राजवाडे, शंकर रामचंद्र : (२३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२). प्राचीन‒संस्कृत‒विद्येचे संशोधन करणारे, तत्त्वज्ञानाच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे विचार करून ग्रंथलेखन करणारे प्रसिद्ध व्याख्याते आणि भारतीय तत्त्वचिंतक. अग्निहोत्राचे व्रत स्वीकारल्याने त्यांना ‘आहिताग्नी’ ही उपाधी प्राप्त झाली. नानासाहेब हे त्यांचे टोपणनाव. आहिताग्नी यांचे सिद्धान्त शांकरमताच्या विरुद्ध आणि अर्वाचीन विज्ञान जमेस धरून मांडलेले आहेत. त्यांनी अद्वैत सिद्धान्ताविरुद्ध ‘द्वंद्व’ सिद्धान्त आणि द्वंद्वापलीकडील स्थितीला ‘अद्वैताऐवजी निर्द्वंद्व’ हा शब्द अधिक शास्त्रीय व प्राचीन असल्याचे प्रतिपादिले आहे.

राजवाडेंचा जन्म पुण्यातील एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील (रामचंद्र हरी राजवाडे) ब्रिटिश सरकारच्या लष्करी खात्यात नोकरीस होते. शंकरराव राजवाडे यांचे वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झाले. पत्नी पार्वती, आई-वडील, भावंडे असा त्यांचा परिवार होता; परंतु १८९७ ते १९०२ या कालावधीत पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथींमध्ये त्यांच्या धाकट्या भावाचे, वडिलांचे (अन्य आजाराने) व त्यानंतर काही वर्षांनी आईचे निधन झाले. १८९८ मध्ये त्यांनी दुसरे लग्न केले. श्री राजाभाऊ राजवाडे हे आहिताग्नींचे सुपुत्र. शंकरराव राजवाडेंनी १८९७ मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तेथून त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. याच काळात त्यांच्यावर स्वातंत्र्यलढ्यातील जहाल प्रवाहाचा प्रभाव पडला. तत्कालीन क्रांतिकारकांशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय होता व लोकमान्य टिळकांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा त्यांना पुरेपूर अभिमान होता. टिळकांच्या तेजस्वी नेतृत्वाच्या काळातील अनेक तरुणांपैकी ते एक होते, परंतु तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ते टिळकांना फारसे मानीत नसत. अल्पकाळ ते चाफेकर बंधूंच्या संपर्कातही होते. राजवाडे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वडिलांचे आकस्मिक निधन (१९०२) झाल्याने त्यांनी अर्थार्जनासाठी काही वर्षे (१९०२ ते १९०७ पर्यंत) शासकीय सेवा केली. मात्र उर्वरित आयुष्य त्यांनी पूर्णतः विद्याव्यासंगास वाहिले.

प्रा. फ्रान्सिस बेन (१८६३‒१९४०) ह्याजकडून राजवाडेंना स्थितिवादाचे बाळकडू मिळाले होते. शिवाय टिळकप्रणीत जाज्ज्वल्य राष्ट्रवादाचे तसेच ॲरिस्टॉटलच्या विचारांचे खोल संस्कार त्यांच्यावर झाले. टिळकांच्या गीतारहस्य (१९१५) ह्या ग्रंथाद्वारे राजवाडेंचा फ्रीड्रिख नीत्शे (१८४४‒१९००) ह्याच्या विचारसरणीशी परिचय झाला. आपल्या द्वंद्वात्मक तत्त्वज्ञानाला आणि सनातन धर्मप्रणीत समाजव्यवस्थेला नीत्शेचे तत्त्वज्ञान पोषक असल्याचे राजवाडेंना आढळून आले. वैदिक तत्त्वपरंपरा व विशेषेकरून पूर्वमीमांसा त्यांच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी होती. भारतीय आणि पाश्चिमात्य विचारांच्या समन्वयाचा प्रयत्न राजवाडेंच्या विचारसरणीत दिसून येतो. त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू द्विध्रुव तत्त्वाचा सिद्धान्त होता. ॲरिस्टॉटलने सांगितलेली प्रकटता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील प्रकृती, तर त्याने सांगितलेली संभाव्यता म्हणजे पुरुष होय, असे सांगून विकसनशील अशा केवलतत्त्वाची कल्पना त्यांनी मांडली. सामाजिक तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र यांपैकी त्यांनी नीतिशास्त्राचे अनुकरण केले. वैचारिक संचिताच्या मुशीतून राजवाडेंची ‘निर्द्वंद्व’ ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आकारास आली.

इंग्रजीचे उत्तम ज्ञान असूनही राजवाडेंनी केवळ मराठीतून ग्रंथरचना केली. एखाददुसरा अपवाद वगळता त्यांनी स्वतःच आपले लेखन प्रकाशित केले. त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये तत्त्वज्ञानात्मक, वैज्ञानिक तसेच सामाजिक व राजकीय विचारसूत्रांचा मिलाप आढळतो. गीताभाष्य (१९१६) ह्या ग्रंथात त्यांनी आधुनिक ज्ञानाच्या प्रकाशात गीतेच्या पहिल्या तीन अध्यायांची नीतीच्या व समष्टीच्या दृष्टीने चिकित्सा केली आहे. नासदीयसूक्तभाष्य‒पूर्वार्ध (१९२७) हा त्यांचा दुसरा ग्रंथ. त्यामध्ये ऋग्वेदातील जगदारंभविषयक नासदीय सूक्ताच्या अनुषंगाने पुरुषार्थांचा उलगडा केला आहे. सदर ग्रंथाच्या उत्तरार्धाचे तीन खंड पुढील पंचवीस वर्षांत प्रसिद्ध झाले व त्यांत शरीरशास्त्र, कामशास्त्र, कुटुंबसंस्था इत्यादी विषयांचा ऊहापोह केलेला आढळतो. दरम्यान राजवाडेंनी नीत्शेचा ख्रिस्तांतक आणि ख्रिस्तांतक नीत्शे (१९३१) हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात द अँटीख्राइस्ट (१८९५) ह्या ग्रंथाचा अनुवाद व नीत्शेच्या तत्त्वज्ञानाची सविस्तर चर्चा समाविष्ट आहेत.

राजवाडेंनी देशभरात शेकडो व्याख्याने दिली. वैदिक धर्म आणि षड्दर्शने अथवा चार विद्या व सहा शास्त्रे (रावबहाद्दूर किनखेडे व्याख्यानमाला, नागपूर विद्यापीठ, १९३८) तसेच सनातन वैदिक धर्म प्रवचनमाला (१९४७) ह्या पुस्तकांद्वारे त्यांतील काही व्याख्याने प्रकाशित झाली. ईशावास्योपनिषद्भाष्य (१९४९) ह्या ग्रंथामध्ये ईश, जगत् आणि जीव ह्यांच्यातील यथोचित संबंध दर्शवून कर्माचा व ज्ञानाचा विचार केला आहे. षड्दर्शनसमन्वय आणि पुरुषार्थमीमांसा (१९४९) हा राजवाडेंच्या हयातीत प्रसिद्ध झालेला त्यांचा अखेरचा ग्रंथ असून त्यामध्ये दर्शनशास्त्रांचे साहचर्य विशद करून मानवी श्रेयसविषयक धर्मकेंद्री भूमिका मांडली आहे. त्यांचे आत्मवृत्त १९८० साली प्रसिद्ध झाले. मात्र झरथुष्ट्री धर्म, ज्योतिष अशा विषयांवरील त्यांचे लेखन अप्रकाशित राहिले.

राजवाडेंच्या विचारयात्रेचे अंतिम उद्दिष्ट पारंपरिक हिंदू समाजधारणेचे पुनरुज्जीवन करणे, हे होते. ते साध्य करण्यासाठी वेद आणि गीता ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या विचारधनाचा योग्य अन्वयार्थ लावून त्या आधारे बुद्ध व शंकराचार्य ह्यांच्या भूमिकांचे तसेच ख्रिस्ती व आधुनिक सुधारणावादी ह्यांच्या हिंदू विचार आणि आचार यांसंबंधीच्या आक्षेपांचे खंडन करणे आवश्यक आहे, असा त्यांचा आग्रह होता. नीत्शेचा वैचारिक वारसा ह्या उपक्रमास उपकारक असल्याची राजवाडेंची खात्री पटली व त्यातील काही कळीच्या सूत्रांचा उपयोग त्यांनी बौद्ध, अद्वैतवादी, उदारमतवादी, उपयुक्ततावादी, समाजवादी आणि स्त्रीवादी विचारप्रवाहांचा प्रतिवाद करण्यासाठी केला.

आधुनिक महाराष्ट्रातील तत्त्वचिंतनाचे आद्य अभ्यासक एम. आर. लेदर्ले (१९२६‒१९८६) ह्याच्या मते ‘द्वंद्व’ ही संकल्पना राजवाडेंच्या सद्वस्तुमीमांसेची आधारशिला (Metaphysical Foundation) होय व तिच्याद्वारे ‘जीवन आणि मृत्यू’, ‘उष्णता आणि शीतलता’, ‘सुख आणि दुःख’ अशा विरोधभावी पण मूलतः परस्परसापेक्ष घटितांचा निर्देश होतो. वेदांतील विचारव्यूह ‘द्वंद्वातीत’ असून ‘निर्द्वंद्व’ हा गीतेच्या शिकवणुकीचा मथितार्थ आहे, असे राजवाडेंचे प्रतिपादन होते.

नीत्शेचे तत्त्वज्ञान निर्द्वंद्वकेंद्री असून ते ब्रह्मनिर्वाणप्रवण असल्याचा निर्वाळा राजवाडेंनी दिला. बलेच्छा जोपासणारे हे तत्त्वज्ञानच अतिमानव (Uebermensch/Overman) घडवू शकते. त्यामध्ये मनुस्मृतीविषयी तसेच वर्णाश्रमधर्माच्या पोलादी पायावर रचलेल्या सनातन हिंदू समाजरचनेविषयी असलेला नितांत आदर राजवाडेंना भावला. एतद्देशीय समाजसुधारक प्रच्छन्न ख्रिश्चन मूल्यसरणीने पछाडलेले असल्याचा त्यांचा आरोप होता. म्हणूनच नीत्शेने तिच्या अंगभूत दास्यवृत्तीवर केलेल्या घणाघाती टीकेचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले.

वैदिक आणि नीत्शेप्रणीत विचारविश्वांची सांगड घालण्याच्या खटाटोपात राजवाडेंनी ‘फॅसिस्टवादा’चा पुरस्कार केला. मनुष्यप्राणी स्वभावतः फॅसिस्ट असून प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार स्वहित साधण्यासाठी बलाची कास धरते, असे त्यांनी निक्षून सांगितले. इतर सर्व विचारप्रणाली कृत्रिम आणि दौर्बल्यमूलक असल्याचा त्यांचा दावा होता. फॅसिस्टवाद व समाजवाद ह्यांमध्ये द्वंद्व आहे; परंतु सच्चा फॅसिस्ट त्या पलीकडे जातो. तसेच आदिम अवस्थेत आढळणारा फॅसिस्टवाद, नागरी समाजात उद्भवणारा समाजवाद आणि अतिमानवाच्या कारकिर्दीत अस्तित्वात येणारा परिपूर्ण फॅसिस्टवाद हे मानवी उत्क्रांतीचे प्रमुख टप्पे आहेत, अशी मांडणी राजवाडेंनी केली.

पराकोटीच्या प्रतिगामी विचारांचे प्रणेते अशी राजवाडेंची ख्याती झाल्याने त्यांचे वैचारिक कार्य झाकोळून गेले. वस्तुतः त्यांच्या हिंदू परंपराभिमानाला अन्यधर्मियांच्या विखारी द्वेषाची काळी किनार नव्हती. राजवाडेंनी स्त्रीवादावर टीका केली हे खरे; मात्र त्यांच्या लेकीसुना सुविद्य होत्या. फॅसिस्टवादाविषयीच्या त्यांच्या आकर्षणाचे कोणत्याही ठोस कृतिकार्यक्रमात रूपांतर झाले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा डोलारा ठिसूळ सैद्धांतिक पायावर उभा असल्याचा लेदर्लेंनी केलेला आरोप स्वीकारला तरीही अष्टपैलुत्व आणि बुद्धिचापल्य ह्यांमध्ये त्यांचा हात धरू शकणारे विचारवंत महाराष्ट्राच्या इतिहासात विरळाच म्हणावे लागतील.

वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आजारपणामुळे पुण्यातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Deshpande, Sharad, Ed. Philosophy in Colonial India, New Delhi, 2015.
  • Lederle, M. R. Philosophical Trends in Modern Maharashtra, Bombay, 1976.
  • मोरे, सदानंद, ‘महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास’, परामर्श , नोव्हेंबर २००८‒जानेवारी २००९.
  • राजवाडे, शं. रा. आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त, पुणे, १९८०.
  • क्षीरसागर, श्री. के. तसबीर आणि तकदीर, बॉम्बे, १९७६.
  • http://www.ahitagni-rajwade.com/rajwade.html

समीक्षक – प्रदीप गोखले

प्रतिक्रिया व्यक्त करा