टर्मन, फ्रेडरिक एमन्स : (७ जून १९००–१९ डिसेंबर १९८२). अमेरिकन अभियंते व शिक्षणतज्ज्ञ. इलेक्ट्रॉनिकी व शिक्षण क्षेत्र यांमध्ये बजाविलेल्या कामगिरीबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म इंग्लिश (इंडियाना राज्य) येथे आणि शिक्षण स्टॅनफर्ड विद्यापीठ व मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम. आय. टी) येथे झाले. एम. आय. टी. मधून त्यांनी १९२४ मध्ये अभियांत्रिकी विषयात पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९२५ साली स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अध्यापकवर्गात त्यांचा समावेश झाला. १९२५–४१ या काळात तेथे त्यांनी इलेक्ट्रॉनिकीमधील संशोधन व शिक्षण कार्य यांसंबधी मोठा कार्यक्रम आखला. त्यातून बऱ्याच नवीन कल्पना, उत्तम ग्रंथ व प्रशिक्षित माणसे निर्माण झाली.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरून त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात रेडिओ रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. शत्रूचे रडार अकार्यक्षम करण्याविषयी येथे संशोधन होऊन शत्रूच्या रडारांना घोटाळ्यात टाकणारे यंत्र (जामर), तसेच रडार संकेतांचे अभिज्ञान व विश्लेषण यांसाठी मेलनक्षम ग्राही (प्रेषित संकेताच्या कंप्रतेशी म्हणजे दर सेकंदास होणाऱ्या कंपन संख्येशी जुळवणी करून संकेत ग्रहण करणारे साधन) ही उपकरणे तयार केली. या उपकरणांचा महायुद्धात मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. १९५५ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्रमुख (प्रव्होस्ट) म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि १९६५ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. विद्यापीठात अभियांत्रिकीय संशोधन मोठ्या प्रमाणावर करण्यात यावे व त्याचा उपयोग आसपासच्या प्रदेशाच्या औद्योगिक विकासासाठी करण्यात यावा या विचाराचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. यामुळे स्टॅनफर्ड विद्यापीठ हे अभियांत्रिकी संशोधनाचे एक प्रमुख केंद्र बनले आणि त्याचा आसपासच्या प्रदेशातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा झाला.

दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतर त्यांनी अनेक सरकारी सल्लागार समित्यांवर काम केले. १९४६ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी रेडिओ एंजिनियर्स हँडबुक (१९४३), इलेक्ट्रॉनिक अँड रेडिओ एंजिनियरिंग (चौथी आवृत्ती, १९५५) आणि (जे. एम्. पेटिट यांच्या सहकार्याने लिहिलेला) इलेक्ट्रॉनिक मेझरमेंट्स (दुसरी आवृत्ती, १९५२) हे प्रसिद्ध आहेत.

पॅलो ॲल्तो (कॅलिफोर्निया) येथे त्यांचे निधन झाले.