पांढरा कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचा समावेश ॲपोसायनेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव होलॅऱ्हीना अँटिडिसेंट्रिका आहे. करवंद, कण्हेरी या वनस्पतीही ॲपोसायनेसी कुलातील आहेत. भारत, म्यानमार, श्रीलंका तसेच ऑस्ट्रेलिया इ. देशांत पांढरा कुडा वृक्ष आढळून येतो.

पांढरा कुडा (होलॅऱ्हीना अँटिडिसेंट्रिका) : पाने आणि फुलोऱ्यातील फुले यांसह फांदी

पांढरा कुडा हा वृक्ष ३–१० मी. उंच वाढतो. खोडाच्या सालीत पांढरा चीक असतो. पाने साधी, मोठी (१०–२० सेंमी.), समोरासमोर व अंडाकृती-लंबवर्तुळाकार असतात. तो पानझडी असला, तरी जास्त पावसाच्या प्रदेशात त्याची पानगळ थोड्या काळापुरती होते. फुलोरा स्तबक प्रकारातील असून त्यात साधारणपणे १५–२० फुले असतात. ताजी फुले पांढरी असून पिकल्यानंतर ती पिवळी किंवा बदामी होऊन गळून पडतात. फुलात पाच  पाकळ्या असून त्या जेथे एकत्र आलेल्या असतात त्या भागापासून नलिका तयार होते. फुलात पाच पुंकेसर असतात. फळे लांब व शेंगांसारखी असून ती जोडीने येतात. वाळल्यावर शेंगा उकलतात आणि त्यांतून अनेक लहान, चपट्या व केसाळ बिया बाहेर पडतात. बियांना इंद्रजव असे म्हणतात. बियांचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो.

पांढरा कुडा या वनस्पतीचे सर्व भाग औषधी आहेत. मुळाची साल अत्यंत कडू असून ती ज्वर प्रतिबंधक तसेच आमांश व अतिसार यांवर गुणकारी आहे. मुळांपासून कुटजारिष्ट हे औषध तयार करतात. फुलांची व कच्च्या फळांची भाजी करतात. पाने गुरांना चारा म्हणून घालतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा