कदंबाचे फूल व पाने

कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया कदंब असून अनेक ठिकाणी याची लागवड मुद्दाम करतात. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार व भारत या देशांत हा आढळतो. भारतात कोकण, कर्नाटक, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी हे वृक्ष मोठ्या संख्येने आढळून येतात.

कदंबाचे खोड सरळ व १२-२१ मी. उंच असते. घेर १.८-४.५ मी. असतो. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या असतात, हे या झाडाचे वैशिष्टय आहे. कोवळे भाग लवदार; पाने साधी, समोरासमोर, मोठी, ३० सेंमी. लांब आणि १५ सेंमी. रुंद, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून चकचकीत तर खालून लवदार असतात. फुलोरे गोल, एकेकटे व अग्रस्थ असतात. फुले नारिंगी, लहान व सुवासिक असतात. पिकलेले फळ पिवळे व लहान संत्र्याएवढे असते. नारिंगी व मांसल पुष्पासनावर बोंडे गर्दीने रचलेली आणि अल्पबीजी असतात. बिया लहान व खरबरीत असतात.

कदंबाची फळे खाण्याजोगी असली, तरी चवदार नसतात. त्याचे लाकूड मजबूत व नरम असून कापण्यास, रंधण्यास सोपे जाते. मात्र लाकूड फारसे टिकाऊ नसते. होड्या, खोकी, तक्ते, फळ्या, आगपेट्या व काड्या, कागद, सजावटी सामान, चहाच्या पेट्या, कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी या लाकडाचा वापर करतात.

या वृक्षाची साल, पाने व फुले यांचे विविध औषधी उपयोग आहेत. याची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. पित्त, दाह, ताप व खोकला झाल्यास सालीचा वापर करतात. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. अपचन आणि ज्वर झाल्यास फळे उपयोगी पडतात. या वनस्पतीत सिंकोटॅनिक आम्ल असते.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा