प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ती जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात. बहुतेक प्रतिजैविके मृदेमधील जीवाणू किंवा कवक यांपासून निर्माण होतात. मृदेतील जीवाणूंची अनिर्बंध होणारी वाढ प्रतिजैविकांमुळे नियंत्रित होत असते. जी प्रतिजैविके शरीरातील पेशींना अपाय न करता रोगकारक जीवाणूंचा नाश करतात अशा प्रतिजैविकांचा वापर औषधे म्हणून करतात. याखेरीज कवक आणि आदिजीव यांच्या संक्रामणामुळे होणाऱ्‍या रोगांवर, तसेच काही कर्करोगांवर प्रतिजैविके उपयोगी पडतात. प्रतिजैविकांच्या वापरामुळे मेंदूदाह, न्यूमोनिया, क्षय, लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) इत्यादी आजारांची घातकता आणि प्रमाण कमी होते. मात्र सर्दी, फ्ल्यू किंवा अन्य विषाणुजन्य रोगांवर ती फारशी प्रभावी ठरत नाहीत. प्रतिजैविके केवळ रोगग्रस्त पेशींवर परिणाम करतात. इतर पेशींवर त्यांचे परिणाम कमी घातक असतात. प्राण्यांना होणाऱ्‍या संसर्गजन्य रोगांवरदेखील प्रतिजैविकांचा वापर केला जातो.

प्रतिजैविके,‍ विशेषेकरून निवडक पद्धतीने जीवाणूंचा नाश करतात. जीवाणू पेशी आणि प्राणी पेशी यांच्यात ठळक फरक म्हणजे जीवाणू पेशींना पेशीभित्तिका असते. निरनिराळ्या जीवाणूंमध्ये असलेल्या पेशीभित्तिकांनुसार त्या जीवाणूंचा नाश कोणते प्रतिजैविक करेल, हे ठरते. जीवाणूंचे पेशीभित्तिकेनुसार वर्गीकरण करताना ग्रॅम अभिरंजन पद्धतीचा वापर करतात (पहा: जीवाणू). या प्रक्रियेत जीवाणूंच्या पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकॉन हे संयुग आहे किंवा नाही, याची चाचणी क्रिस्टल व्हायोलेट या रंजकाद्वारे करतात. पेप्टिडोग्लायकॉन संयुगामुळे जीवाणूंची पेशीभित्तिका दृढ बनते. ज्या जीवाणूंच्या पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकॉन असते, त्यांच्या सान्निध्यात क्रिस्टल व्हायोलेटच्या रंगात बदल होत नाही. अशा जीवाणूंना ग्रॅम-पॉझिटिव्ह जीवाणू म्हणतात. जे जीवाणू क्रिस्टल व्हायलेट रंगहीन करतात, त्यांना ग्रॅम-निगेटिव्ह जीवाणू म्हणतात.

काही प्रतिजैविके निवडक पद्धतीने ग्रॅम-पॉझिटिव्ह किंवा ग्रॅम-निगेटिव्ह जीवाणूंना मारतात. अशा प्रतिजैविकांना लघुलक्षी प्रतिजैविके म्हणतात. उदा., व्हँकोमायसीन प्रतिजैविक स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, एंटेरोकॉकस  इत्यादी प्रजातीच्या ग्रॅम-पॉझिटिव्ह जीवाणूंना मारतात. तसेच जेंटामायसीन प्रतिजैविक प्रामुख्याने स्यूडोमोनस, प्रोटियस, सेराटिया  इत्यादी प्रजातीच्या ग्रॅम-निगेटिव्ह जीवाणूंना मारते. काही प्रतिजैविके दोन्ही प्रकारच्या जीवाणूंचा नाश करतात. त्यांना विस्तृतलक्षी प्रतिजैविके म्हणतात. उदा., टेट्रासायक्लिन, क्लोरॅफिनिकॉल. मात्र कोणतेही विस्तृतलक्षी प्रतिजैविक सर्व जीवाणूंचा नाश करतेच, असे नाही. काही प्रतिजैविके कवक आणि आदिजीव यांच्यामुळे होणाऱ्‍या संक्रामणांवर उपयोगी पडतात. कवक व आदिजीव यांच्याही पेशी मानवी पेशींहून वेगळ्या असतात. मायकोनेझॉल आणि अँफोटेरिसीन ही प्रतिजैविके कवकांमुळे उद्भवणाऱ्‍या रोगांवर वापरतात, तर पॅरामोमायसीन हे प्रतिजैविक आदिजीवांमुळे आतड्याला होणाऱ्‍या अमिबाजन्य विकारावर (अमीबाॲसिस) वापरतात. डॉक्सोरुबीसीन हे प्रतिजैविक रक्ताचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि इतर अर्बुदांवर इलाज करण्यासाठी वापरतात. कर्करोगग्रस्त पेशी विभाजित होत असताना हे औषध त्या पेशींचा नाश करते. कर्करोगग्रस्त पेशींप्रमाणेच रक्तपेशी विभाजित होत असल्याने रक्तपेशींवर या प्रतिजैविकांचा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.

प्रतिजैविके वेगवेगळ्या प्रकारे रोगांचा प्रतिकार करतात. (१) काही प्रतिजैविके केवळ जीवाणूंच्या पेशीभित्तिकेवर परिणाम करतात. जीवाणूंच्या पेशीमध्ये पेशीभित्तिकेच्या निर्मितीसाठी लागणारी संयुगे बनतात. ही संयुगे पेशीबाहेर पडून त्यांची जुळणी होते आणि पेशीभित्तिका बनते. या प्रकारात, प्रतिजैविके पेशीभित्तिकेच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर अडथळा आणतात. पेशीभित्तिका तयार न झाल्यामुळे जीवाणू मरतात. उदा., पेनिसिलीन, सिफॅलोस्पोरीन, सायक्लोस्ट‍िराॅन, व्हँकोमायसीन इ. प्रतिजैविके. मानवी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसल्यामुळे प्रतिजैविकांचा त्यांवर परिणाम होत नाही. (२) सर्व पेशींच्या पेशीद्रवाभोवती एक आवरण म्हणजेच पेशीपटल असते. पेशीमध्ये आत येणाऱ्‍या किंवा पेशीबाहेर पडणाऱ्‍या पदार्थांचे नियमन या पेशीपटलाद्वारे होत असते. काही प्रतिजैविके विशिष्ट जीवाणूंचे पेशीपटल उध्वस्त करतात. पेशीपटल हानीग्रस्त झाल्यामुळे जीवाणूंच्या पेशीतील जीवनभूत घटक पेशीतून बाहेर पडतात किंवा त्यांच्या पेशीत विषारी घटक आत शिरतात. उदा., अँफोटेरिसीन, निस्टॅटीन इ. प्रतिजैविके. (३) सर्व पेशी जगण्यासाठी प्रथिने आणि न्यूक्लिइक आम्लांची निर्मिती करतात. जीवाणूंच्या पेशीदेखील मानवी पेशींप्रमाणे अशा पदार्थांची निर्मिती करीत असतात. परंतु काही बाबतींत या प्रक्रियांमध्ये फरक असतो. काही प्रतिजैविके मानवी पेशीमध्ये घडणाऱ्‍या रासायनिक प्रक्रियांमध्ये कोणताही अडथळा न आणता, केवळ जीवाणूंच्या पेशीमध्ये घडणाऱ्‍या रासायनिक प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात. उदा., स्ट्रेप्टोमायसीन आणि टेट्रासायक्लीन ही प्रतिजैविके काही विशिष्ट जीवाणूंमध्ये प्रथिननिर्मिती थांबवितात, तर रिफांप‍िन हे प्रतिजैविक काही जीवाणूमध्ये न्यूक्लिइक आम्लांची निर्मिती थांबवितात.

इंग्लंडमधील वैज्ञानिक अलेक्झांडर फ्लेमिंग यांना १९२९ मध्ये स्ट्रेप्टोकोकस  प्रजातीच्या जीवाणूंची वाढ पेनिसिलियम नोटॅटम  या जातीच्या बुरशीच्या आगंतुक वाढीमुळे खुंटल्याचे लक्षात आले. त्यानंतर दहा वर्षांनी एर्न्स्ट बोरिस चेन (इंग्लंड) आणि हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी (ऑस्ट्रेलिया) यांनी बुरशीपासून पेनिसिलीन वेगळे करून ते संयुग जीवाणूंचा नाश करते, हे दाखविले. त्याला पेनिसिलीन हे नाव देण्यात आले, कारण ते पेनिसिलियम  कवकापासून तयार करण्यात आले होते. या प्रतिजैविकाच्या शोधासाठी फ्लेमिंग यांच्याबरोबर चेन आणि फ्लोरी यांना १९४५ सालचे वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर पेनिसिलीनच्या रेणुसूत्रात अनेक बदल करून विविध प्रतिजैविके तयार करण्यात आली. या प्रतिजैविकांच्या वापरामुळे स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, न्यूमोकॉकस  तसेच उपदंशाला कारणीभूत ठरणाऱ्‍या अनेक रोगांवर इलाज शक्य होऊ लागले.

प्रतिजैविकांचे दुष्परिणाम: प्रतिजैविकांचा वापर काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करावा लागतो. अन्यथा काही वेळा त्याचे दुष्परिणामदेखील घडून येतात आणि क्वचित प्रसंगी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. प्रतिजैविकांचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात: (१) काही रुग्णांमध्ये प्रतिजैविकांमुळे अधिहर्षता निर्माण होते. त्यामुळे रुग्णाच्या अंगावर पुरळ उठणे व ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. बहुधा सर्व प्रतिजैविके अधिहर्षता निर्माण करू शकतात. मात्र, पेनिसिलीनच्या वापरामुळे ही शक्यता दाट असते. म्हणूनच डॉक्टर रुग्णाला प्रतिजैविकाची अधिहर्षता आहे किंवा नाही, याची खात्री करून घेतात. रुग्णाला विशिष्ट प्रतिजैविकाची अधिहर्षता असल्यास डॉक्टर त्याच गुणधर्माचे परंतु भिन्न रासायनिक संघटन असलेले प्रतिजैविक देतात. (२) मनुष्याच्या शरीरात आणि शरीरावर काही निरुपद्रवी तर काही उपद्रवी जीवाणू असतात. या दोन्ही प्रकारांच्या जीवाणूंमध्ये अन्न मिळविण्यासाठी स्पर्धा चालू असते. म्हणूनच निरुपद्रवी जीवाणूंमुळे उपद्रवी जीवाणूंच्या संख्येवर नियंत्रण येते. अनेक प्रतिजैविके, विशेषेकरून, विस्तृतलक्षी प्रतिजैविके, नेहमीच निरुपद्रवी आणि उपद्रवी जीवाणूंमध्ये भेद करतात असे नाही. निरुपद्रवी जीवाणू प्रमाणाहून अधिक मारले गेले, तर उपद्रवी जीवाणू प्रमाणाबाहेर वाढतात. त्यांमुळे नवीन संक्रामण घडून तीव्र संक्रामकता निर्माण होते. या स्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टर प्रतिजैविकांबरोबर लॅक्टोबॅसीलससारखे प्रजैविक (प्रोबायोटिक) देतात. (३) केवळ रोगकारक जीवाणूंच्या नाशासाठी वापरलेल्या प्रतिजैविकांमुळे इंद्रियांचा व ऊतींचा ऱ्हास होण्याची शक्यता कमी असते. मात्र काही प्रतिजैविकांचा वापर अधिक प्रमाणात आणि दीर्घकाळ केल्यास इंद्रिय व ऊती यांना धोका पोहोचतो. उदा., स्ट्रेप्ट्रोमायसीनच्या अतिवापरामुळे वृक्क काम करेनासे होते किंवा बहिरेपणा येतो. त्यामुळे दुसरे कोणतेही प्रतिजैविक परिणामकारक ठरत नसेल, तर डॉक्टर अशा प्रतिजैविकांचा वापर करतात. कर्करोगावरील प्रतिजैविके ज्या पेशींचे विभाजन वेगाने होते अशा सर्व पेशींविरुद्ध कार्य करतात. त्यामुळे निरोगी पेशींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. उदा., अस्थिमज्जेमध्ये सतत पेशीविभाजन होऊन नवीन पेशी तयार होत असतात. अस्थिमज्जेतील रक्तजनक पेशींवर प्रतिजैविकांचा परिणाम होऊन पांढऱ्‍या पेशींची संख्या कमी होते आणि किरकोळ संसर्गालाही रुग्ण बळी पडू शकतो.

प्रतिजैविकांना जीवाणूंचा रोध : काही रोगकारक जीवाणू प्रतिजैविकांना रोध निर्माण करू शकतात. इतर सजीवांप्रमाणे जीवाणूंमध्येही जीवनप्रक्रिया नियंत्रित करणारी जनुके असतात. काही वेळा जीवाणूंमधील जनुकांमध्ये निसर्गत: अशी उत्परिवर्तने घडून येतात, की त्यामुळे प्रतिजैविकांना रोध निर्माण होतो. प्रतिजैविकांच्या रेणूंचे विघटन करणारी विकरे तयार करून ते रोध निर्माण करतात. स्टॅफिलोकॉकस जीवाणूंमध्ये असे घडून येते आणि पेनिसिलीन व सिफॅलोस्पोरीन या प्रतिजैविकांना ते रोध करतात. काही जीवाणूंच्या पेशीपटलात असा बदल होतो, की प्रतिजैविके त्यांच्या पेशीमध्ये शिरू शकत नाही. स्यूडोमोनस प्रजातीचे जीवाणू क्वीनोलान प्रतिजैविकाला अशा प्रकारे रोध करतात. एंटेरोकॉकस प्रजातीच्या जीवाणूंतील प्रथिनांमध्ये असा बदल होतो, की त्यांच्यावर परिणाम करणारे व्हँकोमायसीन प्रतिजैविक निकामी ठरते.

प्रतिजैविक चाचण्या : कोणत्या जीवाणूंवर कोणते प्रतिजैविक परिणामकारक ठरते, हे पाहण्यासाठी वैज्ञानिक नियमितपणे चाचण्या करतात. अशा चाचण्यांद्वारे ज्या प्रतिजैविकांमुळे एखादा रोग बरा होतो, ती प्रतिजैविके म्हणून वापरतात. ही पद्धत वेळखाऊ असल्याने बऱ्‍याचदा विस्तृतलक्षी प्रतिजैविके वापरली जातात.

पेनिसिलिन हे सर्वांत सुरक्षित प्रतिजैविक मानतात. सध्या दोन प्रकारांचे पेनिसिलीन उपलब्ध आहे: निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित. नैसर्गिक पेनिसिलीन घशाचे संक्रामण, उपदंश व मेंदूदाह यांवर वापरण्यात येते. सिफॅलोस्पोरीन हेदेखील मानवनिर्मित असून त्याच्या चार पिढ्या निर्माण केल्या गेल्या आहेत. पहिल्या पिढीचे सिफॅलोस्पोरीन पेनिसिलीनरोधी न्यूमोकॉकस  जीवाणूंवर परिणामकारक असते. पेनिसिलीन, क्लिनोलोनसारखी मानवनिर्मित प्रतिजैविके गोळ्यांच्या स्वरूपात तोंडावाटे घेता येतात, तर काही अंत:क्षेपणाद्वारा देतात.

क्षयरोगावरील प्रतिजैविके : इथॅग्ल्युटॉल, आयसोनियाझीड व पायराझिनामीड ही कृत्रिम प्रतिजैविके क्षयरोगावर वापरतात. ही प्रतिजैविके अन्ननलिकेत शोषली जाऊन पेशी आणि ऊती यांमध्ये त्यांचा प्रवेश होतो. त्यांपैकी आयसोनियाझीडमुळे ३५ वर्षांवरील रुग्णांत कधीकधी यकृतपेशीदाह होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रेप्टोमायसीज ऑर्किडेसिअस कवकापासून मिळविलेले सायक्लोसेरीन प्रतिजैविक क्षयरोगावर वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा