अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे सु. १०० प्रकार माहीत झाले आहेत. मध्यमवयीन आणि प्रौढवयीन लोकांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार हा रोग होण्याची शक्यता वाढते. इ.स. २००७ मध्ये जगभर मृत्युमुखी पडलेल्या एकूण लोकांपैकी सु. १३% लोक कर्करोगाने मरण पावले होते. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. माणसाप्रमाणे इतर प्राण्यांनाही कर्करोग होतो.
कर्करोग कसा होतो ? यासंबंधीची पुरेशी माहिती वैज्ञानिकांना उपलब्ध झाली आहे. सर्व पेशींमधील सजीवांच्या गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या बाबी जनुकांमार्फत होत असतात. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कर्करोग उद्भवतो.
कर्करोगाचा विकास, उपचार आणि प्रतिबंध यांचा अभ्यास कर्करोगशास्त्रात केला जाते. यात संशोधन आणि वैद्यकीय चिकित्सा अशा दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. कर्करोगशास्त्रातील निष्णात वैद्यकांना कर्करोगशास्त्रज्ञ म्हणतात.
मनुष्याला होणार्या कर्करोगाचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते : (१) कर्करोग प्रथम प्रकट होणार्या शरीराच्या भगावरून उदा., स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग. (२) कर्करोगाची प्रथम लागण होणार्या ऊतीवरून, उदा., लसीका मांसार्बुद (लिंफोमा). बहुधा त्वचा, स्त्रियांची स्तने आणि पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजननसंस्था, रुधिरनिर्माण (रक्तोत्पादक), लसीकासंस्था आणि मूत्रसंस्था अशा संस्थांच्या इंद्रियांत कर्करोग प्रथम दिसून येतो. अशा वेगवेगळ्या भागांत कर्करोग होणार्या रुग्णांची संख्या देशांनुसार बदलते. जपानमध्ये जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि भारत या देशांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ग्रेट ब्रिटनमधील स्त्रियांमध्ये भारत आणि इतर आशियातील देशांच्या तुलनेत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.
त्वचेचा कर्करोग हा जगभर सामान्यपणे दिसून आलेला कर्करोगाचा एक प्रकार आहे. याची वाढ सावकाश होते आणि शरीराच्या इतर भागांत त्याचा प्रसार होत नाही. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगावर उपचार करणे सोपे जाते. हा रोग झालेल्या बहुतांशी व्यक्ती इलाजानंतर बर्या झाल्या आहेत. मात्र, मारक कृष्णकर्क प्रकारचा त्वचेचा कर्करोग गंभीर स्वरुपाचा असतो. त्वचेतील रंगद्रव्ये निर्माण करणार्या पेशींमध्ये हा कर्करोग होतो. वेळीच इलाज न केल्यास हा कर्करोग शरीरभर पसरतो.
स्तनांचा कर्करोग स्त्रियांना तसेच पुरुषांना होऊ शकतो. मात्र, स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण १०० पटीने अधिक असते. ज्या स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग आढळला आहे त्यांपैकी बहुतांशी ४० वर्षांपलीकडील आहेत. तसेच, स्तनांचा कर्करोग वेळीच लक्षात आल्यानंतर त्यावर इलाज केल्यास अशा स्त्रिया अधिक वर्षे जगतात.
पचनसंस्थेमध्ये सामान्यपणे बृहदांत्र आणि गुदद्वार या इंद्रियांना कर्करोग होतो. वेळीच इलाज केल्यास रुग्णांचे आयुष्य पाच वर्षे किंवा त्याहूनही अधिक वाढते. यकृत, जठर आणि स्वादुपिंड या इंद्रियांनादेखील कर्करोग होऊ शकतो.
श्वसनसंस्थेतील घसा आणि फुप्फुस या इंद्रियांना कर्करोग होतो. औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये जास्त संख्येने फुप्फुसाच्या कर्करोगामुळे लोक मरण पावतात. हा रोग लक्षात येण्यापूर्वीच शरीराच्या इतर भागांत पसरतो, हे यामागील कारण आहे.
प्रजननसंस्थेचा कर्करोग स्त्रियांमध्ये तसेच पुरुषांमध्ये दिसून येतो. पुरुषांमध्ये पुरस्थ ग्रंथींना होणारा कर्करोग सामान्यपणे दिसून येतो. हा कर्करोग झालेल्या पुरुषांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असते. वेळीच योग्य उपचार केल्यास पुरस्थ ग्रंथींच्या कर्करोगाची वाढ आटोक्यात आणता येते. स्त्रियांच्या प्रजनन संस्थेच्या कर्करोगात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुख्य भागात कर्करोग उद्भवतो, तर काहींमध्ये गर्भाशयाखाली असलेल्या ग्रीवेचा कर्करोग उद्भवतो. तरुण स्त्रियांमध्ये ग्रीवेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते.
अस्थिमज्जा आणि रक्त निर्माण करणार्या इंद्रियांच्या कर्करोगाला श्वेतपेशी कर्करोग (ल्युकेमिया) म्हणतात. यामुळे रक्तातील अपक्व पांढर्या पेशींची संख्या वाढते आणि त्या इतर रक्तद्रव्यांच्या निर्मितीत दोष निर्माण करतात.
लसीकासंस्थेच्या ऊतींनाही कर्करोग होऊ शकतो. लसीकासंस्था ही एक वाहिन्यांचे जाळे असून त्यांद्वारे शरीरातील द्रव पदार्थ पुन्हा रक्तप्रवाहात मिसळले जातात. रोगांचा प्रतिकारही या संस्थेद्वारे केला जातो. लसीकासंस्थेच्या कर्करोगाला लसीका मांसार्बुद म्हणतात. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्ये हा रोग होऊ शकतो.
उत्सर्जन संस्थेच्या इंद्रियांपैकी मूत्राशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असून स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
शरीरातील ऊतींच्या ज्या भागात अर्बुदाची वाढ होते त्यानुसार वैज्ञानिक कर्करोगाचे गट पाडतात. त्वचेचा बाह्यस्तर आणि शरीरातील पृष्ठभाग तसेच इंद्रियांच्या अभिस्तर ऊती यांना होणार्या कर्करोगाला ‘कर्क अर्बुद’ किंवा ‘अभिस्तर अर्बुद कर्करोग’ असे म्हणतात. स्तने, बृहदांत्र आणि फुप्फुस अशा अनेक इंद्रियांमध्ये ग्रंथी असतात. या ग्रंथीमध्ये उद्भवणार्या कर्करोगाला ‘ग्रंथिकर्क अर्बुद’ म्हणतात. संयोजी ऊतींना होणार्या कर्करोगाला ‘ऊती अर्बुद’ म्हणतात. हाडे आणि कास्थी संयोजी ऊतींची बनलेली असतात. स्तने, पचनसंस्था, श्वसनसंस्था आणि प्रजननसंस्था इत्यादींनाही ‘ऊती अर्बुद’ होऊ शकतो.
लहान मुलांमध्ये उद्भवणार्या कर्करोगाचे स्वरूप प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणार्या कर्करोगांहून भिन्न असते. लहान मुलांमध्ये चेता ऊती, डोळे, वृक्क, मृदू ऊती आणि हाडे इ. भागांचे कर्करोग आढळतात. जे क्वचितच प्रौढांना होतात.
प्रत्येक व्यक्तीचे जीवन फलित अंडपेशीपासून सुरू होते. वाढ, विभाजन आणि काही विशिष्ट प्रक्रियांमुळे या अंडपेशीपासून कोट्यवधी पेशींचे शरीर बनते. या प्रक्रिया प्रत्येक पेशीत असलेल्या सांकेतिक माहितीनुसार घडून येत असतात. ही माहिती पेशीकेंद्रातील डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल) रेणूच्या वेटोळ्याच्या काही ठराविक खंडांवर म्हणजेच जनुकांवर रासायनिक संकेताच्या स्वरूपात असते. विशिष्ट जनुके पेशीमधील विशिष्ट कार्य घडवून आणतात. तसेच काही जनुके डीएनएच्या रेणूंमधील बिघाड दुरुस्त करतात. मात्र, वाढत्या वयानुसार डीएनए रेणूंची कार्यक्षमता कमी होत जाते.
जी जनुके पेशींची वाढ आणि पेशींचे विभाजन यांच्याशी संबंधित असतात, त्यांना हानी पोहोचल्याने बहुधा कर्करोग उद्भवतो. या जनुकांपैकी कर्कसदृशजनुके ( आदिकर्कजनुके ) आणि नियामक जनुके हे दोन महत्त्वाचे वर्ग आहेत. आदिकर्कजनुके पेशींची वाढ किंवा विभाजन घडवून आणतात. आदिकर्कजनुकांना हानी पोहोचल्यास त्यांचे रूपांतर कर्कजनुकांमध्ये होते. या जनुकांद्वारे पेशींची संख्या अनेक पटीने वाढते आणि त्यामुळे कर्करोग उद्भवतो. मूत्राशय, स्तने, यकृत, फुप्फुसे आणि बृहदांत्र यांच्या कर्करोगामागील कारण हेच असते. नियामक जनुके पेशींची वाढ किंवा विभाजन यांवर मर्यादा घालतात. (या बाबी मर्यादित ठेवण्यात हातभार लावतात ). नियामक जनुकांना हानी पोहोचल्यास पेशी विभाजनाची क्रिया थांबविण्याची जनुकांमधील क्षमता नाश पावल्यामुळे कर्करोग उद्भवतो. कर्करोग होण्यास या दोन बाबी कारणीभूत ठरतात. अनेक उदारणांतून असे दिसून आले आहे की, पेशी कर्करोगग्रस्त होण्यापूर्वी अनेक वर्षे आधी जनुकांमध्ये बिघाड घडून आलेला असतो. एकदा कर्करोग जडला की विखुरलेल्या, वेगाने विभाजित होणार्या पेशी एकत्र येऊन गाठीसाठी वाढ ( अर्बुद ) होते, त्यामुळे आजूबाजूच्या ऊतींचा नाश होतो. जसजशी गाठ वाढते, तसतसे त्यापासून कर्करोगग्रस्त पेशी वेगळ्या होतात आणि रक्तामार्फत शरीराच्या इतर भागांत पोहोचतात. कर्करोगाचा प्रसार इतर भागांत होण्याच्या क्रियेला विक्षेपण म्हणतात. एकदा या रोगाचा प्रसार शरीराच्या इतर भागांत झाला की, कर्करोगावर उपचार करणे अशक्य होते.
ज्यामुळे कर्करोग होऊ शकेल असा जनुकीय बिघाड दोन प्रकारे होतो : (१) बिघडलेली जनुके पुढील पिढीत उतरल्यामुळे, (२) जनुकांना हानी पोहोचू शकेल अशा पदार्थांच्या सान्निध्यामुळे.
ज्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना कर्करोग झालेला आहे, अशा व्यक्तीला कर्करोग जडण्याची शक्यता आढळते. कर्करोगाला कारणीभूत ठरणारे बिघाड झालेल्या जनुकांचे काही प्रकार मात्यापित्यांकडून मुलांकडे उतरतात, परंतु बहुतेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये डीएनएच्या रेणूत अनेक ठिकाणी दोष निर्माण झालेले असतात. एखाद्या विशिष्ट जनुकामध्ये बिघाड झाल्यास कर्करोग होऊ शकतो. मात्र, कर्करोग निश्चित होतो असे नाही. स्तने, बृहदांत्र आणि इतर स्वरूपाचे कर्करोग बिघडलेली जनुके एका पिढीतून पुढील पिढीत उतरल्यामुळे होतात.
पर्यावरणातील कर्कजन्य पदार्थांमुळे जनुकांमध्ये बिघाड झाल्याने कर्करोग होतो. रसायने, विशिष्ट प्रारणे आणि विषाणू यांमुळे मानवाला कर्करोग होऊ शकतो. अनेक रसायनांमुळे प्राण्यांना कर्करोग होऊ शकतो. याच रसायनांमुळे माणसालाही कर्करोग होऊ शकतो. उदा., सिगरेटच्या धुरात ४,००० रासायनिक पदार्थ असतात. यांतील डझनभर पदार्थ कर्कजन्य आहेत. अॅनिलीनपासून तयार केलेले रंग, आर्सेनिक, अॅस्बेसस्टॉस, बेंझीन, क्रोमियम, निकेल, व्हिनील क्लोराइड, पेट्रोलियम उत्पादने आणि कोळशापासून मिळणारी काही उत्पादिते कर्कजन्य आहेत. अन्नपदार्थांमध्ये मिसळली जाणारी किंवा अन्नपदार्थांवर फवारली जाणारी रसायनेही कर्करोगाला कारणीभूत ठरतात.
विशिष्ट प्रकारच्या प्रारणांमुळे डीएनएच्या रेणूची तोडमोड होते आणि हा रोग जडतो. क्ष-किरणे मोठ्या मात्रेत दिल्यास कर्करोग होऊ शकतो. तसेच काही विषाणूंमुळे लोकांना कर्करोग होऊ शकतो. उदा., ह्युमन पॅपिलोमा नावाच्या विषाणूमुळे ग्रीवेचा कर्करोग होतो.
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपाय :
कर्करोगासंबंधी वेगवेगळ्या स्वरूपाचे संशोधन चालू आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून आणि ज्ञात कर्कजन्य पदार्थांचा संपर्क टाळून हा रोग टाळता येतो. धूम्रपान हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. कर्करोगाच्या एकूण संख्येपैकी सु. १/३ लोकांना धूम्रपानामुळे हा रोग होतो. धूम्रपानामुळे तोंड, स्वरयंत्र, श्वासनलिका, फुप्फुस, वृक्क (मूत्रपिंड), मूत्राशय अशा विविध भागांना कर्करोग होतो. तसेच धूम्रपान न करणारी व्यक्तीदेखील धूम्रपान करणार्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहिल्यास कर्करोगाला बळी पडू शकते. धूम्रपान व्यसन सोडताच अशा व्यक्तीमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होत जाते.
सूर्यप्रकाशात खूप काळ राहिल्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे कृष्णकर्क हा तीव्र स्वरूपाचा कर्करोग होतो. संरक्षक वस्त्रे आणि सनस्क्रीन वापरल्यास यापासून बचाव करता येतो.
अन्नपदार्थात निसर्गतःच असलेली रसायने कर्करोग निर्माण करू शकतात. उदा., आहारात चरबीयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यास स्तने, बृहदांत्र आणि पुरस्थ ग्रंथींचा कर्करोग होऊ शकतो. अतिरिक्त मद्यपानामुळे तोंड, स्वरयंत्र, श्वासनलिका आणि यकृत इत्यादींचा कर्करोग होतो. व्यसन सोडताच रोग होण्याची शक्यता कमी होते.
निदान आणि उपाय :
केवळ कर्करोगतज्ज्ञ कर्करोगाचे निदान करू शकतात. मनुष्याला होणार्या विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान करण्यासाठी कोणतीही एक विशिष्ट चाचणी नाही. वेगवेगळ्या चाचण्यांद्वारा हा रोग प्राथमिक अवस्थेत ओळखता येऊ शकतो. उदा., गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग ओळखण्याची पॅप चाचणी. जॉर्ज पॅपनिकलो या वैज्ञानिकाने ही चाचणी शोधली. या चाचणीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाने स्त्रिया मरण पावण्याचा दर एकदम खाली आला. या चाचणीसाठी गर्भाशयातील पेशी काढून त्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करतात. मूत्राशय, स्तन, फुप्फुस, जठर आणि घसा या भागातील कर्करोगाची चाचणी करण्यासाठीही त्या भागातील पेशी (ऊती) काढतात आणि पेशींचे निरीक्षण करतात. अशा परीक्षणाला ‘जीवोतक परीक्षा’ म्हणतात. रक्तद्रव्य, लघवी किंवा शरीरातील इतर पदार्थांच्या नमुन्यावर कर्करोग-रेखक (मार्कर) वापरून वरील अवयवांचा प्राथमिक अवस्थेतील कर्करोग ओळखता येतो. पुरस्थ ग्रंथींचा कर्करोग ओळखण्यासाठी विकरांचा उपयोग करतात. स्त्रियांमधील स्तनांचा प्राथमिक अवस्थेतील कर्करोग ओळखण्यासाठी स्तनग्रंथी आलेखन (मॅमोग्राफी) तंत्राचा वापर करतात. या तंत्रात कमी मात्रेच्या क्ष-किरणांद्वारे स्तनांचा अंतर्भाग तपासला जातो. मोठ्या आतड्याचा कर्करोग ओळखण्यासाठी विष्ठेतील रक्ताची पाहणी करतात किंवा सिग्मॉइडोस्कोपी तंत्रामध्ये दुर्बिणीच्या साह्याने मोठ्या आतड्याच्या अवग्रहाकारी (सिग्मॉइड) भागापर्यंतची तपासणी करतात.
बर्याचदा रोग जुना झाल्यावरच रुग्ण वैद्यकीय सल्ला घेतात. अर्बुद (गाठ) लहान असताना आणि ठराविक जागी असताना कर्करोगाचे निदान झाले, तर उपचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो. वयाच्या ४० वर्षांनंतर प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा तपासणी केल्यास, निदानानुसार योग्य उपचार करता येतात.
कर्करोगाचा प्रकार, स्वरूप यांनुसार शस्त्रक्रिया, किरणोपचार किंवा औषधोपचार केले जातात. कर्करोगाच्या बहुतेक प्रकारांमध्ये शस्त्रक्रिया करून आजूबाजूच्या ऊतींना धक्का पोहोचू न देता अर्बुद काढून घेतला जातो. किरणोपचार पद्धतीत कर्करोगग्रस्त पेशींवर किरणोत्सारी पदार्थांपासून निघणार्या क्ष-किरणांचा मारा करतात. पुरस्थ ग्रंथी, मान, डोके इ. भागांतील कर्करोगांवर याच पद्धतीने उपचार केले जातात. क्ष-किरणांमुळे रोगग्रस्त पेशी मरतात; परंतु त्यासोबत निरोगी पेशीही मरतात. कर्करोगाच्या विविध प्रकारांवर उपचार करण्यासाठी औषधे देतात. विशेषतः श्वेतपेशी कर्करोग, लसीका मांसार्बुद आणि वृषणांच्या कर्करोगावर औषधे प्रभावी ठरतात. ही औषधे पेशी-विभाजनाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. मात्र, या औषधोपचार पद्धतीमुळे रुग्णाची अन्नावरील वासना उडते आणि उलट्या होतात. केस निर्माण करणार्या पेशींमध्ये अ़डथळा निर्माण झाल्याने केसही गळतात.
विकसित तसेच अनेक विकसनशील देशांमध्ये कर्करोगासंबंधी आनुवंशिकी क्षेत्रात तसेच रेणवीय औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन प्रकल्प चालू आहेत. कर्करोगाच्या वाढीमध्ये आदि-कर्कजनुके आणि नियामक जनुकांची कोणती भूमिका असते, याबाबत संशोधन चालू आहे. यातून कर्करोगाच्या पेशींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत. तसेच ठराविक प्रकारच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणार्या अपसामान्य जनुकांच्या कार्यात किंवा जनुकांच्या अपसामान्य कार्यात हस्तक्षेप करणारी औषधे, उपचारपध्दती शोधण्यात येत आहेत. निरोगी पेशींना कसलीही हानी पोहोचू न देता केवळ कर्कपेशींचा नाश करू शकतील, अशी औषधे तयार करण्यात येत आहेत.
जगभर सर्वत्र कर्करोगाविषयी लोकांमध्ये भीती आणि माहितीचा अभाव दिसून येतो. केवळ उपचार करण्यात दिरंगाई झाल्यामुळे अनेकजण कर्करोगामुळे मरण पावतात. कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये त्यांचे समाजातील स्थान, कर्करोग झालेली जागा, कर्करोगाबद्दल त्यांना असलेले ज्ञान, उपचारपध्दती यांबाबत संभ्रम आढळतो. कर्करोग भयप्रद असला तरी असाध्य नाही. वैद्यकीय उपचारांबरोबरच कर्करोगासंबंधी प्रबोधन करणे, रुग्णांशी आपुलकीने वागणे, त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे इ. बाबींची गरज आहे.