पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात आपला सहभाग नोंदविला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर आफ्रिका यांतच लढाई सीमित होती. जपानने आशियात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात रणशिंग फुंकले आणि ब्रह्मदेश (म्यानमार) मार्गे भारतावर आक्रमण करण्याचा प्रयास केला. कांगावची लढाई ही त्याच प्रयत्नांपैकी एक होय.

बंगाल उपसागराच्या पूर्वतीरावर असलेले आराकान द्वीपकल्प हा जपानसाठी ब्रह्मदेशातील युद्धात रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश होता. दक्षिणेतील रंगून (यांगून) कडील रसदमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा ताबा आपल्याकडे ठेवणे जपानला अत्यावश्यक होते. कालापझिन आणि कालादान या दोन नद्यांच्या परिसरातील दोन द्वीपकल्पांतून दक्षिणेकडे मार्ग दोन जात. पहिला, बुथिडाँग, माँगडा, अकयाब आणि मेबॉन आणि दुसरा, म्याडकटा, म्योहांग मिनब्या. हे दोन्ही मार्ग कांगाव येथे मिळत. ब्रह्मदेशातील प्रसिद्ध चीन टेकड्यांचा हा प्रदेश.

१९४४ अखेरीस ब्रह्मदेशात जपानी फौजेच्या पराभवाची चिन्हे दिसू लागली होती. उत्तर ब्रह्मदेशातून त्यांची माघार सुरू झाली होती. समुद्रमार्गे दक्षिणेकडे जाण्याचे त्यांचे मार्ग ब्रिटिश आरमाराने गोठून टाकले होते. त्यामुळे ब्रह्मदेशातून निसटण्यासाठी जमीनमार्गे जाणे जपान्यांना भाग होते. या मार्गाची कोंडी करण्याचे काम २५ इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनला देण्यात आले होते. ५१ इंडियन इन्फन्ट्री ब्रिगेड या डिव्हिजनचा भाग होती. ब्रिटिश ३ कमांडो ब्रिगेड आणि ५१ इंडियन इन्फन्ट्री ब्रिगेड यांना मेबॉनवर सागरी मार्गाने चाल करून कांगावची मोर्चेबंदी उद्ध्वस्त करण्याचे आणि परिसरातील दक्षिण चीन टेकड्यांच्या महत्त्वाच्या डोंगरशिखरांवर ताबा प्रस्थापित करून मुख्य मार्गावर परिणामकारक प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे काम देण्यात आले होते.

ब्रह्मदेशातील आराकान द्वीपकल्पात दुसऱ्या महायुद्धाच्या सरत्या वर्षात दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी जपानी सैन्याचा पराभव केला. ब्रिटिश सैन्याच्या या यशात कांगाव लढाईचा लक्षणीय वाटा होता. त्यात लेफ्टनंट कर्नल एस.पी.पी. थोरात यांच्या नेतृत्वाखाली २/२ पंजाब बटालियनने निकाली घणाघात केला.

परस्परविरोधी सेनातुकड्या : ब्रिगेडियर हटन यांच्या नेतृत्वाखालील ५१ इंडियन ब्रिगेड ‘ऑल इंडियन ब्रिगेड’ या टोपणनावाने ओळखली जाई. त्यामधील ८/१९ हैदराबाद या पलटणीचे कमांडर लेफ्टनंट कर्नल थिमय्या, १६/१० बलूचचे कमांडर एल. पी. सेन आणि २/२ पंजाबचे कमांडर एस.पी.पी. थोरात यांचे नेतृत्व हा एक अपूर्व योगायोग होता. पुढे जाऊन थिमय्या भारतीय सेनेचे सरसेनापती, तर थोरात व सेन हे लेफ्टनंट जनरलच्या हुद्द्यावर पोचले. ५१ इंडियन ब्रिगेडचा सामना जपानच्या युद्धविजयी ५४ इन्फन्ट्री डिव्हिजनशी होता. त्याचे कमांडर मेजर जनरल मियाकाझी हे होते.

कांगावची मोर्चेबंदी : म्योहांगकडून दक्षिणेला जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर असलेले कांगाव डावपेचाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्या परिसरातील पर्थ, मेलरोज आणि डेन्स या उंचवट्यांवर जपानी सैन्याने ठाणी उभारली होती. त्यांत जपान्यांच्या दोन पायदळ पलटणी तैनात होत्या. त्यांच्यापाशी तोफखाना, मीडियम मशीनगन्स (एम.एम.जी.), चार इंची मॉर्टर वगैरे शस्त्रास्त्रे होती. मेलरोज हे ठाणे विशेषकरून परिणामकारक होते. शेवटपर्यंत मेलरोज आपल्या ताब्यात ठेवणे जपान्यांना आवश्यक होते.

वास्तविक या जपानी ठाण्यांवर काबू करण्यासाठी दोन ब्रिगेडची शिबंदी लागणार होती. परंतु जपानी सैन्य माघारीच्या मार्गावर असल्याने आणि ब्रिटिश सैन्याकडे संसाधनांची चणचण असल्याने ही कारवाई एकट्या ५१ ब्रिगेडवर सोपविण्यात आली होती. त्यांना मदत करण्यासाठी तोफखान्याची एक रेजिमेंट त्यांच्याबरोबर होती. ब्रिगेडियर हटन यांना लवकरात लवकर आपले काम पुरे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

२७ जानेवारी १९४५ रोजी सकाळी चढाईस सुरुवात झाली. जपानी ‘डेन्स’ या ठाण्यावर हैदराबादींनी हल्ला केला. त्यांनी ठाण्याचा थोडाच भाग काबीज केला होता. परंतु जपान्यांनी जबरदस्त प्रतिहल्ला चढवून त्यांना मागे परतविले. दुसऱ्या दिवशी ब्रिगेडियर हटन यांनी बलुचींना मेलरोजवर हल्ला चढविण्याचे आदेश दिले. बलुचींनी सरळ दर्शनी बाजूने चढाई केली. परंतु आदल्या दिवशीची पुनरावृत्ती झाली. नशीब एवढेच की, टेकडीच्या एका कोपऱ्यावर बलुची तटून राहू शकले. एकामागून एक असे दोन हल्ले परतल्यामुळे इंडियन ब्रिगेडवर काहीशा निराशेचे सावट जरूर आले. मग हटन यांनी थोरातांना बोलाविले आणि दुसऱ्या दिवशी मेलरोजवर परत हल्ला चढविण्याचा आदेश दिला.

कांगाववरील चढाईची योजना :  मेलरोजवरील हल्ल्याची थोरातांची योजना डावपेची पण जोखीमपूर्ण होती. जपानी ठाण्यावर समोरून हल्ला चढविण्याऐवजी त्यांच्या बाजूने म्हणजे एका बगलेवरून (फ्लँक) ते प्रहार करणार होते. त्याचा फायदा म्हणजे त्यांच्यावर जपान्यांचा गोळीबार फक्त एका बाजूच्या तुकडीकडून होऊ शकणार होता. त्याचबरोबर इतर दोन बटालियन्स त्यांना शत्रूवर समोरच्या बाजूने तोफमारा करू शकणार होत्या. परंतु जपानी ठाण्याच्या बगलेपर्यंत पोचण्यासाठी त्यांना शत्रूसमोरून वळसा घालून जाणे आवश्यक होते आणि त्या वेळी उघड्या भातशेतीतून ओलांडून जाताना जपान्यांच्या मशीनगन्सचा मारा त्यांना सहन करावा लागणार होता.

थोरातांच्या योजनेनुसार सुरुवातीला तीन कंपन्यांनी ठाण्याला वळसा घालून उजव्या बाजूला आपल्या ‘फॉर्मिंग अप प्लेस’ (एफ. यू. पी.) पर्यंत जलदपणे जायचे होते. दरम्यान तोफखाना शत्रूच्या आघाडीच्या मोर्च्यांवर आणि विशेषत: मशीनगन्सना लक्ष्य करून त्यांच्यावर तुफान गोळीबारी करणार होता, जेणेकरून ते आपल्या खंदकातच बंदिस्त राहतील. त्याचबरोबर ‘स्मोक बाँब’ वापरून मोर्चे आणि आगेकूच करणाऱ्या पंजाब्यांमध्ये एक धुराचा पडदा उभा करण्याची जबाबदारी तोफखान्यांवर होती. हल्ला सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे शत्रूच्या खंदकांवर बाँबफेक करण्यास वायुदलाला आदेश देण्यात आले होते. आघाडीचे दस्ते दोनशे यार्डाच्या टप्प्यात पोचेपर्यंत ही बाँबफेक चालू राहणार होती आणि नंतर मारा पिछाडीच्या मोर्चांवर केंद्रित होणार होता. हल्ला दोन कंपन्या चढविणार होत्या. त्यांच्या पाठीमागे एक कंपनी आणि चौथी राखीव राहणार होती.

तुफानी हल्ला : २९ तारखेला उजाडताच आघाडीच्या तीन कंपन्यांनी आगेकूच केले. शत्रूची ठाणी ओलांडताना थोरातांनी तोफखान्याला गोळाफेक आणि धुराचा पडदा सुरू करायचे हुकूम सोडले. मशीन गन्सच्या माऱ्याला न जुमानता जलद गतीने जवानांनी भातशेतीचे मैदान पार केले. त्याचबरोबर जपान्यांचा तोफखानाही आग ओकू लागला. घायाळ आणि मृतांची संख्या वाढत होती. थोड्याच वेळात पंजाबी एफयूपीमध्ये पोचले आणि वेळेवर हल्लाबोल झाला.

आता टेकडीवरील चढ चालू झाला. एका बाजूने हल्ला करत असल्याने शत्रूच्या एकामागून एक फळींचे मोर्चे समोर येत होते. गोळीबार वाढत चालला होता आणि त्या खंबीर विरोधापुढे आघाडीच्या फळीचा हल्ला काहीसा मंदावत चालला होता. सावधगिरीचे जू त्यांनी मनावरून फेकून दिले आणि ते तडक अडखळणाऱ्या आघाडीच्या दस्त्यांपर्यंत पोचले. त्यांना पाहताच त्या आघाडीच्या जवानांमध्ये एक नवा जोम उसळला. ‘सत् श्री अकाल’ शीख गर्जले, ‘साब आये’. मुस्लिम कंपनीने नारा दिला- ‘मारो हैदरी या अली.’ भान विसरून सारे शत्रूवर तुटून पडले. खंदकात उड्या मारून ओरडत, किंचाळत, शिव्यांची लाखोली वाहत कापाकापी आणि संगिनींची भोसकाभोसकी चालू झाली. जपानी चवताळलेल्या वाघासारखे लढत होते. दोन रणशूरांतील ते द्वंद्व होते. एका उदात्त कर्मयोगाचा साक्षात्कारच! सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.  एकाएकी थोरातांना एक तरणाबांड मिसरूड न फुटलेला तरुण जपानी अधिकारी आपली तलवार परजीत खंदकातून बाहेर येताना दिसला. धारदार पात्याने त्याने एकाचे खांडोळे केले. दुसऱ्यावर झडप घातली. थोरात त्याचे असामान्य धैर्य पाहून क्षणभर स्तिमित झाले. थोरातांनी आपल्या स्टेनगनमधून गोळी झाडली. ती वर्मी लागली आणि तो जागीच कोसळला.

तेवढ्यात डोक्यावर फायटर विमाने दिसू लागली. प्रतिकूल हवामानामुळे त्यांना विलंब झाला होता. पंजाबी शत्रूच्या निकट असल्याने त्यांनी पिछाडीच्या शत्रुठाण्यावर बाँबवर्षाव सुरू केला. मेलरोज टेकडीवरील अर्ध्या मोर्च्यावर पंजाब्यांनी ताबा केला. त्यानंतर थोरातांच्या मोर्चावर प्रतिहल्ले आले आणि ते खंबीरपणे परतविले गेले. अखेरीस मेलरोजचा ताबा २/२ पंजाबला मिळालाच; पण दोनच दिवसांत ५१ इंडियन ब्रिगेडने जपान्यांच्या १५४ इन्फन्ट्री रेजिमेंटला माघार घ्यायला लावली.

थोरातांना त्यांच्या बुलंद, कल्पक व सुबुद्ध नेतृत्वासाठी आणि वैयक्तिक शौर्यासाठी ‘डिस्टिंग्वीश्ड सर्व्हिस ऑर्डर (डीएसओ) हा उच्च वीरसन्मान प्रदान करण्यात आला.

संदर्भ :

  • Moreman, Tim, British Commandos 1940—46, Oxford, 2006.
  • Thorat, S. P. P. From Reveille to Retreat, Mumbai, 1986.
  • पित्रे, शशिकांत, झुंझार सेनानी : लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात, कोल्हापूर,

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा