पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणामधील पक्षी. या गणातील पक्षी चिखल असलेल्या पाणथळ जागा व दलदलीचे भाग अशा ठिकाणी घरटी बांधतात. पाय आणि चोच लांब असून पायाच्या चार बोटांना मुळाशी पडदे असतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. भारतात चित्र बलाक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, पांढरा करकोचा व काळा करकोचा अशा जाती आहेत.

भारतात प्रामुख्याने रंगीत करकोचा आढळतो. याचे शास्त्रीय नाव आयबिस ल्युकोसेफॅलस आहे. त्याची उंची सु. १ मी. असून संपूर्ण शरीरावर पांढरी पिसे असतात. मात्र बाजूच्या पिसांवर हिरवट काळ्या चकाकणार्‍या  खुणा असतात. छातीवर आडवा काळा पट्टा असतो. शेपटीजवळ गुलाबी पिसे असतात. म्हणून याचे नाव रंगीत करकोचा. त्याचा चेहरा फिकट पिवळा असून त्यावर पिसे नसतात. चोचीला थोडासा बाक असून रंग पिवळा असतो. पाय लांब असतात व पायाचा बराचसा भाग उघडा व पिसे नसलेला असतो. पाणथळ जागा किंवा जलाशय यांच्या आसपास समूहाने हे पक्षी आढळतात. मासे, बेडूक, कीटक, खेकडे, गोगलगायी इ. त्यांचे अन्न आहे. इतर जातींच्या करकोच्यांसमवेत हे पक्षी चिखलात वा उथळ पाण्यात उभे राहून मान सरळ करून, चोच उघडून व अर्धवट बुडवून भक्ष्याचा शोध घेतात.

करकोचाचे पाण्यात अगर काठावर असलेल्या झाडांवर घरटे करतात. या काटक्यांच्या घरट्याला मध्यभागी एक खळगा असतो. त्यात पाणवनस्पतींच्या फांद्या व पाने लावलेली असतात. करकोच्यांच्या स्वरयंत्रातील स्वरतंतू अविकसित असतात, त्यामुळे त्यांना सुरेल आवाज काढता येत नाही. विणीच्या हंगामात नर व मादी प्रणयक्रीडा करतेवेळी घशातून गुरगुर असा आवाज काढतात.  चोची एकमेकांवर आपटून खडखडाट करतात. मादी एका वेळेला ३-५ अंडी घालते. ती मळकट पांढरी असून त्यावर ठिपके किंवा रेघा असतात. नर-मादी दोघेही अंडी उबवितात आणि पिलांना अन्न भरवितात. ५५ ते ११० दिवसांनी पिले उडू लागतात.

करकोचे हे उडताना त्यांच्या आकारमानावरून बगळ्यासारखे दिसतात. बगळ्यांमधून ह्या पक्ष्यांना ओळखता येते. उडताना करकोच्यांची मान लांब ताणलेली असते, तर बगळ्यांची मान खांद्यात खेचून सपाट इंग्रजी एस् आकाराची झालेली असते. करकोच्यांच्या बर्‍याच जाती स्थलांतर करतात. पश्चिम आशिया आणि मध्य यूरोपातून लांब अंतराचा पल्ला पार करून करकोचे भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार इ. देशांत स्थलांतर करतात. भारतात भरतपूर व चिल्का सरोवरांवर आणि महाराष्ट्रात मायणी, उजनी, कळंबा व जायकवाडी या जलाशयांवर दरवर्षी अन्नासाठी व प्रजननासाठी हे पक्षी मोठ्या संख्येने येतात. अनेक देशांत करकोचा हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा