भारत-पाकिस्तान १९७१ च्या युद्धातील एक लढाई.

पार्श्वभूमी : नोव्हेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान हातातून जाणार याची जाणीव झाल्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवरील जास्तीत जास्त प्रदेश काबीज करून युद्धसमाप्तीनंतर होणाऱ्या वाटाघाटीदरम्यान आपले पारडे जड ठेवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे लष्करशहा याह्याखानांनी ३ डिसेंबरला त्यांच्या वायुसेनेला भारताच्या विमानतळांवर हल्ल्याचे आदेश दिले आणि युद्धाची घोषणा केली. लगोलग सिंध-राजस्थान-विभागातील जैसलमेर भागात मुसंडी मारण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याने हल्ला चढवला. त्या रात्री सीमेवरील लोंगेवाला ठाण्यावर घडलेली तुंबळ लढाई पश्चिम सीमेवरील युद्धातील पहिली चकमक होती.

वाळवंटातील लढाईची वैशिष्ट्ये : थर वाळवंट म्हणजे एक ओसाड आणि वैराण वालुकामय प्रदेश. सर्वत्र तांबूस वाळूचे उंच डोंगर. सीमाप्रदेशात मोजके रस्ते. वाळूच्या उंचवट्यांच्या बेचक्यांमधून जाणाऱ्या पायवाटांवर तुरळक वस्ती. या प्रदेशात शत्रू कोणत्याही दिशेने आक्रमण करू शकतो. पण तरीही संपर्ककेंद्रे व अत्यंत विरळ पाण्याच्या स्रोतांचा ताबा घेणे आणि रसदमार्ग उघडणे, ही आक्रमण करणाऱ्या तुकडीची मुख्य उद्दिष्टे असतात. त्याची चढाई कोणकोणत्या मार्गांनी होऊ शकेल, याचे सखोल अभ्यासानंतर लष्करी अनुमान बांधले जाते आणि त्या मार्गावर त्याच्या वाटचालीत अडथळे उभारण्यासाठी लष्करी ठाणी उभारली जातात. वाळवंटासारख्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये संरक्षणफळी उभारताना साहजिकच या ठाण्यांमध्ये खूप अंतर पडते. एखाद्या ठाण्यावर हल्ला झाला, तर मागून कुमक पोहचण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. त्यामुळे शत्रूची संख्या मोठ्या प्रमाणात असली तर ‘शेवटचा जवान, शेवटची गोळी’ संपेतोपर्यंत ते ठाणे लढवायचे किंवा पद्धतशीर माघार घेऊन पिछाडीला जाऊन दुसरा किल्ला लढवायचा, हे दोनच पर्याय संरक्षकाला उपलब्ध असतात.

दुसऱ्या बाजूला आक्रमक तुकडीचे कामही तितकेच दुरापास्त असते. वाळवंटात कायम आडवाटेनेच (Cross Country) प्रवास करावा लागत असल्याने गाड्या आणि रणगाडे अत्यंत संथगतीने चालतात. क्षणाक्षणागणीक त्या वाळूत रुततात. दूर अंतरावर पायी रपेट करणे अशक्य असते. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आणि जीवघेण्या उकाड्यामुळे कमालीची दमछाक होते आणि सैनिकांच्या लढण्याच्या क्षमतेवर गदा येते. कोणतेही रस्ते किंवा जमिनी निशाणांची वानवा असल्यामुळे दिशादर्शन अत्यंत कठीण होऊन जाते. दोन्ही बाजूंच्या व्यवधानांच्या लांबलचक यादीमधील या प्रमुख अडचणी.

भारतीय लष्कराची संरक्षणफळी : राजस्थान सीमेवरील जैसलमेर विभागात शत्रूचे आक्रमण थोपवून त्याला सीमापार हटवण्याच्या उद्दिष्टाने संरक्षणफळी उभारण्याची जबाबदारी १२ पायदळ विभागाची होती. तिच्या हाताखाली रामगढ उपविभागात ब्रिगेडियर रामडॉस यांची ३० पायदळ ब्रिगेड तैनात होती. सीमेवरून लोंगेवालामार्गे येणाऱ्या शत्रूच्या संभाव्य हल्ल्याविरुद्ध मोर्चेबंदी करण्याचे आदेश लेफ्टनंट कर्नल मोहम्मद खुर्शीद हुसेन यांच्या २३ पंजाब बटालियनला देण्यात आले होते. हुसेन यांनी आपल्या बटालियनच्या चार कंपन्यांपैकी सर्वांत आघाडीचे ठाणे उभारण्याचे काम अल्फा कंपनीचे कमांडर मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांना दिले होते. बटालियनचे मुख्यालय साधेवाला येथे होते.

लोंगेवालावरील मोर्चेबंदीसाठी परिसरातील सर्वात उंच डोंगराची चांदपुरी यांनी निवड केली होती. सभोवतालच्या टापूवर या टिब्ब्याचे (वाळवंटी टेकडी) प्रभुत्व असल्याने दूरवरच्या प्रदेशातील कोणतीही हालचाल चारी बाजूंनी दिसत असे. त्याचबरोबर चाल करून येणाऱ्या सैन्यावर तिथून शस्त्रांचा परिणामकारक मारा करणे सुकर होते. जवळच अगदी मोजक्या लोकांची वस्ती असलेले लोंगेवाला हे गाव होते. या वस्तीवरूनच हे नाव ठाण्याला देण्यात आले होते. ठाणे डावपेचाच्या दृष्टीने सरस आणि नामी होते. खंबीरपणे लढवले, तर त्याचा ताबा घेणे शत्रूला दुरापास्त होणार होते. २३ पंजाबच्या अल्फा कंपनीच्या १२० जवानांनी तिथे मोर्चेबंदी केली होती. शत्रूवर उपलब्ध शस्त्रांचा मारा करण्यासाठी पद्धतशीर खंदक खणून मोर्चे बांधण्यात आले होते. कंपनीला बटालियनकडून दोन एम.एम.जी.चा (मीडियम मशीन गन) एक सेक्शन आणि एल ६१ बनावटीच्या  मॉर्टरचा (उखळी तोफांचा) एक सेक्शन (तीन मॉर्टर्स ) देण्यात आले होते. त्याचबरोबर जीपवर लावलेली एकच रणगाडाविरोधी आरसीएल (रिकॉइललेस गन) कंपनीला देण्यात आली होती. त्या एकाच तोफेवर भागवावे लागणार होते. अल्फा कंपनीबरोबर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफच्या) दहा उंटांची एक तुकडी होती. तिच्याबरोबर चार वाहक होते. आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करण्यासाठी या ‘वाळवंटातील जहाजां’चे अमूल्य योगदान मिळत असे. ठाण्याच्या चारी बाजूंनी तीन तारांचे एक काटेरी कुंपण उभारण्यात आले होते. ऐनवेळी काही रणगाडाविरोधी सुरुंग पेरण्याची समयसूचकता त्यांनी दाखवली होती.

चांदपुरींच्या ठाण्याला तोफखान्याचे साहाय्य देण्यासाठी १५० फील्ड रेजिमेंटच्या (वीर राजपूत) एका बॅटरीच्या सहा तोफांचे पाठबळ त्यांना प्रथमपासून उपलब्ध होते. परंतु सुदैवाने एक दिवस आधीच १६८ फील्ड रेजिमेंटचा (अठरा तोफा) तोफमारा उपलब्ध करून देण्यात आला होता. याचा चांदपुरींना प्रचंड फायदा झाला. चांदपुरींनी ३ डिसेंबरला शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी २० जवानांचे एक पथक लेफ्टनंट धरमवीर या अधिकाऱ्याच्या हाताखाली सीमेवरील बॉर्डर पिलर ६३८ च्या निकट दडून राहण्यासाठी पाठवले होते.

जैसलमेर विमानतळावर निष्णात वैमानिक विंग कमांडर एम.एस. बावा यांच्या नेतृत्वाखाली चार हॉकर हंटर विमाने तैनात होती. साऱ्या परिसराचा त्यांना घनिष्ठ परिचय होता. त्यांच्या मदतीसाठी मेजर आत्मासिंग या स्थलसेनेच्या वैमानिकाचे ‘क्रिशक’ हेलिकॉप्टर धाडण्यात आले होते. लढाऊ विमानांना शत्रूच्या तुकड्यांबद्दल रेडिओद्वारे मार्गदर्शन करणे (Forward Air Controller–F.A.C.) हे त्यांचे काम होते. या सर्वांमुळे ठाणे सर्वसंपन्न आणि बळकट झाले होते.

लढाईची धुमश्चक्री : ४ डिसेंबरचा दिवस ढळत असताना सीमेजवळील लेफ्टनंट धरमवीर यांच्या पथकाच्या कानी गोंधळ आणि विविध आवाज पडू लागले. त्यांना रणगाड्यांचा मोठा जथा येताना दिसला. हेलिकॅाप्टरमधून टेहळणी करणाऱ्या आत्मासिंग यांनी त्याच वेळी २० किमी. लांबीचा एकापाठोपाठ एक येणाऱ्या रणगाड्यांचा दस्ता पाहिला. दोघांनीही रेडिओ सेटद्वारे चांदपुरींना याबद्दल बातमी दिली. पाकिस्तानच्या १८ पायदळ विभागाच्या दोन्ही पायदळ ब्रिगेड आणि दोन रणगाडा रेजिमेंटच्या त्या तुकड्या होत्या.

लोंगेवालाची चौकी सहजासहजी काबीज करून ५ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत जैसलमेरवर धडक मारण्याचा त्यांचा इरादा होता. केवळ एक कंपनी या प्रचंड बळासमोर टिकणे अवघड होते.

रात्री साडेबाराला हल्ला चालू झाला. पाकिस्तानच्या तोफखान्याचे गोळे लागून दहा उंटांपैकी पाच उंट जागीच गारद झाले. चांदपुरींनी तातडीने काही रणगाडाविरोधी भूसुरुंग पेरण्याचे आदेश दिले. त्यामुळे रणगाड्यांना थोडाफार तरी अडथळा होणार होता. चांदपुरींनी शत्रू १५ ते ३० मी.च्या टप्प्यात येईपावेतो गोळीबार न करण्याचे सक्त आदेश दिले होते. सर्वांत प्रथम गर्जली ती एकमेव आरसीएल तोफ. तिने एकामागून एक अशा दोन रणगाड्यांना उडवले. प्रत्येक पाकिस्तानी रणगाड्यावर राखीव इंधन लादलेले होते. त्याचा प्रचंड भडका होऊन काही वेळ रणांगण उजळून गेले. आरसीएल तुकडीतील एका जवानाला गोळी लागली. पण तरीही उरलेले जवान शत्रूच्या रणगाड्यांना लक्ष्य करत राहिले. या एकट्या आरसीएल तोफेने सकाळपर्यंत १२ रणगाड्यांचा कपाळमोक्ष केला. ही अचाट कामगिरी होती.

प्रचंड संख्येच्या शत्रूने चांदपुरींच्या ठाण्याला वेढा घातला होता. तरीही चांदण्या रात्री ठाण्यातील खंदकांमधून अचूक गोळीबार होत राहिला. काटेरी कुंपणापर्यंत पोहचायलासुद्धा शत्रूला दुष्कर झाले. तिथे पोहचल्यावर भूसुरुंगांचा सुगावा लावण्यासाठी पाकिस्तानी कमांडरने सॅपर्सना पाठविले. दोन तासांच्या नाहक शोधाशोधीनंतर त्यांना कळले की, व्यक्तीविरोधी भूसुरुंग पेरलेलेच नव्हते. तोपर्यंत पहाट झाली. रात्रभर प्रयत्न करूनही शत्रू अपयशी ठरला होता. आता उजेडात ते काम आणखीनच कठीण होते. अचानक चार हंटर विमाने लोंगेवालावर घिरट्या घालू लागली. टी १० रॉकेट आणि कॅननचा अचूक भडिमार ती विमाने पाकिस्तानी रणगाडे आणि वाहनांवर करू लागली. २३ रणगाडे आणि पाचशेहून अधिक गाड्यांचा त्यांनी काही वेळात कपाळमोक्ष केला. मग मात्र शत्रूचे डिव्हिजनल कमांडर मेजर जनरल मुस्तफा यांनी माघारीचे आदेश दिले आणि सगळा लवाजमा उलट तोंड फिरवून पाकिस्तानकडे माघार घेऊ लागला. हे पुरे नव्हते म्हणून की काय, त्याच वेळी भारतीय शेरमन रणगाड्यांचे पथकसुद्धा रणांगणावर पोहचले आणि त्यांनी पाठ फिरवलेल्या शत्रूची अवस्था आणखीनच बिकट केली.

या लढाईत भारतीय सैन्याचे दोन सैनिक शहीद झाले; तर पाकिस्तानी लष्कराने ३६ रणगाडे, ५०० वाहने आणि २०० सैनिक गमावले. मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांना ‘महावीरचक्रा’ने गौरवण्यात आले. लोंगेवालाची लढाई संरक्षणात्मक लढाईतील कौशल्याचा उच्चांक म्हणून गणली जाते. जर पाय रोवून लढलात, तर कितीही बलवत्तर शत्रूचा पराभव करू शकता, याचे हे एक देदीप्यमान उदाहरण आहे.

संदर्भ :

  •  Krishna Rao, K. V. Prepare or Perish : A Study of National Security, New Delhi, 1991.
  • Sheorey, Anil, Pakistans Feld Gamble : Battle of Longewala, New Delhi, 2004.
  • पित्रे, शशिकांत, ‘लोन्गेवालाचा रणयज्ञ’ (लोकमतमधील लेखमाला), २५ ऑगस्ट/१ सप्टेंबर २०१३.

प्रतिक्रिया व्यक्त करा