(प्लांट किंग्डम). सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. सजीवांचे वर्गीकरण मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, वनस्पती आणि प्राणी या पंचसृष्टीत केले जाते. वनस्पतिसृष्टीत सर्व वनस्पतींचा समावेश केला जातो. बहुपेशीय रचना, दृश्यकेंद्रकी पेशी, सेल्युलोजयुक्त पेशीभित्तिका, प्रकाशसंश्लेषणासाठी हरितद्रव्य, जमिनीला चिकटून राहणे इ. वैशिष्ट्ये वनस्पतींची आहेत. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करतात आणि सजीवांना अन्न पुरवितात. त्यांच्या स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवले जाते. प्रजनन शाकीय, अलैंगिक व लैंगिक पद्धतीने होते. कार्ल लिनीअस, बेंथॅम आणि हूकर, एंग्लर आणि प्रँट्ल या वैज्ञानिकांनी वनस्पतींच्या वर्गीकरणाचा पद्धतशीर अभ्यास केला. बेंथॅम आणि हूकर यांनी विकसित केलेली वर्गीकरण पद्धती ऑगस्टीन कांदॉल यांच्या वर्गीकरण पद्धतीवर आधारलेली होती. १९६९ साली रॉबर्ट व्हिटाकर यांनी कार्ल लिनीअस यांच्या वनस्पती वर्गीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी जनुकीय विश्लेषणावर आधारलेली पद्धत रूढ केली. त्यानुसार सृष्टीचे पाच गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. नैसर्गिक आणि जातिविकसित प्रकारांनुसार वनस्पतींचे वर्गीकरण सममिती, शरीर रचना, अवयवामधील साम्य आणि भेद इ. बाबींच्या आधारे करतात, तर जातिविकास (फायलोजेनी) किंवा वंशक्रम वर्गीकरण उत्क्रांतीच्या आधारे करतात. वनस्पतिसृष्टीत सु. ३,९०,८०० जाती असून त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यांच्या वर्गीकरणाची उतरंड सृष्टी, उपसृष्टी, विभाग, वर्ग, उपवर्ग, श्रेणी, गण, कुल, प्रजाती आणि जाती अशी आहे. वर्गीकरणाचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे.

वनस्पतिसृष्टीच्या दोन उपसृष्टी आहेत; (१) अबीजी वनस्पती (क्रिप्टोगॅम्स) व (२) बीजी वनस्पती (फॅनिरोगॅम्स).

अबीजी वनस्पती (क्रिप्टोगॅम्स)

ज्या वनस्पती बीजे किंवा फुले न निर्माण करता बीजाणूंद्वारे पुनरुत्पादन करतात, अशा वनस्पतींचा समावेश या उपसृष्टीमध्ये केला जातो. त्यांचे प्रजनन शाकीय, अलैंगिक किंवा लैंगिक पद्धतीने होते. शाकीय प्रजनन पेशीविभाजन किंवा खंडीभवन प्रकारे, अलैंगिक प्रजनन बीजाणूंद्वारे आणि लैंगिक प्रजनन पुं-युग्मक आणि स्त्री-युग्मक यांच्या संयोगाने होते.

(अ) शैवाल (अल्गी) विभाग : बहुतेक शैवाल जलीय आहेत; ते गोड्या तसेच खाऱ्या पाण्यात वाढतात. काही शैवाल जमिनीवर, तर काही इतर वनस्पतींवर वाढतात. बहुतेक शैवाल स्वतंत्रपणे वाढत असले, तरी काही सहजीवनाच्या स्वरूपात वाढतात. शैवालांना पाने, मुळे व इतर अवयव नसतात. अशा संरचनेला प्रकाय (थॅलस) म्हणतात. त्यांच्या आकारात व आकारमानात विविधता आढळते. काही शैवाल एकपेशीय क्लोरेलासारखे सूक्ष्म असतात, काही क्लॅमिडोमोनससारखे चल असतात, काही स्पायरोगायराच्या धाग्यांप्रमाणे असतात, तर काही ६० मी.पर्यंत उंच सरगॅसम वृक्षासारखे असतात. सर्व शैवालांमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी हरितद्रव्य (क्लोरोफिल) असते. प्रकाशसंश्लेषण मुख्यत: क्लोरोफिल ए या रंगद्रव्यामुळे घडते. याशिवाय क्लोरोफिल बी, सी, डी, ई, कॅरोटीन, झँथोफिल आणि फायकोसायनीन इ. सहयोगी रंगद्रव्ये असतात.

प्रजनन शाकीय, अलैंगिक तसेच लैंगिक प्रकारे होते. शाकीय प्रजननात शैवालाचे खंडीभवन पद्धतीने तुकडे होऊन, प्रत्येक खंडाचे रूपांतर प्रकायात होते. अलैंगिक प्रजनन विविध चल तसेच अचल बीजाणूंच्या निर्मितीने होते. लैंगिक प्रजनन दोन युग्मकांच्या संयोगाने होते. युग्मके कशाभिकायुक्त, आकाराने सारखी असतात (उदा., क्लॅमिडोमोनस) किंवा कशाभिका नसलेली, पण आकाराने सारखी (उदा., स्पायरोगायरा) असतात. अशा लैंगिक प्रजननाला ‘समयुग्मकता’ म्हणतात. दोन भिन्न आकारांच्या युग्मकांच्या मीलनाला असमयुग्मकता म्हणतात. तसेच मोठ्या आकाराचे, अचल स्त्री-युग्मक आणि लहान आकाराचे, चल पुं-युग्मक यांच्या मीलनाला ‘विषमयुग्मकता’ म्हणतात.

प्रकाशसंश्लेषणासाठी लागणाऱ्या रंगद्रव्याच्या आधिक्यावरून शैवालांचे तीन वर्ग केले जातात;

(१) हरित शैवाले (क्लोरोफायसी; ग्रीन अल्गी) : या शैवालांमध्ये क्लोरोफिल ए व बी या रंगद्रव्यांचे आधिक्य असते. अन्न स्टार्चच्या रूपात साठवले जाते. हे शैवाल बहुधा गोड्या पाण्यात सापडतात. उदा., क्लॅमिडोमोनस, स्पायरोगायरा, कारा इत्यादी. ते एकपेशीय, वसाहतीने वाढणारे, तंतुमय किंवा बहुपेशीय असतात.

२) पिंगल शैवाले (फीओफायसी; ब्राऊन अल्गी) : या शैवालांमध्ये क्लोरोफिल ए, बी, सी आणि फ्लुकोझँथीन इ. रंगद्रव्ये असतात. अन्न मॅनिटॉल आणि लॅमिनॅरिन स्वरूपात साठवले जाते. चल बीजाणूला दोन कशाभिका असतात व त्या असमान असतात. हे शैवाल गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, तसेच मचूळ पाण्यात आढळतात. उदा., एक्टोकार्पस, सरगॅसम, फ्यूकस इ. खाऱ्या पाण्यातील अनेक शैवाल अन्न म्हणून वापरले जाते.

३) लाल शैवाले (ऱ्होडोफायसी; रेड अल्गी) : या शैवालांमध्ये क्लोरोफिल ए, डी आणि फायकोएरिथ्रीन इ. रंगद्रव्ये असतात. फ्लोरिडीयन स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवले जाते. ती प्रामुख्याने समुद्रात सापडतात; गोड्या पाण्यात क्वचितच आढळतात. उदा., काँड्रस, जेलिडियम, पॉलीसायफोनिया इ. लाल शैवालापासून ऊती संवर्धन प्रक्रियेत वापरण्यात येणारे अगार मिळवतात (पाहा : शैवाल).

(आ) शेवाळी (ब्रायोफायटा) विभाग : जमिनीवर, सामान्यपणे सावलीत वाढणाऱ्या वनस्पतींचा एक गट. यांचे तीन गट आहेत : यकृतका (लिव्हरवर्ट्‌स), शृंगका (हॉर्नवर्ट्‌स) आणि शेवाळ (हरिता; मॉसेस). त्यांची संख्या मर्यादित आहे. त्या शुष्क पर्यावरणात वाढत असल्या, तरी प्रामुख्याने आर्द्र ठिकाणी वाढतात. त्यांना उभयचर वनस्पती असेही म्हणतात कारण त्या जमिनीवर वाढत असल्या, तरी लैगिंक प्रजननासाठी पाण्यावर अवलंबून असतात. या वनस्पती आवरणयुक्त प्रजननक्षम संरचना (युग्मकधानी आणि बीजाणुधानी) तयार करतात, परंतु फुले किंवा बीजे निर्माण करीत नाहीत. त्यांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. (पाहा : शेवाळी वनस्पती).

(१) यकृतका (लिव्हरवर्ट्‌स) : या वनस्पती लहान, २–२० मिमी. रुंद वाढतात. त्यांची उंची १० मिमी.पेक्षाही कमी असल्याने त्या सहसा लक्षात येत नाहीत. त्या सर्वत्र ओलाव्याच्या जागी वाढतात. सामान्यपणे यकृतका वाकलेले, चपटे, रिबिनीसारखे किंवा शाखाशाखांचे असते; शरीर प्रकाय स्वरूपाचे असते. अलैंगिक प्रजनन प्रकायाच्या खंडीभवनाने किंवा मुकुलासारखी संरचना तयार होऊन होते. हे मुकुल हिरवे, बहुपेशीय व अलैंगिक कलिका असतात. त्यांची संरचना पात्रासारखी असून ते प्रकायावर वाढतात. नंतर ते प्रकायापासून तुटतात आणि अंकुरण होऊन नवीन प्रकायावर वाढतात. लैंगिक प्रजननात, नर आणि मादी इंद्रिये एकाच प्रकायावर किंवा वेगवेगळ्या प्रकायांवर वाढतात. त्यांच्या बीजाणुउद्भिदांचे रूपांतर पाद, दंड आणि संपुटिका यांत होते. अर्धसूत्री विभाजनानंतर संपुटिकेत बीजाणू तयार होतात. याच बीजाणूंचे अंकुरण होऊन नवीन युग्मकोद्भिद तयार होतात.

(२) शृंगका : नावाप्रमाणेच त्यांची संरचना लांबट, शिंगासारखी असते जे बिजाणुउद्भिद असतात. शृंगकाचे शरीर हे शेवाळ आणि यकृतका यांच्यासारखे हिरवे व चपटे असते, जे युग्मकोद्भिद असतात. शृंगका दमट किंवा आर्द्र जागी वाढत असल्या, तरी त्या जगात सर्वत्र आढळतात. त्यांच्या काही जाती बागेत किंवा शेतात तण म्हणून वाढतात.

(३) शेवाळ (मॉसेस) :  लहान, असंवहनी, फुले न येणाऱ्या वनस्पतींचा एक गट. या वनस्पती सामान्यपणे ओलसर जागी किंवा सावलीत पुंजक्याने किंवा गालिचाप्रमाणे (चटईप्रमाणे) वाढतात. त्या साध्या पानांपासून बनलेल्या असून पानांची जाडी एका पेशीएवढी असते आणि ती खोडाला जुळलेली असतात. खोडाला शाखा असतात किंवा नसतात आणि पाणी तसेच पोषकद्रव्ये वाहून नेण्यात खोडाची भूमिका मर्यादित असते. त्यांच्या काही जातींमध्ये संवहनी ऊती असल्या, तरी अल्पविकसित असतात आणि संवहनी वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या ऊतींपेक्षा भिन्न असतात. शेवाळांमध्ये बीजे नसतात आणि फलनानंतर बीजाणुउद्भिद निर्माण करतात, ज्यांमध्ये बीजाणू असतात. या वनस्पती सामान्यपणे ०.२–१० सेंमी. उंच वाढतात. मात्र काही पेशी उंच वाढतात. जसे जगात उंच असलेली शेवाळाची डॉसोनिया जाती सु. ५० सेंमी. उंच वाढते.

(इ) नेचाभ (टेरिडोफायटा) विभाग :  यात नेचे आणि अश्वपुच्छ (हॉर्सटेल) वनस्पतींचा समावेश होतो. या वनस्पती औषधांसाठी, माती धरून ठेवण्यासाठी तसेच शोभेसाठी वाढवल्या जातात. उत्क्रांतीच्या नजरेतून, जमिनीवर वाढणाऱ्या पहिल्या संवहनी ऊती असलेल्या (म्हणजेच काष्ठ आणि अधोवाही ऊती असलेल्या) वनस्पती मानल्या जातात. या वनस्पती सामान्यपणे थंड, दमट, सावलीत वाढतात; काही जाती रेताड मातीतही वाढतात. या वनस्पतींमध्ये, वनस्पतींचे मुख्य शरीर बीजाणुउद्भिद असून त्याला मुळे, खोड आणि पाने असतात. या भागांमध्ये सु-विभेदित संवहनी ऊती असतात. या वनस्पतींची पाने सिलाजिनेलामध्ये असतात तशी लहान (लघुपर्ण), किंवा नेच्यामध्ये असतात तशी मोठी (गुरुपर्ण) असतात. त्यांच्या बीजाणुउद्भिदांना बीजाणुधानी असतात, ज्यांना लागून पानांसारखी उपांगे वाढलेली असतात. या उपांगांना ‘बीजाणुपर्ण’ म्हणतात. काही बाबतीत, बीजाणुपर्ण वेगळीच संरचना तयार करतात. त्यांना शंकू म्हणतात (उदा., सिलाजिनेला, एक्विसीटम). बीजाणुधानी बीजाणुजनक पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजनाने बीजाणू तयार करतात. या बीजाणूंचे अंकुरण होऊन त्यांपासून डोळ्यांना सहजपणे न दिसणारे, लहान परंतु बहुपेशीय, मुक्तजीवी, बहुधा प्रकाशसंश्लेषी (प्रकायी) युग्मकोद्भिद तयार होतात. त्यांना ‘प्रकायिका’ म्हणतात. हे युग्मकोद्भिद वाढण्यासाठी थंड, दमट व सावलीची जागा लागते. अशी खास गरज आणि फलनासाठी पाण्याची गरज, या कारणांमुळे या वनस्पतींचा प्रसार मर्यादित आणि लहान भूप्रदेशापुरता निर्बंधित होतो. युग्मकोद्भिदांमध्ये नर आणि मादी प्रजनन-इंद्रिये असतात. त्यांना अनुक्रमे पुंधानीधर आणि स्त्रीधानीधर म्हणतात. पुंधानीधरापासून सोडलेले नर-युग्मक (पुमणू) स्त्रीधानीधराच्या मुखापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची गरज असते. नर-युग्मक आणि स्त्रीधानीधरातील अंड यांच्या संमीलनातून युग्मनज बनतो. या युग्मनजापासून एक सु-विभेदित बहुपेशीय बीजाणुउद्भिद बनतो, जो नेचाभ वनस्पतींमध्ये प्रभावी टप्पा असतो. बहुतेक नेचाभ वनस्पतींमध्ये सर्व बीजाणू सारख्याच प्रकारचे असतात. त्यांना समबीजाणुक म्हणतात. सिलाजिनेला आणि साल्व्हिनिया या प्रजाती विभिन्न प्रकारचे म्हणजे लहान (लघू) व मोठे (गुरू) बीजाणू तयार करतात. त्यांना ‘विषमबीजाणुक’ म्हणतात. गुरुबीजाणू आणि लघुबीजाणू यांचे अंकुरण होऊन त्यांपासून अनुक्रमे मादी आणि नर – युग्मकोद्भिद (गॅमेटाफाइट) बनतात. त्यातील मादी-युग्मकोद्भिद हे मूळ पालक बीजाणुउद्भिदांवर वेगवेगळ्या कालावधीसाठी राहतात. युग्मनजापासून भ्रूण विकसित होण्याची प्रक्रिया मादी-युग्मकोद्भिदामध्ये होते. हा प्रसंग बीजनिर्मितीचा असल्याने उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. टेरिडोफायटा वनस्पती चार वर्गात विभागल्या जातात; सायलोप्सिडा (उदा. सायलोटम), लायकोप्सिडा (उदा., सिलाजिनेला, लायकोपोडियम), स्फेनोप्सिडा (उदा., एक्विसीटम) आणि टेरोप्सिडा (डायोप्टेरिस, टेरिस).

बीजी वनस्पती (फॅनिरोगॅम्स)

ज्या वनस्पती बीजे निर्माण करतात, त्यांचा समावेश या उपसृष्टीत केला जातो. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा बीजी वनस्पती हा एक उपगट असून त्यांचे दोन गट आहेत; ज्यांची बीजे उघडी असतात, त्यांना ‘अनावृतबीजी वनस्पती (जिम्नोस्पर्म)’ म्हणतात, तर ज्यांची बीजे आवरणाखाली असतात त्यांना ‘आवृतबीजी वनस्पती (अँजिओस्पर्म)’ म्हणतात.

(अ) अनावृतबीजी वनस्पती (जिम्नोस्पर्म) : ज्या संवहनी वनस्पतींची बीजे उघडी असतात आणि ज्या बीजांद्वारे पुनरुत्पादन घडून येते, त्यांना ‘अनावृतबीजी’ वनस्पती म्हणतात. अनेक अनावृतबीजी वनस्पतींची बीजे शंकुमध्ये निर्माण होतात आणि पक्व होईपर्यंत दिसून येत नाहीत. कोनिफरोफायटा, सायकॅडोफायटा, गिंगोफायटा आणि निटोफायटा असे त्यांचे चार विभाग असून ८८ प्रजातीत सु. १,००० जाती जगात विखुरलेल्या आहेत. सर्व अनावृतबीजी वनस्पतींमध्ये, वनस्पतींचे दृश्य शरीर (वाढणारे खोड आणि फांद्या) बीजाणुउद्भिद किंवा अलैंगिक पुनरुत्पादन दर्शवतात. सामान्यपणे बीजाणुउद्भिदाला खोड असून त्याला मुळे व फांद्या, तसेच प्रजननक्षम संरचना असतात. संवहनी वनस्पतींप्रमाणेच, या वनस्पतींमध्ये काष्ठ ऊती व अधोवाही ऊती असतात. काष्ठ ऊती वनस्पतीच्या सर्व भागांकडे पाणी व खनिजे वाहून नेतात, वनस्पतीला आधार देतात, तर अधोवाही ऊती पानांमध्ये तयार झालेली शर्करा, ॲमिनो आम्ले आणि कार्बनी पोषकद्रव्ये यांची वाहतूक करतात.

(आ) आवृतबीजी वनस्पती (अँजिओस्पर्म) : जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा हा वैविध्यपूर्ण गट असून या गटात त्यांचे ६४ गण, ४१६ कुले, सु. १३,००० प्रजाती आणि सु. ३,००,००० जाती येतात. अनावृतबीजी वनस्पतींप्रमाणेच, आवृतबीजी वनस्पतीही बीजे निर्माण करतात. मात्र अनावृतबीजी वनस्पतींपेक्षा आवृतबीजी वनस्पतींमध्ये पुढील काही लक्षणे जसे फुले येणे, बीजांमध्ये भ्रूणपोष असणे आणि बियांसहित फळे तयार करणे इ. वैशिष्ट्ये वेगळी दिसून येतात. थोडक्यात, ज्या वनस्पतींची बीजे फळासारख्या आवरणात बंदिस्त/वेष्टित असतात, त्यांना आवृतबीजी वनस्पती म्हणतात. या वनस्पतींमध्ये पोषण, प्रकाशसंश्लेषण आणि पेशीविभाजन अशी कार्ये घडून येण्यासाठी खास पेशी, ऊती या उत्क्रांत झालेल्या असतात. त्यांच्यात अधिक उत्क्रांत झालेल्या काष्ठ ऊती आणि अधोवाही ऊतीही असतात, ज्या वनस्पतींच्या सर्व भागांना पाणी आणि पोषकद्रव्ये पुरवतात.

आवृतबीजी वनस्पतीचे दोन गट असून भ्रूणापासून उद्भलेल्या बीजपत्राच्या संख्येवरून ते केलेले आहेत :

(१) द्विबीजपत्री / द्विदलिकित (डायकॉटिलेडॉन) : या वर्गातील वनस्पतींच्या भ्रूणाला दोन बीजपत्रे असतात. त्यांच्यात सोटमूळ संस्था असते आणि खोड हे फांद्यायुक्त असते. पाने जाळीदार शिराविन्यास दर्शवतात, तर फुले चार किंवा पाच अवयवी सममिती दर्शवतात. द्वितीयक वाढ ही सर्वसाधारणपणे दिसून येते. उदा., सूर्यफूल, जास्वंद इत्यादी.

(२) एकबीजपत्री / एकदलिकित (मोनोकॉटिलेडॉन) : या वर्गातील वनस्पतींच्या भ्रूणाला एकच बीजपत्र असते. त्यांच्यात आगंतूक मूळ संस्था असते आणि खोड फांदीविना असते. त्यांना फांद्या क्वचित असतात. पानांचे देठ वेष्टित असतात आणि त्यांच्यातील शिरविन्यास हा समांतर पद्धतीचा असतो. फुले त्रिअवयवी सममिती असतात. त्यांच्यात ऊतककराचा (कँबियम) अभाव असल्याने द्वितीयक वाढ नसते. उदा., मका, ज्वारी, गहू, ऊस, इत्यादी.