मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या गोगलगायींचा समावेश होतो. कवडी हा शंखाच्या गोगलगायींचा एक प्रकार आहे. यांच्या सु. २०० जाती आहेत. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागराच्या उष्ण प्रदेशांत हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळतात. ते प्रवाळ भित्तीबरोबर राहतात. या क्षेत्रात जास्त आढळणार्या कवडी प्रकाराचे शास्त्रीय नाव सायप्रिया मोनेटा असे आहे. सामान्य इंग्रजीत त्याला मनीकौरी म्हणतात. याचे कारण आफ्रिका, भारत इत्यादी देशांत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चलन म्हणून या गोगलगायींच्या कवचांचा वापर केला जात असे.
कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. त्यांचे दागिने म्हणूनही वापर होत असे. कवड्यांवर कोरीव काम करून व रंगकाम करून विविध शोभेच्या वस्तू तयार करतात. पट व द्यूत यांसारख्या घरगुती खेळांत कवड्या फासे म्हणून वापरतात. त्यांना दानकवड्या असे म्हणतात.