वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वी रीत्या जगण्यासाठी सक्षम होत असतात.

फायलियम कीटकाचे पानाशी झालेले अनुकूलन

अनुकूलने अनेक प्रकारांची असतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये शरीररचना, शरीरक्रिया आणि वर्तन यांत एकाच वेळी विविध अनुकूलने आढळण्याची शक्यता असते. जमिनीवरील सस्तन प्राण्यांच्या हातापायांच्या रचनेचे काही प्राण्यांत वेगाने धावण्यासाठी, काहींना वर चढण्यासाठी, काहींत एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडी घेण्यासाठी, तर काहींत हवेत उडण्यासाठी अनुकूलन झालेले दिसते. ही शरीररचनात्मक अनुकूलनाची उदाहरणे होत. देवमाशामध्ये समुद्रातील विविध पातळींवरील दाब सहन करण्याच्या दृष्टीने अनुकूलन झालेले आढळते. पक्ष्यांच्या चोचींच्या रचनेचे त्यांच्या खाद्यांनुसार (उदा., बिया, कवची फळे, किडे व अळ्या, मासे, लहान मासे, लहान सस्तन प्राणी इ.) अनुकूलन झालेले असते. कासव, गोगलगाय इ. प्राण्यांची कवचे व साळींदराच्या अंगावरचे लांब काटे या अनुकूलनाने त्या प्राण्यांचे संरक्षण होते. रंग बदलण्याची क्षमता हा संरक्षक अनुकूलनाचाच प्रकार होय. सजीव स्वत:च्या बचावाकरिता डंख मारणे, चावणे इत्यादींचा अवलंब करतात. ही क्रियात्मक अनुकूलनाची उदाहरणे होत.

मधमाशीमध्ये अनेक प्रकारची अनुकूलने आढळतात. उदा., मध गोळा करण्यासाठी शोषण करणारे अवयव, पराग गोळा करण्याकरिता केस व केसांचे कुंचले, फुलांचे रंग ओळखण्यासाठी डोळ्यांची संवेदनक्षमता, मेणाचे उत्पादन आणि त्यापासून अन्न साठविण्याकरिता व पिलांच्या निवार्‍याकरिता पोळे बनविण्याची क्षमता, पोळ्यातील तीन प्रकारच्या माश्यांचा गुंतागुंतीचा जीवनक्रम इत्यादी. या सर्व अनुकूलनाचे परस्परसंबंध असल्यामुळे मधमाशीला आपला जीवनक्रम यशस्वी रीतीने चालू ठेवता येतो. कीटक जमिनीवर तसेच हवेत राहण्यास सक्षम असल्याने अनुकूलनाच्या बाबतीत सर्वांत यशस्वी ठरतात. म्हणूनच सजीवांच्या एकूण जातींपैकी जवळजवळ ७५% जाती कीटकांच्या आहेत.

अनुकूलनामुळे सजीवांना पुढील क्षमता प्राप्त होतात: (१) सूर्यप्रकाश, पाणी व अन्न मिळवणे, (२) भौगोलिक परिस्थितीत टिकून राहणे, (३) नैसर्गिक शत्रूपासून बचाव करणे, (४) परिस्थितीतील बदलास प्रतिसाद देणे.

काही मूलभूत जैविक अनुकूलने रासायनिक व जनुकीय आहेत. ज्या परिस्थितीत शरीराच्या पेशी जिवंत राहू शकतात, अशी परिस्थिती अगदी मर्यादित आहे. समुद्रात जीवोत्पत्ती झाल्यापासून तिच्यात फारसा बदल झालेला नाही. समुद्रात निर्माण झालेल्या प्राण्यांच्या शरीरद्रव्यांची मूळ रासायनिक घटना गोड्या पाण्यात वा जमिनीवर टिकून राहील, अशा तर्‍हेची अनुकूलन यंत्रणा गोड्या पाण्यात आणि जमिनीवर जीवन शक्य झाले. म्हणूनच मानव आणि इतर सस्तन प्राणी यांच्यामधील रक्त रासायनिक दृष्टया समुद्रातील प्राण्यांसारखे आढळते.

अनुकूलन उपयुक्त ठरण्यासाठी शरीराच्या विविध भागांत एकाच वेळी अनुकूलने होणे आवश्यक असते. उदा., दातांची रचना, पाचक रस, अन्ननलिकेची लांबी त्याचबरोबर प्राण्यांच्या सवयी व प्रतिकार यंत्रणा, या सर्वांत बदल होण्याची आवश्यकता असते.

अनुकूलन हे प्राण्यांच्या अंगी असणारे एक महत्त्वाचे आणि असाधारण लक्षण आहे. बहुतेक अनुकूलने उपजत असली तरी, कित्येक व्यक्तींच्या आयुष्यात ती उत्पन्न होतात. लोहाराच्या उजव्या हाताचे स्नायू एकसारखे उपयोगात असल्यामुळे मोठे होतात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या नैसर्गिक निवड या तत्त्वानुसार ज्या प्राण्यामध्ये एका पिढीतून दुसर्‍या पिढीत उतरणारे बदल आढळतात, त्यांच्यावर नैसर्गिक निवडीचा परिणाम होतो. अनुकूलन हे त्याचेच फळ होय. सजीवांमध्ये होणारे बदल कोणत्याही एका विशिष्ट दिशेने घडून येत नसतात. तसेच ते विशिष्ट हेतूंनी अगोदर निश्चित करून घडवून आणता येत नाहीत.

आनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून संततीत उतरताना त्यांच्यात विविध प्रकारे बदल घडून येतात. सजीवांच्या काही प्रजातींना त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेता न आल्यामुळे त्या कालांतराने र्‍हास पावल्या. डायनोसॉर नष्ट होण्याचे एक कारण हेच असावे, असे काही पुराजीववैज्ञानिक मानतात. सजीवांच्या काही जाती जुळवून घेतात, अनुकूलित होतात आणि त्यांच्या संख्येत वाढ होत राहते. दुर्बल प्रजाती नष्ट होणे किंवा सक्षम प्रजाती टिकून राहणे ही एक प्रकारे नैसर्गिक निवड आहे, असे मानतात. अनुकूलन ही प्रक्रिया वेगवेगळ्या संशोधनांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्‍न जीववैज्ञानिक करीत आहेत. हल्लीच्या संशोधनातून गपी माशांना वेगळे परभक्षी असलेल्या नवीन परिस्थितीत ठेवले असता, अकरा वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या प्रजनन वर्तनात बदल घडून आल्याचे आढळले आहे.