रानडे, रामचंद्र  दत्तात्रेय : (३ जुलै १८८६—६ जून १९५७). भारतीय तत्त्वज्ञ व संत. काही तत्त्वज्ञांचा दृष्टीकोन विश्वकेंद्रित असतो, तर काहींचा मानवकेंद्रित असतो. गुरूदेव रानडे यांचा ईश्वरकेंद्रित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानात जगाचा व मानवाचा विचार मात्र ईश्वरासंदर्भात येतो. परमेश्वर दिसतो का, तो कसा असतो, त्याची शक्ती आपल्याला कशी मिळेल, आपले त्याच्याशी नेमके कोणते नाते असते, असे प्रश्न केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या तत्त्वज्ञानात किंबहुना ह्या प्रश्नांचा त्यांनी वेध घेतला व त्यांना मिळालेल्या उत्तरांमधून त्यांचे तत्त्वज्ञान साकारले. ही उत्तरे मिळविण्यासाठी परमार्थाकडे वळले पाहिजे. नैतिकतेचा पाया अध्यात्माचा, परमार्थाचा असतो. साक्षात्कार गूढ नसून बुद्धिगम्य असतो. त्याचे व्याकरण उलगडून दाखवता येते, हा गुरूदेव रानडे यांच्या विवेकी साक्षात्कारवादाचा (Rational Mysticism) कणा आहे.

गुरूदेवांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी ह्या गावी दत्तात्रेय व पार्वतीबाई या दांपत्यापोटी झाला. १९०२ साली महाविद्यालयीन जीवनात अनेक मॅट्रिक्युलेशनसाठीच परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पहिली शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली. त्यांना प्रापंचिक आपत्तींना व दुर्धर आजारांना सामोरे जावे लागले. परंतु ईश्वरभक्तीमुळे पुढील वाटचाल शक्य झाली. परमार्थाची गोडी लागल्याने भौतिक किंवा ऐहिक सुखातील सावरारस्य संपले. मानवी जीवनातील सान्तता (बैलु) जाणवली व अनंताशी (निबैलु) नाते जोडले गेले. इंचगिरीचे गुरू निंबार्गी महाराज व भाऊसाहेब महाराज आणि अंबुराव महाराज यांच्या कृपेमुळेच हे शक्य होते. हा विश्वास उत्तरोत्तर दृढ होत गेला व प्राप्त परिस्थतीला धैर्याने तोंड देणे त्यांना शक्य झाले.

परीक्षार्थीला परीक्षकापेक्षा अधिक माहिती आहे असा शेरा घेऊन ते एम.ए. (तत्त्वज्ञान)ची परीक्षा उत्तीर्ण झाले. फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे ख्यातनाम प्राध्यापक गंगनाथ झा ह्यांच्या निमंत्रणानुसार ते अलाहाबाद विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात रूजू झाले. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना सुरुवातीला अध्यापक कालांतराने अधिष्ठाता व कुलगुरू अशी पदे त्यांनी भूषविली. प्रपंच-परमार्थ या दोहोंची त्यांनी सांगड घातली. गंगनाथ झा ह्यांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ते ‘‘लौकिक व पारलौकिक अशा दोन जगांत वावरत. एक जग भौतिक व दुसरे पारमार्थिक. म्हणूनच त्यांना ह्याच भौतिक जगात दिव्यानुभूती शक्य झाली.”

‘द इव्हॅल्यूशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’चा अपवाद वगळता आपले तत्त्वज्ञान कोठेही न मांडता विविध प्रदेशांतील, संस्कृतींतील संतांचे साक्षात्कार अभ्यासले आणि त्यांतील साम्यस्थळे अधोरेखित केली. गूढानुभूतींमागील गूढ वलय काढून त्यांमधील एकवाक्यता, समानता शोधली. ग्रीक व लॅटिन भाषांच्या व्यासंगामुळे व कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील वास्तव्यांमुळे, मराठी, कानडी, हिंदी साहित्यांच्या परिशीलनामुळे, त्यांच्या चिंतनाचा परीघ विस्तारला.

सर्व प्रांतातील संतांना ‘बिंदुले’ किंवा ‘स्पिरिटॉन्स’ प्रत्यक्ष दिसतात; वर्णदर्शी, तेजोमय रूप दिसते; अनाहत नाद ऐकू येतो; सुगंधाचा अनुभव येतो. सातत्याने येणार्‍या रोकड्या अनुभवामुळे साक्षात्कारास प्रामाण्य लाभते व अनुभवाच्या सार्वत्रिकतेमुळे वस्तुनिष्ठता लाभते. साक्षात्काराने जीवन अंतर्बाह्य उजळते. निखळ आनंद अनुभवता येतो. हा आनंदाचा ठेवा हेच परमानिधान अशा अनुभवांना गुरूदेव ‘बिटिफिक’ म्हणतात. त्यामुळे साधकाला संतुलित अवस्था प्राप्त होते. बौद्धिक, भावनिक व नैतिक विकास सहजपणे घडून येतो आणि विश्वबंधुत्वाची भावना उदित होते. ह्या उन्नत, उदात्त, सर्वोत्तम स्थितीसाठी प्रचंड आर्तता, व्याकुळता, तळमळ सहन करावी लागते; तिचे वर्णन ‘डार्क नाइट ऑफ द सोल’ असे केले जाते. ती अग्निपरीक्षा पार पाडल्याखेरीज दिक्कालातील अनंताचा (निर्बैलु) अनुभव घेता येत नाही. हा अनुभव शब्दातीत असतो. शब्दांना मर्यादा असते आणि अनुभव अमर्यादित (कबीरांच्या भाषेत ‘बेहद’) असतो. म्हणून शांतपणे, निशब्दपणे ईश्वराशी असलेल्या ह्या नात्याचा आनंदानुभव घेणे म्हणजे गूढवाद (Mysticism) होय. ज्याप्रमाणे प्राण्यांना माणसांचे आनंद कळणार नाहीत, ज्याप्रमाणे सामान्य जनांना विद्वानांचे आनंद कळणार नाहीत, त्याचप्रमाणे इतरेजनांना ही परमानंदाची गोडी अनूभवल्याखेरीज कळणार नाही. ‘‘समाधानी सॉक्रेटिसपेक्षा असमाधानी साधक बरा’’, असे या संदर्भात गुरूदेवांनी म्हटले आहे.

साक्षात्कारप्रक्रियेच्या चार पायर्‍या गुरूदेव देतात :

 • परमार्थाप्रवृत्तीची कारणे
 • नैतिकसिद्धता
 • देवभक्तांचे नाते
 • साधनमार्ग–साक्षात्काराचे एकमेव साधन–(नामस्मरण) सद्गगुरूकृपेने मिळालेल्या नामाचे स्मरण भगवद्गीताही साक्षात्कारवादाचा संदेश देते. साक्षात्कार-सोपान सुचविते व भगवद्प्राप्तीचा मार्ग घालून देते. भगवद्गीतेचा भक्तिपर अन्वयार्थ गुरूदेवांनी स्पष्ट केला आहे. ‘ईश्वर सगुण की निर्गुण’, ‘ईश्वर कर्ता की द्रष्टा’, ‘सर्वातीत की सर्वव्यापी’, ‘जग सत्य की असत्य’, ‘विदेहमुक्ती की क्रममुक्ती’ ह्या पाच विरोधाभासांचा विलय कसा होतो, हेही गीतेतील वचनांच्या आधारे स्पष्ट केले आहे. ह्या पाच द्वंद्वांचा उल्लेख त्यांनी, कांटप्रमाणे, ‘ॲन्टिनॉमी’ असा केला आहे. एरवी जटिल, गुह्य व वर्ज्य मानल्या जाणार्‍या साधनामार्गाचा गुरूदेवांनी सविस्तर उलगडा केला, म्हणून चरित्रकार शं. गो. तुळपुळे यांनी त्यांचा गौरव ‘परमार्थाचे पाणिनी’ अशा शब्दांत केला.

गुरूदेवांच्या विवेकी साक्षात्कारवादाची पाच प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कोणताही भेदभाव मनात न ठेवता, साधनासोपान सर्वांसाठी खुला करणे होय. दुसरे म्हणजे, साधना हेच जीवनातील परमसाध्य आहे व ती टप्प्याटप्प्यानेच साक्षात्कारापर्यंत पोहोचवते (A–Symptotic Approximation to the Truth) असे म्हणणे होय. तिसरे म्हणजे, ह्या ध्येयप्राप्तीने समाजापुढे ‘आदर्श’ राहतो व तो इतरांना प्रेरित करतो. म्हणून वरकरणी हे ध्येय स्वार्थी वाटले, तरी अंतिमत: सर्वांच्या हिताचे असते. चौथे म्हणजे, त्यांनी मांडलेला पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा तौलनिक विचार होय आणि पाचवे म्हणजे, विविध परंपरांचा त्यांनी गूढानुभूतींच्या आधारे केलेला समन्वय होय.

रानडेंनी विपुल लेखन केले. ते बहुतांश इंग्रजीत आहे. त्यांच्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ असे : अ कंस्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी (१९२६), हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफी (१९२७), मिस्टिसिझम इन महाराष्ट्र (१९३३), पाथ वे टू गॉड इन हिंदी लिटरेचर (१९५४), द कन्सेप्शन ऑफ स्पिरिच्यूअल लाइफ इन महात्मा गांधी अँड हिंदी सेंट्स (१९५६), फिलॉसॉफिकल अँड अदर एसेज (१९५६), द भगवद्गीता ॲज अ फिलॉसॉफी अँड गॉड रिअलायझेशन (१९५९), पाथवे टू गॉड इन कन्नड लिटरेचर (१९६०), एसेज अँड रिफ्लेक्शन्स (१९६४), वेदान्त : द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट (१९७०) इत्यादी. शेवटचे तीन ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. यांशिवाय त्यांनी मराठीतही काही ग्रंथरचना केली आहे, ती अशी :ज्ञानेश्वरवचनामृत (१९२६), संतरचनामृत (१९२६), तुकारामवचानमृत (१९२६), रामदासवचानमृत (१९२६), परमार्थ-सोपान (१९५४), एकनाथवचनामृत (१९५५) इत्यादी. इंडियन फिलॉसॉफिकल रिव्ह्यू हे त्रैमासिक सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

निंबाळ येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे निंबाळचे समाधिस्थळ अध्यात्म विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन (बेळगाव) ही संस्था त्यांचे आध्यात्मिक विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

संदर्भ :

 • Deshpande, M. S. Dr. Ranades Life of Light, Mumbai, 1963.
 • Kelkar, V. C. Autography : Gurudev R. D. Ranade : A Discovery, Pune, 1980.
 • Kulkarni, Padma, Gurudev Ranade : As a Mystic, Nimbal, 1986.
 • Sharma, S. R. Ranade : A Modern Mystic, Pune, 1961.
 • कुलकर्णी, न. वि. चरित्रवेल : गुरूदेव रा. द. रानडे, पुणे, 2012.
 • कुलकर्णी, श्री. द. गुरू हा परब्रह्म केव, मुंबई, २०१८.
 • तुळपुळे, ग. वि. गुरूदेव रानडे : साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान, १९६२.
 • तुळपुळे, शं. गो. गुरूदेव रा. द. रानडे : चरित्र आणि तत्त्वज्ञान, १९५८.
 • www.gurudevranade.com
 • www.gurudevranade.org
 • www.acprbgm.org

                                                                                                                                                                        समीक्षक – शुभदा जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा