उभयलिंगी प्राण्यांच्या किंवा स्त्रीलिंगी प्राण्यांच्या अंडाशयात निर्माण होणार्‍या प्रजननक्षम पेशीला ‘अंड’ (अंडाणू) म्हणतात. या परिपक्व अंडपेशीचा शुक्रपेशीबरोबर संयोग होऊन गर्भाची निर्मिती होते.  

अंडनिर्मिती आणि रचना असे काही किरकोळ भेद सोडल्यास, सर्व प्राण्यांच्या मादीमध्ये अंड सारखेच असते. अंड ही एकपेशी असून जीवद्रव्याने बनलेली असते. अंडाचे बाहेरचे आवरण एका पातळ पापुद्र्याचे असते आणि ते अर्धपार्य असते. या जीवद्रव्याचे इतर पेशींप्रमाणेच दोन भाग असतात; एक  पेशीद्रव्य आणि दुसरा  केंद्रक. पक्व अंडाच्या केंद्रकातील गुणसूत्रांची संख्या कायिक पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांच्या संख्येच्या निम्मी असते. स्त्रियांच्या कायिक पेशीतील गुणसूत्रे ४४ + एक्स एक्स, तर अंडातील गुणसूत्रांची संख्या २२+ एक्स अशी असते. एक्स  याला लिंगसूत्र म्हणतात.

मानवी अंड

मानवी अंड ११७ – १४२ मायक्रॉन एवढ्या आकारमानाचे असून त्याभोवती इतर प्राण्यांच्या अंडांप्रमाणेच संरक्षक व पोषक थर असतात. अंडाशयात अपूर्ण वाढलेली असंख्य अंडपुटके असतात. विशिष्ट कालमर्यादेनंतर अंडाची वाढ पूर्ण होऊन परिपक्व अंड अंडाशयाचा भेद करून बाहेर पडते. तेथून अंडवाहिनीमार्गे गर्भाशयाकडे जाते. या अंडाचा अंडवाहिनीतून जात असतानाच (स्त्री-पुरुष मीलन झाल्यास) शुक्रपेशीशी संयोग झाल्यास फलन होते. असे फलित अंड गर्भाशयाच्या अंतःस्तराला चिकटून राहते व तेथे त्याची वाढ होते. अशा प्रकारे अंड फलित झाल्यानंतर गर्भाची पूर्ण वाढ होऊन प्रसूती होते. प्रसूतीनंतर अंडनिर्मिती काही काळ थांबते.

अंड फलित न झाल्यास अतिवृद्धी झालेल्या गर्भाशयाच्या अंतःस्तराबरोबर ते विसर्जित होते. यावेळी गर्भाशयाच्या अंतःस्तरातील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होतो. याला ऋतुस्राव म्हणतात. स्त्रीमध्ये अंडनिर्मिती वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी सुरू होऊन ४० ते ४५ वर्षांपर्यंत चालू राहते. दर २४-२८ दिवसांत एक ऋतुचक्र पूर्ण होते. सामान्यपणे प्रत्येक ऋतुचक्राच्या १२ ते १६ व्या दिवशी एक अंड अंडाशयातून परिपक्व होऊन बाहेर पडते.  स्त्रीच्या वयाच्या सर्वसाधारण ४५ वर्षांनंतर अंडनिर्मिती थांबते. स्त्रीजीवनातील या काळाला रजोनिवृत्ती म्हणतात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा