अनेक वेळा सजीवांच्या शरीरक्रिया तसेच वर्तणुकीसंबंधित क्रिया आवर्ती म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा घडणाऱ्या आहेत, असे आढळते. सजीवांच्या शरीरक्रियांत किंवा वर्तनांत आलेली अशी लय म्हणजे लयबद्धता. अनेकदा लयबद्धतेचे कारण पर्यावरणातील आवर्ती बदल असू शकते. आवर्तन कालानुसार अपिदैनिक, दैनिक, अवदैनिक, मासिक आणि वार्षिक लयबद्धता असे प्रकार केले जातात.

अपिदैनिक : यात सजीवांतील क्रिया एका दिवसात, सामान्यपणे चोवीस तासात, एकापेक्षा अधिक वेळा घडतात. जसे, एश्चेरिकिया कोलाय या जीवाणूंचे विभाजन दर अर्ध्या तासाने होते. पियुषिका ग्रंथीतून स्रवणारे वृद्धिसंप्रेरक दर तीन तासांनी निर्माण होते. निद्रावस्थेत माणसाच्या बुबुळांची हालचाल दर ९० मिनिटांनी एकदा होते.

दैनिक : या लयबद्धतेतील क्रिया दिवसातून एकदा (म्हणजे २४ तासांत) ठराविक वेळेला घडतात. दैनिक लयबद्धता बाह्य घटकांनी नियंत्रित होते. सूर्य उगवणे व मावळणे या दैनिक घटकांमुळे मनुष्यात ठराविक वेळेला जागे होणे, भूक लागणे व झोपणे या क्रिया होत असतात. कोंबडा दर २४ तासांनी आरवतो. दिनचर प्राणी दिवसा सक्रीय असतात व रात्री विश्रांती घेतात तर निशाचर रात्री सक्रीय होतात व दिवसा सुरक्षित जागी विश्रांती घेतात. वनातील प्राणी चरणे, पाणी पिणे व विश्रांती घेणे या क्रिया करतात. शिरीष वृक्षाची पाने दिवसा उघडतात आणि संध्याकाळी ती मिटतात. दिवसा सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे प्रकाशसंश्लेषण घडते. वनस्पती-प्लवक दिवसा पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन प्रकाशसंश्लेषण करतात, तर प्राणी-प्लवक रात्री पाण्याच्या पृष्ठभागावर येतात व दिवसा खाली जातात. सूर्यप्रकाश, तापमान, पाण्याचा खारेपणा व क्षुधा (भूक) या गोष्टींचा प्लवकांच्या हालचालीवर परिणाम होतो. कबुतर व पोपट यांसारखे पक्षी सकाळी थव्याने उडतात आणि बराच काळ पंखांना व्यायाम दिल्यावर विश्रांती घेतात. काही बाह्य कारणाने दैनिक लयबद्धतेत बदल झाल्यास ती पूर्ववत होते. आंतरखंडीय विमान प्रवाशी तसेच अंतराळवीरांनाही याचा अनुभव येतो.

अवदैनिक : या लयबद्धतेतील क्रिया पूर्ण होण्यासाठी २४ तासांहून अधिक कालावधी लागतो. म्हणजेच ही लयबद्धता एका दिवसापेक्षा मोठी असते. जसे, सागरी फिडलर खेकडे भरती-ओहोटीच्या वेळची हालचाल प्रत्येक वेळी २४ तास ५० मिनिटांनंतर दाखवितात. म्हणजेच फिडलर खेकड्यांची ओहोटीच्या वेळी किनाऱ्याकडे येण्याची वेळ दररोज ५० मिनिटांनी पुढे जाते.

मासिक : या लयबद्धतेतील क्रिया सामान्यपणे प्रत्येक महिन्याला घडते. उदा., स्त्रियांमध्ये मासिक ऋतुस्राव सरासरी २८ दिवसांनी म्हणजेच ढोबळपणे प्रत्येक महिन्याला होतो.

वार्षिक : या लयबद्धतेत घडणाऱ्या घटना पूर्ण होण्यास एका वर्षाचा कालावधी लागतो. बेडूक, वटवाघळे व काही कीटकांमध्ये शीतकालीन निद्रा दरवर्षी हिवाळ्याच्या सुमारास दिसून येते. पक्ष्यांचे स्थलांतर वार्षिक असते. बेडकांमध्ये दरवर्षी पावसाळा येण्याच्या वेळी प्रजनन घडते. अनेक पक्ष्यांमध्येही प्रजनन ऋतुमानानुसार वार्षिक असते. दरवर्षी सात जूनला लागणाऱ्या मृग नक्षत्राच्या वेळी पावसाला सुरुवात होते आणि त्याबरोबर हिरवाई फुलते. फुलपाखरे दिसू लागतात. प्रजनन होऊन ती अंडी घालतात. आठ-पंधरा दिवसांत त्यातून अळ्या बाहेर पडून त्या गवतावर व पानावर सरपटू लागतात. दरम्यान, पक्ष्यांनी घरटी बांधून त्यात अंडी घातलेली असतात. साधारणपणे तीन आठवड्यांनंतर त्यातून पिले बाहेर पडतात. या पिलांना पक्षी कीटकांच्या अळ्या भरवतात. या सर्व घटना पावसाशी निगडित असून हा घटनाक्रम वार्षिक लयबद्धता दाखवितो. पळस, पांगारा व काटे सावर या वृक्षांना उन्हाळ्यात फुलांचा बहर येतो. अनेक वृक्ष उन्हाळ्यात निष्पर्ण होतात आणि पावसाळ्यात त्यांना पालवी फुटते. वड, पिंपळ, औदुंबर इ. वृक्षांना हिवाळ्याच्या शेवटी फळे लागतात. आंबा, करवंद व जांभूळ ही फळे उन्हाळ्यात मिळतात.

जैविक लयबद्धता माणसाच्या आरोग्याशी आणि काही आजारांशी निगडित आहे, असे काही संशोधकांचे मानणे आहे. काही अपवादात्मक स्थितीत मानसिक दौर्बल्य असलेले मनोरुग्ण पौर्णिमेला उत्तेजित मानसिक स्थिती दर्शवितात, तर अमावास्येला त्यांचे वागणे सैरभर होते. काही समुद्र-करंडे उन्हाळ्यापासून सप्टेंबरपर्यंत दर पौर्णिमेलाच प्रजोत्पादनासाठी युग्मक निर्मिती करतात. यूनिस हे वलयांकित प्राणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत दोनदा आकाशात अर्धचंद्र असतो त्याच वेळी प्रजोत्पादनासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन युग्मके सोडतात. ही सर्व उदाहरणे चांद्रलयबद्धतेची आहेत.

जैविक लयबद्धता ही आनुवंशिक प्रक्रिया असल्यामुळे तिच्यातील सातत्य वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहिले आहे. काही विशिष्ट जनुकांच्या क्रियाशील होण्यामुळे विशिष्ट शरीरक्रिया घडून येतात आणि नंतर एकामुळे दुसरी, दुसऱ्यामुळे तिसरी अशी घटनांची मालिका सुरू होते. जनुकांचे क्रियाशील होणे, ही बाबसुद्धा जनुकनियंत्रित असल्यामुळे जैविक लयबद्धतेमागील प्रेरणा आनुवंशिक आहे. मेंदूतील तृतीय-नेत्रपिंड ग्रंथी आणि अध:श्चेतक ही लयबद्धता नियामक केंद्र आहेत.