(व्हेजिटेशन). एखाद्या लहान किंवा मोठ्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला ‘वनश्री’ म्हणतात. जसे, गोड्या पाण्यातील सर्व वनस्पतींच्या समूहाला क्षेत्राच्या प्रकारानुसार डबक्यातील वनश्री, तळ्यातील वनश्री, सरोवरातील वनश्री असा फरक करतात. समुद्रातील सर्व वनस्पतींच्या समूहाचा उल्लेख सागरी वनश्री म्हणून करतात. वनश्री या संज्ञेने अनेक व बहुधा भिन्न जातींच्या किंवा स्वरूपांच्या (झुडूप, वृक्ष, वेल, पर्णहीन, मांसल, गुच्छाकृती, केळीसारखे, जमिनीवर किंवा अन्य पृष्ठभागावर पसरलेल्या इ.) वनस्पतींनी त्या क्षेत्रावर बनलेले नैसर्गिक आच्छादन लक्षात येते. अशा क्षेत्रातील भिन्न जातींचा (स्पीशिजचा) एकत्रित उल्लेख वनस्पतिजात (फ्लोरा) या संज्ञेने करतात. आज सु. साडे तीन लक्ष वनस्पतींच्या जातींची वर्णने उपलब्ध असून उष्ण प्रदेशातील जातींची संख्या सर्वाधिक आहे.

पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश, उंच पर्वत, महासागराचा खोल तळ आणि शुष्क वाळवंटे इ. जागी वनस्पती आढळत नाहीत. हवामान या घटकाचा मोठा परिणाम वनस्पतींचे वितरण आणि त्यांच्या संरचनेतील अनुकूलन या बाबींवर होतो. उष्ण हवामानात विषुववृत्तीय प्रदेशांत वनस्पतींच्या सर्वाधिक जाती आढळतात, कारण तेथे पाणी मुबलक आणि हवामान अनुकूल असते. दोन्ही ध्रुवांकडे जावे, तसे प्रति क्षेत्रफळाला वनस्पतींची संख्या कमी होते. अमेरिकेतील रेडवुड वृक्षाची अस्पर्शित वने, किनाऱ्यालगतची खारफुटी, मृत वनस्पतींपासून बनलेली दलदल, रस्त्यालगत वाढलेली तणाची क्षेत्रे, गव्हाची शेते, लागवडीखालील बागा आणि हिरवळी इ. सर्वांचा समावेश ‘वनश्री’ संज्ञेत होतो.

वनश्रीचा उगम, तिच्यातील घटकांचे स्थानांतर आणि तिच्यावरील मानवाचा प्रभाव याही बाबींचा विचार वनश्रीसंदर्भात केला जातो. कोणत्याही क्षेत्रातील वनश्रीचा उगम सर्व अंगाने पाहिला जातो. अशा क्षेत्रातील वनश्रींचा उगम सर्व दिशांकडून तेथे येऊन स्थिरावलेल्या वनस्पतींशी निगडित असतो आणि अनेकदा पूर्वी झालेल्या त्याच्या स्थानांतरांचा त्या क्षेत्रावर ठसा उमटलेला दिसतो. बहुतकरून स्थानिक वनस्पतींचे विश्लेषण केल्यास तेथील वनस्पतींच्या समूहात पूर्वीच्या भिन्न समूहातील काही जाती आढळतात. उदा., स्पेन व पोर्तुगाल येथील ओलसर घळीतील सदापर्णी चेरीऱ्होडोडेंड्रॉन यांसारख्या वनस्पतींवरून तेथील सध्याच्या वनश्रींचा उगम भूतकाळात असलेल्या अधिक आर्द्रतायुक्त काळात असल्याचे लक्षात येते. नैसर्गिक वनश्रींतील लहानमोठे भाग हे त्या त्या ठिकाणी सतत बदल होत जाऊन बनलेले असतात. उदा., भारतात दक्षिणेकडील पठारावर ज्या तेरडा वनस्पतीच्या १०−१२ जाती सापडतात, त्या मूळच्या समशीतोष्ण प्रदेशातील असून हल्ली त्यांपैकी काहींचा प्रसार डोंगरमाथ्यावर, काहींचा घळीत, तर काहींचा सपाट मैदानावर आहे. कारण प्लाइस्टोसीन काळात (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळात) येथे समशीतोष्ण वने होती, ही बाब अनेक फुलझाडांच्या व काही शंकुधारी परागकणांच्या जीवाश्मांवरून समजली आहे. नंतरच्या काळात त्यांपैकी कित्येक वनस्पती या प्रदेशातून पूर्ण नाहीशा झाल्या (उदा., पोडोकार्प आणि क्युप्रेसस).

वनश्रीमध्ये वनस्पती, मृदा आणि हवामान प्रारूपांचे भिन्न प्रकार दिसून येतात. एखाद्या ठरावीक प्रदेशात कोणकोणत्या वनस्पती वाढतील, हे त्या प्रदेशाचे हवामान, मृदा आणि मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि प्रदेशाचा उतार इ. बाबींवर अवलंबून असते. यूनेस्को आणि ‘नेचर कंझरव्हन्सी’ नावाच्या पर्यावरण संस्थेने जगातील जीवसंहतींचे वनश्रींनुसार वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये पुढील जीवसंहती समाविष्ट आहेत : टंड्रा, तैगा, समशीतोष्ण रुंदपर्णी आणि मिश्र वने, समशीतोष्ण तृणभूमी, उपोष्ण आर्द्रवने, भूमध्य सागरी, मान्सून वने, वाळवंट, शुष्क क्षुपभूमी (झुडपांचा प्रदेश), शुष्क स्टेप (गवताळ प्रदेश), अर्धवाळवंटे, गवताळ मैदाने (सॅव्हाना), वृक्ष सॅव्हाना, उष्ण व उपोष्ण शुष्क वने, उष्ण वर्षावने, आल्पिय टंड्रा, पर्वतीय वने.

भारतातील निरनिराळ्या भागांतील हवामान व भूस्वरूप यांमुळे वनश्रीचे विविध प्रकार दिसतात. म्हणून भारतातील वनस्पतितज्ज्ञांनी वनस्पतिवर्णनानुसार पुढील ‘वानस्पतिक विभाग’ केले आहेत: (१) पश्चिम हिमालय, (२) पूर्व हिमालय, (३) आसाम, (४) गंगेचे मैदान, (५) रुक्ष प्रदेश, (६) दख्खन आणि (७) मलबार. याशिवाय अंदमान व निकोबार बेटे यांचा एक स्वतंत्र विभाग मानला जातो.

पश्चिम हिमालय विभाग : यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व नेपाळचा पश्चिमेचा भाग येतो. या भागात साल वृक्षाची वने, ऐन, धावडा, काळा पळस, वावळा, लाल सावर, जांभूळ, खैर, बांबू, पाडळ, वारंग, चारोळी, वड, तसेच चंबळ, गौज इ. वेली वाढतात. साल वनांमध्ये अधूनमधून मोठी गवताळ मैदाने (सॅव्हाना) असतात; त्यात मुख्यत: रोशा किंवा कनवाल गवत, कोगोन गवत, उला गवत इ. गवते आढळतात. तसेच देवदार, पाइन, पांढरा ओक, अक्रोड इ. झाडांच्या सावलीत दारुहळद, गुलाब इ. वनस्पती वाढतात. गढवालमध्ये २,०००–३,००० मी. उंचीवरील क्षेत्रात फर, पाइन, स्प्रूस यांच्याबरोबर देवदार सापडते. तसेच ओकच्या तीन-चार जाती, बदाम, मॅपल इ. सर्व झाडे येथे वाढतात.

पूर्व हिमालय विभाग : यात नेपाळचा पूर्वेकडचा भाग, सिक्कीम, भूतान, दार्जिलिंग व अरुणाचल प्रदेश येतो. येथेही साल वृक्षाची वने असून लाल सावर, बेहडा, पांढरा शिरीष, शिवण, पाडळ, कांचन तसेच जांभूळ, तमाल, शिसवी, रोहितक यांच्या प्रजातीतील जाती वाढतात. त्याचबरोबर तारका, केवडा व नेचे यांच्या प्रजातीतील काही जाती दिसतात. ओलसर जागी वेत व इतर वेली वाढतात. नदीकाठच्या वनांमध्ये शिसवी, खैर, लाल सावर, पांढरा शिरीष व उंच गवत इ.च्या जाती आढळतात. दार्जिलिंग व त्याच्या पूर्वेकडे साल वृक्षाबरोबर चिलौनी वृक्ष, सोनचाफा, सेरंग, रुद्राक्ष इ.च्या जातीही असतात.

आसाम विभाग : यात आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा इ. प्रदेश येतो. येथील वनश्री पूर्व हिमालयासारखीच असते. दऱ्यांतून उंच गवते किंवा सदापर्णी गर्द वन वाढलेले असते. त्यात सोनचाफा, तामण, सातवीण, तमाल, करमळ, सारडा, शिवण, तुती, रबराचे झाड तसेच वड, जांभूळ, कोकम, वायवर्णा यांच्या प्रजातीतील जाती, बांबूची बेटे, वेतांची जाळी इ. आढळतात. येथील टेकड्यांवरची वने सदापर्णी किंवा शंकुमंत असतात. यात कवठी चाफा, सोनचाफा, चिलौनी, मॅपल, बदाम, तसेच जरदाळू, सफरचंद, नासपती यांच्या प्रजातीतील जाती आढळतात. ऱ्होडोडेंड्रॉनची एक मोठी जाती तेथे वाढते. टेकड्यांच्या सपाटीवर गवती कुरणे असून त्यांत तुरळकपणे काही वृक्ष व अनेक झुडपे आढळतात. उंचीवर सोनटक्का, तेरडा यांच्या प्रजातीतील जाती असतात.

गंगा मैदान विभाग : यात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल इ. प्रदेश येतो. येथील वनश्रीत अनेक मूळच्या व बाहेरून आयात झालेल्या आणि आता ओसाड जागी, रस्त्याच्या कडेने, खेड्यांतील झाडझाडोऱ्यात किंवा पाणथळ जागी वाढलेली झुडपे दिसतात. या प्रदेशाचे (अ) वरचा व (आ) खालचा असे दोन भाग करतात.

(अ) वरच्या गंगा प्रदेशात खैर, शिसवी व इतर काही वृक्ष यांची वने नद्यांच्या पात्रांत आढळतात आणि त्याचबरोबर शतावरी, काटे रिंगणी, वाळा इ. गवते आढळतात. रस्त्याच्या कडेने व खेड्यांतून कडुनिंब, पिंपळ, वड, उंबर, भोकर, बांभूळ, शिरीष, चिंच, विलायती चिंच, जांभूळ, बाभूळ, शेवरी, कोरांटी, करवंद, धोतरा, रुई इ. वनस्पती आढळतात. शेताच्या कडेने कुंपनासाठी निवडुंग, घायपात लावतात. घाणेरीसारखी (टणटणी) विदेशी वनस्पती सर्वत्र आढळते. ताड व शिंदी हे वृक्ष वनांत किंवा लागवडीखाली दिसतात. टाकळा, काटे रिंगणी, पिवळा धोतरा इ. लागवडीखालील जमिनीवर आणि रस्त्याच्या कडेने तणासारख्या उगवलेल्या दिसतात. जलीय वनस्पतींपैकी कमळ, शिंगाडा इ. जाती आढळतात. पाण्यातील हायसिंथ ही संथ जलप्रवाहात किंवा साठलेल्या पाण्यात दिसते.

(आ) खालच्या गंगा प्रदेशात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पाऊस अधिक असल्याने वनश्री दाट वाढते. या प्रदेशातही वरच्या गंगा प्रदेशातील बहुतेक वृक्ष आढळतात. शिवाय टेंबुर्णी, हिरवा अशोक, देशी बदाम, सातवीण, काळा उंबर इ. वृक्ष आढळतात. येथे बांबूची बेटे बरीच असून वेतही अधूनमधून दिसतो. शिंदी चहूकडे पसरलेली आहे. पश्चिम भागात ताड, नारळ, सुपारी यांची लागवड बरीच आहे. येथे दलदलीचे प्रदेश बरेच असून त्यात पाणकणीस, लव्हाळा, पॅनिकम ट्रायफेरॉन यांसारख्या जलवनस्पती आहेत. या विभागातील दक्षिणेकडच्या भागाला ‘सुंदरबन’ म्हणतात. यात गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या अनेक शाखांमुळे खारट-गोड पाण्याच्या अनेक लहान प्रवाहांचे जाळे बनलेले आहे. येथील खाऱ्या जमिनीत कच्छ वनस्पतींचे सदापर्णी दाट वन बनले आहे. येथे जमिनीकडील बाजूस फीनिक्स पॅल्युडोजाचे या एका पामवृक्षाचे समूह आढळतात आणि उपसागराच्या बाजूला चिपी व तिवर वाढतात. ‘सुंदरबन’ हे नाव सुंद्री व तत्सम इतर वनस्पतींमुळे पडले आहे.

रुक्ष प्रदेश विभाग : यात राजस्थान, पंजाब, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ व मध्य प्रदेशाचा काही भाग येतो. राजस्थान हा रुक्ष प्रदेश असून तेथे विरळ वन आहे; त्यात मुख्यत: शमी, बाभूळ व नेपती हे वृक्ष आहेत. शिवाय शिरीष, शिसवी, कडुनिंब, भोकर, उंबर हे पाटबंधाऱ्याच्या भागात वाढतात. अरवली पर्वत व आजुबाजूला धावडा, सालई, कांडोल, खटखटी, हिंगण, खैर, वर्तुळी, गुग्गुळ, जंगली बोर, निवडुंग यांची वने आहेत. या प्रदेशाच्या पश्चिमेला निवडुंगाचे मोठे समूह असून त्यांना ‘थर-वनश्री’ म्हणतात.

दख्खन विभाग : यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा पूर्व भाग, बिहारचा दक्षिण भाग, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिशा या राज्यांचे काही भाग येतात. याचा बहुतेक भाग मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला असून मध्य भारत व कर्नाटक येथील रुक्ष भागात काटेरी वने आहेत. यांत बाभूळ, हिवर, हिंगण, पळस, आवळी, जंगली बोर, सालई, कांडोळ इ. झाडे आढळतात. या झाडांबरोबर नाताळ व तत्सम गवते, कुसळी, रोशा इ. गवते आढळतात. मिश्र पानझडी वनांत साग, ऐन, हिरडा, बेहडा, धावडा, बिबळा, शिसू, काळा पळस, बाहवा, पळस, आवळी, तेंडू, मोह, लाल चंदन, चारोळी, बांबू इ. वृक्ष आढळतात.

म्हैसूर, कूर्ग, कोईमतूर, सालेम, निलगिरी येथील विरळ वनांत चंदन आढळते. रक्तचंदन मिश्र वनांच्या रुक्ष भागी असते व त्याबरोबर बिबळा, अंजन, शिसू, काळा शिरीष, हळदू, हिरडा आणि धावडा इ. वाढतात. कर्नाटकातील वनांत बकुळ, टेंबुर्णी, कुचला, मुचकुंद, हळदू, जांभूळ यांबरोबर अनेक झुडपांच्या दाट जाळ्या असतात. ओडिशा, छोटा नागपूर व संथाल परगणा यांतील टेकड्यांवरील प्रदेशात साल, ऐन, बिबळा, धावडा, टेंबुर्णी, मोह, चारोळी, जांभूळ, कुसुंब, पांढरा कुडा, पळस, आवळी इ. आढळतात.

मलबार विभाग : यामध्ये गुजरातचा दक्षिण भाग, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा पश्चिम भाग, केरळ, गोवा इ. प्रदेश येतात. यात मुख्यत: उत्तर कारवारपासून दक्षिणेकडे पसरलेल्या सदापर्णी वनांत फार उंच वृक्ष असतात. चालन, कल्होणी, नागरी, धूप, राळधूप, उगद, नागचाफा, बाधर, कडूकवठ, तामील, कोकम, सुरंगी, पुन्नाग इत्यादी. उत्तरेकडे मिश्र पानझडी वने असून त्यांत साग, शिसू, ऐन, किंजळ, बेहडा, नाणा, बोंडारा, बिबळा, जांभा, हेदू, कदंब, धामणी इ. झाडे आहेत. निलगिरी, अन्नामलई, पलनी व इतर टेकड्यांवर ‘शोला’ वनश्री असून पिवळा चाफा, कामोनी, बिल्ली, नागेट्टा, शूलपर्णा, तसेच थंड हवेतील काही वनस्पतीही आढळतात.

वनश्री : (१) पश्चिम हिमालय विभाग, (२) आसाम विभाग, (३) रुक्ष प्रदेश विभाग, (४) अंदमान व निकोबार बेटे.

अंदमान व निकोबार बेटे : भारताच्या अंदमान व निकोबार बेटांवरही बरीच वने आहेत. तेथे खाड्यांच्या तोंडाशी व मागे कोंडून राहिलेल्या खाऱ्या पाण्याच्या दलदलीत अनेक कच्छ वनस्पती आढळतात. उदा., कांदळ, गोरान, पुसूर, कांक्रा, गोरिया, चौरी, चिपी, इरापू इ. या समूहाच्या आतील बाजूस सुंद्री-चांद, काजळा, फीनिक्स पॅल्युडोजा व पोफळीची एक भिन्न जाती आढळते. शिवाय देशी बदाम, पांगारा, करंज, पारोसा पिंपळ व केवड्याच्या काही जाती किनाऱ्यालगतच्या वनांत दिसतात. त्यामागे असलेल्या वनांत होन्ने (अंदमान रेडवुड), शिरीष, कुंभा इ. असतात. टेकड्यांच्या उतरणीवरील वनांत होपिया ओडोरॅटा, प्लँचोनिया अंदमॅनिका, चालन, चपलाश, नागचाफा, टेंबुर्णी, उंडी इत्यादींसारख्या वनस्पती आढळतात. तसेच वेत, डिजोक्लोआ अंदमॅनिका, ॲनसिस्ट्रोक्लॅडस एक्स्टेंसस, चोपचिनीसारखी एक जाती (स्मायलॅक्स ॲस्परिकॉलिस) इ. वेली आढळतात.

कुलनिहाय संघटन : भारतातील वनश्रीत पोएसी हे सर्वांत मोठे कुल असून त्याच्या सु. १,००० जाती आहेत. टेकड्यांवर व सपाट प्रदेशांत कुरणे, तराईत रुक्षवने आणि ऊटकमंड व इतर डोंगराळ पठारांवर ‘दुआर’ व विस्तीर्ण तृणभूमी असे गवताळ वनश्रीचे प्रकार आहेत. बांबूची बेटे उष्ण व दमट भागांत सर्वत्र आढळतात. गवतांच्या खालोखाल भारतात फॅबेसी कुलातील सु. ८०० जाती आढळतात. या सर्व जाती देशभर विविध परिस्थितींत जसे रुक्ष ठिकाणी बहुधा झुडपे, तर दमट वनांत वेली व वृक्ष अधिक वाढतात. ॲस्टरेसी (सूर्यफूल) कुलातील सु. ८०० जाती भारतात असून त्या टेकडीवर किंवा रस्त्याच्या कडेने तणासारख्या वाढताना दिसतात (उदा., एकदांडी). रुबिएसी (कदंब) कुलातील सु. ५५० जाती भारतात असून त्यांतील बहुसंख्य दक्षिणेत आहेत. ऑर्किडेसी कुलातीलही साधारणपणे तितक्याच जाती भारतात आढळत असून त्यातील बहुसंख्य जाती पूर्व हिमालय, आसाम व मलबार या विभागात दिसतात; उन्हाळ्यात व पावसाळ्यात फुलणाऱ्या यांच्या फुलोऱ्यांमुळे वनांना एक वेगळीच शोभा येते. या खालोखाल ॲकँथेसी कुलातील सु. ५०० जाती विशेषत: द्वीपकल्पात सापडतात. या कुलातील वनस्पती निलगिरी व मलबारच्या डोंगराळ भागात समूहाने वाढतात. लॅमिएसी (तुलसी) कुलातील सु. ४०० भारतीय जाती बहुतेक टेकड्यांवर आढळतात. यूफोर्बिएसी कुलातील भिन्न स्वरूपाच्या सु. ४०० जाती भारतात असून त्यांतील काही रुक्ष व उष्ण भागात वाढणाऱ्या मांसल स्वरूपाच्या असतात, तर काहींचे लहान-मोठे समूह आढळतात. प्लँटॅजिनेसी (नीरब्राह्मी) कुलातील सु. ३०० औषधीय जाती टेकड्यांतच आढळतात. तसेच रोझेसी (गुलाब) कुलातील सु. २५० भारतीय जाती असून ती सर्व समशीतोष्ण भागात दिसतात.

हिमालयात पायनेसी (पाइन) कुलातील अनेक जाती असून सपाट प्रदेशात निंब, हिरडा, आंबा, रिठा, जांभूळ इ.च्या कुलातील अनेक वृक्षांचा अधिक भरणा आहे. पामेसी (पाम) कुलातील जाती भारतात फार कमी आहेत. ताडाचा प्रसार भारतात मोठा असून समुद्रकिनाऱ्यालगत नारळाची व सुपारीची झाडे लागवडीखाली आहेत. सुंदरबनात व कच्छ वनश्रीत फीनिक्स पॅल्युडोजा या पाम वृक्षाची बेटे आढळतात. भारतात घोळ (पोर्चुलॅकेसी), पानफुटी (क्रॅसुलेसी) इत्यादींच्या कुलातीलही वनस्पती आहेत. कॅक्टेसी कुलातील गफणा निवडुंग या एकाच विदेशी जातीचा प्रसार भारतातील रुक्ष प्रदेशांत झालेला दिसून येतो.

भारतात टेरिडोफायटा भरपूर असून नेचे व तत्सम इतर (उदा., सिलाजिनेलीझ, लायकोपोडिएलीझ, आयसॉएटेलीझ इ.) कुल-प्रजातीतील जाती सु. ५०० आहेत. पाम वृक्षासारखे दिसणारे वृक्षी नेचे मुख्यत: दोन प्रजातीतील (अल्सोफिला) असून त्यांचे नैसर्गिक वसतिस्थान पूर्व हिमालय, आसाम व पश्चिम घाटातील वने (अनमोड, कारवार इ.) हे आहे.

वनस्पती संवर्धन व संशोधन : वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच आर्थिक व औषधी दृष्ट्या उपयुक्त अशा वनस्पतींचा भारतीय वनस्पतितज्ज्ञ अभ्यास करीत आहेत. शेती, उद्योगधंदे व नागरी विकास यांसाठी वनांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असल्याने अनेक भारतीय वनस्पती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्मीळ वनस्पतींचे शास्त्रीय उद्यानांत व राष्ट्रीय उद्यानांत परिरक्षण करण्यात येत आहे. या वनस्पतींचे शुष्क नमुने कोलकाता येथील सेंट्रल नॅशनल हर्बेरियम, भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या प्रादेशिक वनस्पतिसंग्रहांमध्ये आणि इतर विविध संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये जतन केले जात आहेत.