य गावच्या मंदिरासमोर अथवा कोंबडे तसेच बकरे बळी देण्याच्या ‘चबाटो’ नामक जागेजवळ संवत्सर पाडव्याला सादर करतात.
रणमाले हा शब्द रण आणि माले अशा दोन शब्दाच्या जुळणीने झाला आहे. रण म्हणजे युद्ध किंवा युद्धभूमी आणि ‘माले’ हा मारले या शब्दाचा कोंकणीतील उच्चार ‘रण मारले’ या अर्थाने ‘रणमाले’ हा शब्द तयार झाल्याचे अभ्यासक मानतात. सत्तरी आणि सांगे या भागांत पूर्वी कुळवाडी लोकांची वसती होती. त्यांना अधून-मधून मेशे जमातीचे लोक उपद्रव करीत. मेशे जमातीला हब्बू, हेबर आणि भिल्ल या नावांनीही ओळखले जाई. त्यांचा उपद्रव वाढत गेला. ते कुळवाड्याच्या आया-बायांना उचलून नेत. पिकेही लुटत. कुळवाड्यांनी त्यांचा बंदोबस्त करायचे ठरविले. सर्व प्रमुख मेशांना रात्रीच्या खाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. खाण्याच्या वेळी सर्वांनी नशापान केले होते. बेधुंद अवस्थेत असताना कुळवाड्यानी त्यांच्यावर आकस्मिक हल्ला करून सर्वांना कंठस्नान घालून त्यांचा वंशविच्छेद केला. त्या विजयी घटनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी रणमालें हे लोकनाट्य सादर करण्यात येऊ लागले आणि ते आजतागायत दरवर्षी सादर केले जाते. काहींच्या मते या जातिसंहाराच्या भरपाईंच्या स्वरूपात त्याचे सादरीकरण होते.सत्तरी महालाच्या झरमे आणि करंझोळ या गावात दरवर्षी फाल्गुन वद्य सप्तमीला ‘चोर’ नावाचा विधिरूपातील जत्रोत्सव होतो. त्याच्या आदल्या रात्री रणमाले सादर केले जाते. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या जन्मोत्सवात काही निवडक ‘चोरांना’ प्रतीकात्मक रीत्या जमिनीत जिवंत पुरले जाते आणि एखाद्याला फासावर चढविले जाते.
रणमाल्याची सुरुवात रात्रीची जेवणे उरकल्यावर होते. गावच्या मंदिरातील पुजारी, गावकार, भगत किंवा गुरव ग्रामदैवताला गाऱ्हाणे घालतो व रणमाल्यासाठी ‘शब्द’ देतो. दैवताची संमती म्हणून नारळ किंवा फूल यांचा प्रसाद दिला जातो. तिथे समई पेटवली जाते. त्यानंतर सर्व सहभागी पुरुषकलाकार प्रेक्षकांसमोर एका रांगेत पडद्याच्या स्वरूपात उभे राहतात. या रांगेत प्रमुख गायक, सहगायक आणि वादकांचा प्रामुख्याने सहभाग असतो. घुमट, ढोल, कांसाळे आणि झांजी या वाद्यांचा उपयोग गायनाच्या साथीसाठी केला जातो. मुख्य गायक गळ्यात फुलमाळा घालतो. सफेद आखूड धोतर, सदरा, डोक्याला पगडी, कपाळाला कुंकू आणि अंगावर उपरणे असा सर्वांचा वेश असतो. रणमाल्यात एक सलग गीतकथा असते. गीतकथेमध्ये रामायणकथा किंवा सामाजिक आणि कौटुंबिक विषयावरील कथानके किंवा स्थानिक जमातीसंबंधीचे कथानक असते. या गीतकथेला ‘जत’ अथवा ‘वळ’(ओळ) असे म्हणतात. ही जत म्हणताना गायन-वादन करणारी रांग लयबद्ध पदन्यास करते. अधूनमधून हा मानवी पडदा मागे-पुढे सरकत असतो. अधूनमधून मुख्य गानकथेला छेद देत एखादा कलाकार मानवी पडद्यामागून प्रेक्षकांसमोर येतो आणि एखादे सोंग सादर करतो. ते प्रहसनाच्या स्वरूपातील असते व त्याचा विषय सामाजिक अथवा कौटुंबिक स्वरूपाचा असतो. या प्रस्तुतीला ‘धोंगा’ असे म्हणतात. धोगा एखादा कलाकार, दोन किंवा तीन कलाकार एकत्रितपणे सादर करतात.
रणमाल्याचा आरंभ नमनाने होतो. यात सुरुवातीला गणेशस्तवन होते. त्या वेळी गणपतीचा लाकडी रंगीत मुखवटा घातलेला कलाकार मानवी पडद्यामागून प्रवेशतो. त्याची ब्राह्मणाद्वारे विडंबनात्मक पूजा होते. त्यानंतर कमरेला मोरपिसे बांधून स्त्रीवेशातील पात्र शारदेच्या रूपात प्रवेशते आणि नृत्य करून जाते. त्यानंतर गीतकथेला सुरुवात होते. त्या वेळी ‘निटयो’ नावाचे पात्र काही ठिकाणी सादर केले जाते. हे पात्र स्वतःभोवती गिरक्या घेत नृत्य करते. गणपती, शारदा आणि निटयो या पात्रांना सोंगा म्हणतात आणि प्रहसनात्मक सादरीकरणाला ‘धोंगा’ असे म्हणतात. गावातील कोणताही कलाकार धोंगां सादर करू शकतो. किंबहूना रणमाल्यात धोंगा सादर करण्याचा नवसही बोलला जातो. एखाद्याचे धोंगा-सादरीकरण खूप आवडल्यास प्रेक्षक लगेच मंचावर येऊन त्या पात्राच्या गळयात फुलांची माळ घालतो.
अलीकडे काही रणमाल्यात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान इत्यादी पात्रे प्रत्यक्ष सादर केली जातात. मात्र परंपरागत रणमाल्यात अशी गीतकथेतील पात्रे सादर केली जात नाहीत. रणमाले पहाटेपर्यंत चालते. पहाटेच्या प्रहरी गावातील सर्व दैवतांना आपापल्या स्थळी परतण्याचे आवाहन केले जाते. ‘पुनवेचा चंद्रीम रामपारी आला। उठा गा देवांनो जावया घरा।।’ असे गीत गाऊन रणमाल्याची समाप्ती होते. मंदिरातील पुजारी देवतांना आवाहन करतो. सर्वांना प्रसाद दिल्यावर कलाकार आपापल्या घरी परततात.
संदर्भ :
- फळदेसाई, पांडुरंग, गोवा: फोकलोर स्टडीज, पणजी, २०११.